Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यक्रांतदर्शी शिवराय

क्रांतदर्शी शिवराय

हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा…..

शिवाजी महाराजांनी १९ जून १६७६ रोजी  “महंमद कुलीखान” म्हणजेच नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात विधीवत घेतले होते. त्या नेताजी पालकरांविषयी….

नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. त्यांना ‘प्रतिशिवाजी‘ म्हणजेच ‘दूसरा शिवाजी’ असेही म्हटले जायचे. नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती.

अफजलखान वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. सभासद म्हणतो, राजे मातुश्रींचा आशीर्वाद घेऊन प्रतापगडास निघाले. नेताजी पालकर सरनोबत यास लष्कर घेऊन वर घाटावरि येणे म्हणोन सांगितले. आणि अफजलखानास जावलीस बोलावितो, सला करून भेटतों, विश्वास लावून जवळ आणितों, तें समयी तुम्ही घाटमाथा येऊन मार्ग धरणें, असे सांगितले.

खानाचा वध झाल्यानंतर, राजे गडावरि जातांच एक भांड्याचा आवाज केला. तेच गडाखालील लोक व घाटावरील लोक व लष्कर व कोकणांतून मोरोपंत व मावळे असे चौतर्फी चोहोंकडून चालोन खानाचे गोटावरि आले. मोठें घोरोंदर युध्द जाहाले. रक्ताच्या नद्या चालल्या. रणकंदन जाले. प्रतापगडाच्या या युध्दात नेताजींनी मोठा पराक्रम गाजविला.

पुरंदर तहानंतर शिवाजी महाराज, मिर्झा राजे, नेताजीं पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला.

आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात नेताजीं पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १००० माणसे मारली गेली. महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांनी नेताजींला पत्राद्वारे “समयास कैसा पावला नाहीस” असे म्हणून बडतर्फ केले.

मग नेताजीं विजापूरकरांना जाऊन मिळाले. महाराज आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजीं पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.
शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजीं पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले.

नेताजीं या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजीं आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेतोजी मुस्लिम झाले व त्यांचे ‘महम्मद कुलिखान’ असे नामकरण करण्यात आले.

जून १६६७ औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजीं काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेताजीं काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.

शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला ‘प्रतिशिवाजीची’ आठवण झाली. मग त्याने या ‘मुहंम्मद कुलीखानास’, दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजीं मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले. नेताजीं पालकर यांची समाधी तामसा ता. हदगाव, जि. नांदेड येथे आहे.
सेवेचे ठाई तत्पर । शिवकिंकर योगेश्वर ।।

।।। अक्षरयोगी ।।।

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. नेताजी पालकराचा इतिहास अगदी डोळ्यासमोर आला. खुप छान लेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments