Wednesday, February 5, 2025
Homeलेखक्रांतीसूर्य महात्मा फुले

क्रांतीसूर्य महात्मा फुले

भारतातील विविध सामाजिक सुधारणांचे प्रणेते, शिक्षणाचं महत्व ओळखलेले, सर्वांना ते कृतीतून दाखविणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची आज ११एप्रिल २०२२रोजी १९५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या महान कार्याची थोडक्यात ओळख…

काळ जसा पुढे जात आहे तसे महात्मा ज्योतीबा फुले यांचे विचार ,कार्य अधिकच तेजाने तळपत आहे. “विद्येविना मती गेली,मती विना गती गेली, गती विना वित्त गेले,वित्ता विना शूद्र खचले, एव्हढे अनर्थ एका अविद्येने केले ” हे रास्तपणे सांगितलेल्या महात्मा फुले यांच्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात त्यांच्या नावाने असलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ , त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे बहुधा जगातील असे एकमेव उदाहरण असावे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे ११ एप्रिल१८२७ रोजी झाला. सन १८३४ ते १८३८ दरम्यान त्यांचे शिक्षण पंतोजीच्या शाळेत झाले. १८४० साली सावित्रीबाईंशी त्यांचा विवाह झाला. विशेष म्हणजे विवाहानंतर स्कॉटिश मिशन हायस्कूलमधून १८४१ ते १८४७ दरम्यान त्यांनी इंग्रजी शिक्षण घेतले.

दिवसेंदिवस आपल्याला आरोग्याचं महत्व कळत आहे. पण हे महत्व ओळखून महात्मा फुले यांनी १८४७ साली लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून शारिरिक शिक्षण घेतलं. त्याच वर्षी त्यांनी थॉमस पेन यांच्या प्रसिध्द ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास केला.

१८४८ साली एका मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणूकीत उच्च वर्णियांकडून महात्मा फुले यांचा अपमान झाला. बहुधा तेथूनच सामाजिक समतेची ज्योत पेटवण्याची सुरूवात झाली असावी. त्याच वर्षी त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. तसंच भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली.

वाचन हे शिक्षणाचं, संस्काराचं महत्वाचं माध्यम आहे, हे ओळखून महात्मा फुले यांनी १८५२ मध्ये पूना लायब्ररीची स्थापना केली. त्याच वर्षी, मार्च महिन्यात त्यांनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.

महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून १६ नोव्हेंबर १८५२ रोजी ब्रिटीश सरकारतर्फे मेजर कॅन्डी यांनी त्यांचा विश्रामबाग वाड्यात सत्कार केला.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८५३ साली ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग दि एज्युकेशन ऑफ महार, मांग अँण्ड अदर्स’ या संस्थेची स्थापना केली. १८५४साली ते स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून रुजू झाले. पुढच्याच ,म्हणजे १८८५ साली त्यांनी रात्र शाळेची सुरूवात केली. १८५६ साली मारेकरी घालून त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. त्यांनी १८५८ मध्ये शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.

आपण पहातो की, आजही आपल्या समाजात ज्या प्रमाणात विधवा विवाह व्हायला हवेत, ते होत नाहीत. विधवांना मानहानीचं जीवन जगावं लागतं. पण ज्योतिबांनी १८६०साली विधवा विवाहास सहाय्य केले. पुढे १८६३साली त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. तर १८६४ साली गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला. त्या काळी विधवा महिला कुरूप दिसाव्यात म्हणून त्यांचे केशवपन केलं जायचं .म्हणजे त्यांच्या डोक्यावरचे सर्व केसं काढून डोकं तुळतुळीत ठेवण्याची प्रथा होती. ती प्रथा मोडित निघावी म्हणून ज्योतिबांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला. आपल्या समाजात आज ही प्रथा राहिलेली नाही , हे आपण पहातोच आहे.

महाराष्ट्रात १८६८ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. संवेदनशील ज्योतिबांनी त्या काळात ते रहात असलेल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.

सामाजिक सुधारणांना निश्चित दिशा प्राप्त व्हावी , यासाठी महात्मा फुले यांनी १८७३साली ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना केली. त्यांचे हे एक ऐतिहासिक , दुरगामी कार्य होय.

ज्योतिबांनी १८७५ साली शेतकऱ्यांच्या शोषणाविरुध्द अहमदनगर येथे खत फोडीचे बंड घडवून आणले. त्याचवर्षी थोर समाज सुधारक स्वामी दयानंद सरस्वतींची पुणे येथे मिरवणूक काढण्यास सहाय्य केले. त्यानंतर १८७६ ते १८८२ अशी सहा वर्षे ते पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. या दरम्यान १८८० साली त्यांनी दारुची दुकाने उघडण्यास विरोध केला होता.

भारतातील ‘मिलहँण्ड असोसिएशन’ या पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत थोर कामगार नेते नारायण मेघाजी लोंखडे यांना महात्मा फुले यांनी सहाय्य केले होते.

समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचं अतोनात महत्त्व आहे ,हे ओळखलेल्या, त्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या ज्योतिबांनी विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी समाजातील सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची आग्रही मागणी केली.

ज्योतिबांनी सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची, पुजाविधीची रचना करुन १८८७ साली पुरोहितांशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरूवात केली.

१८८८मध्ये डयुक ऑफ कॅनॉट यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचवर्षी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादूर वडेकर यांच्याहस्ते ज्योतिबांचा सत्कार करुन त्यांना “महात्मा” पदवी प्रदान केली.

असा हा महान क्रांती सूर्य २८ नोव्हेंबर १८९० रोजी काळाच्या आड गेला. तरी त्यांच्या विचाराने, कार्याने तो आजही तळपळतच आहे आणि पुढेही तळपतच राहील. त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्णपणे पूर्ण झाले, असे आपल्याला म्हणता येणार नाही. महात्मा फुले यांचे विचार, कार्य, जीवन आपण सतत आचरणात आणणे अजुनही नितांत गरजेचे आहे. शेवटी सामाजिक प्रगती हा एक प्रवाह आहे. तो सतत वाहता राहिल, स्वच्छ राहिल यासाठी आपण सतत प्रयत्न करणं हाच आधुनिक भारताच्या उभारणीतील आपला महत्वाचा वाटा असेल. महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ.
निवृत्त माहिती संचालक. ☎️  9869484800
E-mail: devendrabhujbal4760@gmail.com

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. म.फुले हे आपल्या देशातील समाजपरिवर्तनाचे जनक. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांचे कार्य अजोड आहे.क्रांतिसूर्य म.फुले हा देवेंद्र भुजबळ सरांनी लिहिलेला लेख अभ्यासपूर्ण आहे.जोतीरावांच्या जीवनकार्याचा परिमाणकारकपणे त्यांनी आढावा घेतला आहे.हा लेख संदर्भासाठी उपयुक्त आहे.

  2. 🌹अभिनंदन भुजबळ सर, प्रत्येक शब्द नं शब्द प्रेरणा देणारा आहे. नवीन पिढीला या बऱ्याच गोष्टी माहित नाहीत. असं लिखाण पोहचवीन खूप गरजेचे आहे
    🌹

    अशोक साबळे
    Ex. Indian Navy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी