क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या गौरवपर कविता.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
१. क्रांतीज्योती सावित्रीबाई
जोतिबानी घडवीली तुला
क्रातिज्योती सावित्री
सार्या बायांची आदर्श
शिकवण्यास निघालीस ||१||
भिडे वाड्याशी जाताना
फेकले माती,शेण अंगावरी
शुंशूद्रांची काढली शाळा
पंतोजी खवळले सारे ||२||
काशीबाईच्यासाठी विधवा आश्रम
घेतले तिचे अपत्य दत्तक
केली कायमची सोय विधवांची
सत्याचा मार्ग चोखाळूनी ||३||
केली पाऊल वाट शिक्षणाची
तुच आदिशक्ती ज्ञानाची
लावली ज्योत घरोघरी
जागवली स्री शक्ती ||४||
आज नमन करतो आदिमातेला
तुच सरस्वती आमुची
आज ताठ मानेने कामकरोनी
पायावर उभ्या तेजस्वीनी |५||
— अंजली आर.सामंत. अमेरिका
२. सावित्रीमाई फुले
शैक्षणिक माता सावित्रीमाई फुले
शिक्षणाचे दार त्यांनी केले खूले ॥धृ॥
स्त्री शिक्षणाचा घेऊनिया ध्यास
तळागाळातील मुलींचा केला विकास
मुलींच्या पंखात ज्ञानाचे बळ भरले
शिक्षणाचे दार त्यांनी केले खुले ॥१॥
साऊ फातिमाला कंटकानी छळले
शैक्षणिक कार्य त्यांनी पणास नेले
रूढी परंपरा त्यांनी जुगारले
शिक्षणाचे दार त्यांनी केले खुले ॥२॥
घरोघरी ज्ञान गंगा पहोचवली
स्वातंत्र्याची वाट त्यांनी केली खुली
लेकींना आत्मनिर्भर बनवले
शिक्षणाचे दार त्यांनी केले खुले ॥३॥
कर्तृत्वान स्त्रीने भरारी घेतली
सर्वच ठिकाणी ती आज पोहोचली
संयमाने तोंड साऱ्यांनाच दिले
शिक्षणाचे दार त्यांनी केले खुले ॥४॥
— अनिसा सिकंदर शेख. दौंड -पुणे
३. स्वप्न सावित्रीचे
किती ऐकले बोलणे
त्याग सुखाचा करून
पाया विद्येचा रचिला
हाती पुस्तक घेऊन
शिक्षणाचा अधिकार
कसे मिळाले असते
जर भीतीने पाऊले
तिचे थांबले असते
ज्योती होऊन पेटली
दिला ज्ञानाचा प्रकाश
मुक्त करून आम्हास
दिला मोकळा आकाश
दरवाजे बंधनांचे
आता तरी उघडूया
नाव घेत सावित्रीचे
झेप आकाशी घेऊया
हाती घेऊन मशाल
दूर करूया अंधार
तिने पाहिले जे स्वप्न
चला करूया साकार
ओझे हे कर्मकांडाचे
थोडे ठेवून बाजूला
नव्या युगाच्या साक्षीने
चला पाहूया जगाला
— पूनम सुलाने-सिंगल. जालना
४. माय सावित्राई
माय सावित्राई / ज्योतिबाजी फुले
दार केले खुले / शिक्षणाचे //१//
शिक्षणाच्या साठी / झेलेल्या यातना /
स्त्रियांच्या वेदना / मनामध्ये //२//
दुष्ट प्रथा रूढी / मोडून काढली /
साऊला धाडली / शाळेमधी //३//
फातिमा माऊली / साऊची सोबती /
दोघी ज्ञानज्योती / जगामध्ये //४//
पहिली महिला / शिक्षिका ती झाली /
पुण्य फळा आली / ज्योतिबांचे //५//
साऊ तू काढली / मुलींची ती शाळा /
लाविला गं लळा / शिक्षणाचा //६//
साऊ नि फातिमा / पुण्य तुमचे भारी /
मना मनावरी / कोरलेले //७//
— सौ. मेहमूदा शेख (गुलपरी). श्रीक्षेत्र देहूगाव, पुणे
५. नमन
तू होतीस म्हणून आम्ही आहोत हे खरे आहे बाई
पण तुझा इतिहास वाचला की, अंगाची होते लाही लाही..
काय नाही सोसलेस तू, तुझ्यासारखी तूच धैर्यवान
असे काही काम करून गेलीस की खरेच आम्ही भाग्यवान…
खांद्याला खांदा लावून उभी राहिलीस,
शेवटी नवऱ्याला तूच दिलीस आगटी
आजही हिंमत नाही ग, तू ठेचलीस नागांची शेपटी..
प्लेगचे रोगी खांद्यावर घेऊन केलीस धावाधाव
आणि नियतीने साधला बघ नको तिथे डाव..
अजून तुझी शेकडोवरीस गरज होती ग
तुम्हीच पेटवल्या मनामनातून साक्षरतेच्या “जोती” ग..
कसे होऊ सांग ना ग तुझे उतराई
तू तर समस्त भारतीयांची आई…
किती द्रष्टी होतीस बाई कुठून मिळाले बाळकडू
नि भ्रतारासवे तू घेतलास हातामध्ये खडू..
डगमगली नाहीस नराधमांपुढे हरली नाहीस लढाई
तू दिलेली वाळली नाही बघ अजून शाई..
तू त्यावेळी धाडसाने लावलेले बोर्ड आज राजरोसपणे लागतात
तुझे कार्यच एवढे थोर की जागोजाग तुझे डंके वाजतात…
तू मेली नाही नि शतके तू मरणारच नाही
व्हावी लागते इतिहासात एखादी अशी थोर बाई
जी इतिहास घडवते नि वळण लावते काळालाही
अशीच सावित्री पुन्हा पुन्हा जन्माला घाल…
अशी विनवणी करते आई…
तुझीच अक्षरे पुढे नेणारी तुझी लेक …
— प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
६. तू सावित्री तेजाची ज्योती !
जगलीस तिच्यासाठी
सर्वार्थाने सर्वांगाने
झुजलिस निर्धाराने
झालीस युगमाता सन्मानाने
तू दीपशिखा
तू अग्निशिखा
झालीस तेजस्वी शततारका.
घेऊनी वसा शिक्षणाचा
ज्ञानदानाच्या पुण्य कर्माचा
सत्कार तिच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा
सज्ञान होऊन आले आत्मभान
झाला उद्धार मिळून मान.
अर्थ नवा आला जगण्याला.
जाणीव होऊन अस्तित्वाची
उत्तुंग भरारी सावित्रीची
मुहूर्तमेढ सत्यशोधक विचारांची
झाला सूर्योदय स्त्री शक्तीचा
समाज सुधारणेच्या ध्यासाचा.
स्वप्ने साकारली आयुष्य बहरली
क्रांती ज्योतीच्या कर्तृत्वाची पताका
आसमंतात फडकली.
सलाम तुझ्या या धैर्याला
अलौकिक कार्याला
असामान्य व्यक्तिमत्वाला.
— रचना : मीरा जोशी. — संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
सुप्रसिद्ध कवयित्री सुमती ताई,मीरा ताई
मेहमुदा ताई,पूनमताई,अनिसाताई,अंजली ताई
या सावित्रीच्या लेकींनी केले सुंदर काव्यातून
क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन
या सर्व भगिनींचं करून अभिनंदन
करतो महाराष्ट्र शारदेला कोटी कोटी वंदन
राजेंद्र वाणी
दहिसर मुंबई 🙏