Wednesday, September 17, 2025
Homeसाहित्यक्रांतीवीरांच्या कथा ( ३ )

क्रांतीवीरांच्या कथा ( ३ )

चंद्रशेखर आझाद २
चंद्रशेखर बनारसला पोहोचला तेव्हा असहकार आंदोलनाच्या विचाराने प्रजा भारवली होती. १९२१ सालच्या डिसेंबर महिन्यात मोहनदास करमचंद गांधी या नेत्याने असहकार नावाचे नवलप्रद शस्त्र परजले होते. त्यांच्या नावावर त्या शस्त्राने आफ्रिकेत मिळवलेले यश जमा होते. म्हणून प्रजेच्या मनात त्याविषयी अपार कुतूहल ! बनारसच्या संस्कृत पाठशाळेत, गांधीजींच्या आंदोलनाचा गांभीर्याने विचार होत होता. स्वातंत्र्याच्या विचाराने तरुणाई झपाटली होती. त्या वातावरणात कुमारवयीन चंद्रशेखरच्या मनात देशभक्तीचे बीज पडले ! निर्भय मनात ते फोफावलेही! धरपकड सत्रात त्यास अटक झाली. सुरूवातीची प्रश्नोत्तरांची अनोखी फैर, त्याचा पहिला पराक्रम !

न्यायालयाने त्यास पोर ठरवून पंधरा दिवस कारावास फर्मावला. तो हसत म्हणाला, “जबरदस्त शिक्षेची इच्छा बाळगून उर्मट उत्तरे दिली. तरी ही फालतू शिक्षा ?” हा अगोचरपणा न्यायाधीशास आवडला नाही. म्हणून त्यास न्यायाधीशाने चिडून अट्टल गुन्हेगारांनाही असह्य वाटणारी पंधरा ‘कसूर फटक्यांची’ सजा फर्मावली. कसूर फटक्यासाठी कठीण लाकडाची सोटी वापरत. सोटीचा प्रहार असह्य असे. पाठीवर प्रहार होताच भलभले बेरडही विव्हळत. पण चंद्रशेखरने सारे फटके फटक्यागणिक ‘भारत माताकी जय’ अशी आरोळी फोडत जिरवले. आंदोलकांची गर्दी ‘चंद्रशेखरकी जय, महात्मा गांधीकी जय,’ असा जयजयकार करत होती. कसूर फटके न विव्हळता सोसणाऱ्या चंद्रशेखरच्या डोळ्यात धग अवतरली. पंधरा फटके संपताच विशेष घडले नसावे, अशा थाटात तो सदरा घालून निघून गेला.

चंद्रशेखरच्या देहाने पंधरा कसूर फटके सहन केले; पण अशांत मनास ते सहन झाले नाहीत. मन विनाविरोध दमन स्वीकारण्यास तयार नव्हते. न पटणारे काहीही केवळ वडील व्यक्ती सांगते, म्हणून करणे त्यास ढोंगीपणा वाटे. तरी त्याने तडकाफडकी निर्णय घेतला नाही. आपली मानसिकता आणि मत वारंवार तपासून त्याने अहिंसा आंदोलनाकडे पाठ फिरवली. पण मनात फोफावलेले देशप्रेमाचे बीज त्यास स्वस्थ बसू देईना. काशी विद्यापीठात मन्मथनाथ गुप्त शिकत होते. ते पंडित रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिरी आणि अश्फाकउल्ला खान यांनी स्थापन केलेल्या सशस्त्र क्रांतीचा अनुरोध करणाऱ्या हिंदुस्थान रिपब्लिक आर्मीचे (HRA) कार्यकर्ते होते. त्यांच्या चतुर नजरेने चंद्रशेखरची अस्वस्थता जाणवली. म्हणूँन त्यांनी चंद्रशेखरशी मैत्री केली. त्याला संस्थेचे कार्य समजून घेणे आवडले आणि पटलेही! चंद्रशेखरने कोर्टात मॅजिस्ट्रेटची उडवलेली भंभेरी नि हसतमुखाने सहन केले पंचक्रोशीत गाजत होते. प्रत्येक काम जीव ओतून करण्याचा त्याचा स्वभाव ! तो मन्मथनाथ बरोबर हिरीरीने काम करू लागला. लवकरच सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला.

पुढे त्याची प्रणवेश चटर्जी यांच्याशी परिचय झाला. त्याने चंद्रशेखर आणि पंडित रामप्रसाद बिस्मिल यांची गाठ घालून दिली. मग शचिंद्रनाथ सान्याल, रामप्रसाद बिस्मिल, वगैरेंबरोबर तो वारंवार दिसू लागला. च्याने शचिंद्रनाथ सान्याल, यांची मनापासून गुरुस्थानी स्थापना केली.
चंद्रशेखरची देशभक्ती चहू अंगाने फुलू लागली. त्याने कोर्टात दिलेली उत्तरे त्याचा परिचय बनल्याने सारे त्यास प्रेमाने चंद्रशेखर आझाद म्हणू लागले. त्याचे आडनाव तिवारी असल्याचे जुने विसरले नि नव्यांना ते आडनाव ठाऊकच नव्हते.

शचिंद्रनाथ सान्याल, रामप्रसाद बिस्मिल वगैरे आघाडीच्या क्रांतीवीरांना चंद्रशेखर फार आवडे. पत्रकांचे वितरण करणे असो की सशस्त्र क्रांतीची नवी योजना घडवणे, त्याच्या शिवाय कुणाचे पान हलेनासे झाले. झटक्यात काम करण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे शचिंद्रनाथ त्यास कौतुकाने ‘क्विक सिल्व्हर’ म्हणत.
बालक चंद्रशेखर वेगाने आघाडीचा क्रांतीवीर झाला. क्रांतीवीर त्यांचे नाव आदराने घेऊ लागले. ‘साधू चलता भला’ म्हणत ते सतत भ्रमण करत असत. म्हणून महाराष्ट्राच्या बुलढाणा (चिखली गाव) येथे जन्मलेल्या रामकृष्ण खत्रीशी त्यांचा परिचय झाला. मुळात तेही असहकार आंदोलनाचे कार्यकर्ते ! पण चौरीचौरा आंदोलनात खुलासा न देता गांधीजींनी आंदोलन मागे घेतले. बऱ्याच कार्यकर्त्यांना हे आवडले नाही, हे कळले तरी गांधींनी समर्थन देण्याची तमा बाळगली नाही. म्हणून बऱ्याच नाराज कार्यकर्त्यांनी असहकार आंदोलनाकडे पाठ फिरवली. तरी ते सारे होते देशास पारतंत्र्यातून मुक्त करू इच्छिणारे देशभक्त ! अशा कार्यकर्त्यात रामकृष्ण खत्रींचा समावेश! त्यांना रिकामपणी इतके नैराश्य आले की भगवी वस्त्रे धारण करून त्यांनी घर सोडले. अस्वस्थतेने सीमा गाठल्याने ते हरिद्वारला पोहोचले. तिथे त्यांचा स्वामी गोविंदप्रकाश यांच्याशी परिचय झाला.

गोविंदप्रकाशजी साधू वाटले तरी होते ते देशभक्त ! क्रांतीवीरांना मदत करणारे ! म्हणून रामकृष्ण हरिद्वारला राहू लागले. तिथे सर्वसंचारी आझाद त्यांना पुन्हा भेटले. हरिद्वारला होते खूप मठ ! मोठे मठ अत्यंत समृद्ध ! गोविंदप्रकाश स्वामींच्या मठाचे तेच संस्थापक मठाधिपती ! आझादांचे कार्य राहून प्रभावित झालेले! ते आझादांच्या पार्टीस आर्थिक मदत करत. पण त्यांचा मठ नवा ! समृद्ध न ! तरी ते बऱ्याच साधूंच्या संपर्कात असत. आझादांच्या पार्टीस आर्थिक चणचण पाचवीला पुजलेली ! म्हणून त्यांच्या मनात एक छान योजना जन्मली. तो विचार त्यांनी पार्टीच्या कामी घातला.

एखादा वयोवृद्ध मठाधिपती असलेला समृद्ध मठ शोधावा. चतुर सक्षम क्रांतीवीराची निवड करून त्यास त्या वयस्क मठाधिपतीचे शिष्य होण्यास पाठवावे. त्याने मठाधिपतीची मर्जी संपादन करावी. इतकी की मठाधिपतीने त्यास उत्तराधिकारी जाहीर करावे. वयस्क मठाधिपती लवकरच मरेल. मग मठाची समृद्धी आपसूक क्रांतीकारी संघटनेस प्राप्त होईल ! शिवाय मठात क्रांतीकारी अनुयायांचा भरणा करून देशकार्यास वेग देता येईल. गोविंदप्रकाशजींचा आर्थिक अडचणीवर मात करण्याचा हा विचार आझादांसकट सर्वांना आवडला. म्हणून वृद्ध मठाधिपती असलेला समृद्ध मठ शोधण्यात आला. मग मठाधिपतीचे शिष्यत्व धारण करण्याची क्षमता असलेल्या चतुर क्रांतीवीराचा शोध सुरू झाला. बरीच नावे विविध कारणांनी नापसंत करण्यात आली. अचानक एकाची नजर आझादांच्या जानव्यावर पडली.
आझाद सत्शील, निर्व्यसनी ब्रह्मचारी ब्राह्मण ! मठाधिपती होण्यास त्यांच्याइतके सक्षम कुणी नसल्याचे साऱ्यांना पटले. पण बालपणापासून आझाद चेलागिरीचा विरोध करणारे ! त्यात हे केवळ मठाधिपतीचे शिष्यत्व पत्करणे नव्हते. वारसदार ठरण्यासाठी मठाधिपतीचे लांगुलचालन करावे लागणे अभिप्रेत होते ! आझादांना ते मुळीच पटणार नव्हते. पण साऱ्यांनी त्यांच्या क्षमतेची पारावार स्तुती करत एकमताने त्यांची निवड केली. आझाद गयावया करू लागले. पण त्यांचा बोल धर्मवाक्य समजून स्वीकारणाऱ्या सर्वांनी हे अपवाद ठरवून त्यांचे म्हणणे ऐकणे नाकारले. कुणी ‘वयस्क म्हातारा लवकर मरेल,’ असे आश्वासन दिले तर कुणी आझाद मठाधिपती झाले की पार्टीची आर्थिक विवंचना संपेल, असे आकर्षक चित्र सादर केले. नाईलाजाने आझाद मठात गेले. पण….

मठाधिपती लवकर मरेल, अशी आशा जोजवत आझाद मठाधिपतीचे शिष्य झाले. मठातील दिनचर्या अत्यंत कंटाळवाणी असूनही ते धीराने रेटत होते. अगदीच निभेनासे झाल्यावर त्यांनी कागदाच्या कपट्यावर एक वाक्य लिहून कागद पोहोचवणे जुळवले, “मन्मथला पाठवून या कचाट्यातून मला मुक्त करा.”
स्वामी गोविंदप्रकाशजी मन्मथनाथ गुप्त यांना आपटे आडनाव धारण करून त्यांच्यासह मठात गेले. भव्य मठात आझाद सापडेनात. शेवटी नव्या शिष्यांच्या घोळक्यात ते जबरदस्तीने शाळेत पिटाळलेल्या मुलासारखे केविलवाणे बसलेले दिसले. मन्मथनाथला हसू आवरेना. गोविंदप्रकाशजींनी चातुर्याने आझादांना एकांतात आणले. एकांत लाभताच आझाद शिवी हासडून ओरडले, “यह महंत साला रोज खूब दूध पीता है. वो जल्दी मरनेवाला नही! गुरुमुखी पढ पढ कर मेरी आंखे फूटी. पर राम उसे लेने न आया.” गोविंदप्रकाशजींनी त्यांना राजिंदर लाहिरी दुसरी व्यवस्था करतील तो वर धीर धरण्याचा सल्ला दिला. दोघे परतले. पण आझाद फार काळ धीर धरू शकले नाहीत. त्यांनी मठातून पळ काढला.

ऑगस्ट महिन्यात विख्यात काकोरी कट रचण्यात आला. सशस्त्र क्रांतीच्या नि भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात ९ ऑगस्ट रोजी अंमलात आणलेल्या काकोरी अॅक्शन प्लॅनचे महत्व फार मोठे! शहाजहांपूरहून लखनौस जाणाऱ्या ८ डाऊन गाडीच्या बाबतीत क्रांतीवीरांनी घडवलेली ही धाडसी योजना! या गाडीतून ब्रिटीश ट्रेझरीची रोकड भरलेल्या बॅगा लखनौस रवाना होणार असल्याचे क्रांतीवीरांना कळले. शहांजहांपूर-लखनौ मार्गावर लखनौ नजिक काकोरी गाव! तिथे गाडी रात्री पोहोचत असे. म्हणून काकोरी गावी साखळी खेचून गाडी थांबवायचे ठरले. त्यानुसार ९ ऑगस्ट १९२५ रोजी गाडी थाबवली. डोळ्याची पापणी लवते त्याहून अधिक वेगाने क्रांतीवीर विशिष्ट डब्यात घुसले ! झपाट्याने काम फत्ते करून सारे वाऱ्याच्या वेगाने अंधारात दिसेनासे झाले.

सारी नगद क्रांतीवीरांनी पळवल्याचे कळताच सरकार पिसाळले. गोऱ्या अधिकाऱ्यांनी चिरडीस येऊन ‘मॅनहंट’ – मानव शिकारीची घोषणा केली. पण सारा परिसर पिंजून काढला तरी दोन आठवड्यात कुणाचा पत्ता लागला नाही. २६ तारखेस रामप्रसाद बिस्मिल सापडले. पाठोपाठ राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, शचिंद्रनाथ सान्याल, अश्फाकउल्ला खान… वगैरेंना अटक झाली. तरीही, ‘मॅनहंट’ चालू राहिला. तो थेट महाराष्ट्राच्या खेड्यात पोहोचला. तोवर रामकृष्ण खत्री महाराष्ट्रात जनजागृतीचे काम करण्यात दंग झाले होते. त्यांना १८ ऑक्टोबर रोजी काकोरी अॅक्शन प्लॅनमध्ये हात असल्याच्या आरोपावरून अटक झाली. देशात इतरत्र पोहोचलेल्या या योजनेतील सर्व वीरांना अटक झाली. अपवाद दोन तिवारी ! आझाद नाव पावलेले चंद्रशेखर नि तिवारी नावास कलंक ठरलेला वीरभद्र !
क्रमशः

स्मिता भागवत

– लेखन : स्मिता भागवत. कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं