Sunday, July 6, 2025
Homeलेखक्रिकेट :199 वर बाद झालेले खेळाडू

क्रिकेट :199 वर बाद झालेले खेळाडू

Records Are There To Be Broke हाच नियम इतर कुठल्याही खेळाप्रमाणे क्रिकेट लाही लागू होतो. अनेक विश्वविक्रम रचले आणि मोडले गेले आहेत. या सगळ्यात काही वेगळ्या विक्रमांच्या नोंदीही झाल्या. जसं की शतक, द्विशतक एका धावेने हुकणे.

क्रिकेटमध्ये ‘नर्व्हस नाइन्टी’ अशी  एक संकल्पना वापरली जाते. जेव्हा क्रिकेटपटू नव्वद च्या पुढे धावा करतो तेव्हा शतक पूर्ण व्हावे याचा येणारा ताण आणि त्यामुळे विचलित होणारी एकाग्रता यामुळे खेळाडू बाद होण्याची शक्यता वाढते त्यालाच ‘नर्व्हस नाइन्टी’ म्हणतात. त्याच धर्तीवर ‘नर्व्हस वन नाइन्टी नाईन’ या संकल्पनेची उभारणी करता येऊ शकेल. कारण बरेच खेळाडू ‘नर्व्हस वन नाइन्टी नाईन’ चे बळी ठरले आहेत.

1984 मध्ये भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानी सलामीवीर मुदसर नजर हा एकशे नव्यांणव धावांवर बाद होणारा पहिला खेळाडू ठरला. भारताच्या पहिल्या डावाच्या पाचशे धावांना प्रत्युत्तर देताना कासीम उमर आणि नजर यांनी दोनशे पन्नास धावांची भागीदारी केली. तेव्हा एकशे नव्यांणव धावांवर त्याला गोलंदाज शिवलाल यादवने यष्टीरक्षक सय्यद किरमाणीद्वारा झेलबाद केले.

भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन या धावसंख्येवर बाद होणारा दुसरा खेळाडू होता. 1986 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकशे नव्यांणव धावांवर तो पायचित झाला. ही त्याची  कसोटी क्रिकेटची सर्वोच्च धावसंख्या ठरली. इंग्लंड  आणि ऑस्ट्रेलिया हे ही परंपरागत प्रतिस्पर्धी समजले जातात. त्यांच्यात ‘ॲशेस चषका’ ची शंभराहून जास्त वर्षांची परंपरा आहे.

याच चषकासाठी खेळताना 1997 साली मँथु इलियट याला या धावसंख्येवर डॅरेन गॉफ याने त्रिफळाचित केले.

1997 साली सनथ जयसूर्या याने श्रीलंकन संघ भारत दौऱ्यावर असताना कुरुविला याच्याकडून त्रिफळाचित होण्याआधी एकशे नव्यांणव धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियन कप्तान स्टीव्ह वॉ वेस्ट इंडिज विरुद्ध ही धावसंख्या गाठताना आठ ते नऊ तास धावपट्टीवर होता. त्याला नेहेमाह पेरीने पायचित केले.

2006 साली युनिस खान हा पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघ पाक दौऱ्यावर असताना  या धावसंख्येवर बाद होणारा या  शतकातला पहिला खेळाडू ठरला.  हरभजनसिंगच्या अचूक क्षेत्ररक्षणामुळे तो धावबाद झाला.

इयान बेल हा  खरतर गुणवत्तेत कमी लेखला गेलेला इंग्लिश खेळाडू या धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना बाद झाला. पॉल हॅरीस ने  त्याला स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले.

2015 साली ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टिव्ह स्मिथ वेस्टइंडिज विरुध्द एकशे नव्यांणववर बाद झाला. या डावात सहा बळी घेतलेल्या जेरोम टेलरनेच त्याला बाद केले.

चेन्नईमध्ये 2016 साली के एल राहुल या भारतीय सलामीवीराने एकशे  नव्यांणव  धावा इंग्लंड विरुद्ध फटकावल्या. खरतर या सामन्यात करुण नायर याने तीनशे तीन धावांची अजोड खेळी केली होती. द्विशतक लवकर पूर्ण करण्याच्या नादात राहुलने आदिल रशीदच्या गोलंदाजीवर जोस बटलर कडे सोपा झेल दिला. या सामन्यात भारताने 759 ही भारताची सर्वोच्च धावसंख्या नोंदली.

2017 मध्ये डीन एल्गर या दक्षिण आफ्रिकेच्या विद्यमान कर्णधाराने बांगला देशाविरुद्ध 199 धावा केल्या. मुझफ्फर  रहमान याने त्याचा बळी घेतला.

2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्लेसिस याने श्रीलंकेविरुद्ध 199 धावा जोडून 621 ही धावसंख्या उभारायला हातभार लावला.

हा झाला इतिहासाने नोंदलेला सांख्यिकी लेखाजोखा. परंतु ‘मैलाचा दगड’ ठरेल अशी खेळी एका धावेने  हुकणे ही  नक्कीच क्लेशकारक गोष्ट ठरते. द्विशतक करून त्रिशतकी खेळी करण्याची संधी दार ठोठावत असताना एका धावेने द्विशतक हुकणे हे दुस्वप्नच!   त्यामुळे या खेळाडूंना  नक्की काय वाटत असेल ? 199 धावा  झालेल्या असताना न झालेल्या एका धावेची चुटपुट लागत असेल ? 199 धावा केल्याचा अभिमान असेल की एक धाव न मिळाल्याचे वैषम्य ? आपण ज्या अलिप्ततेने हा संख्यांचा पट मांडतो त्याच अलिप्तपणे ते पाहू शकत असतील की त्यांना हुकलेले द्विशतक वाकुल्या दाखवत असेल ?

‘ Cricket  Is A Game Of Chance’ असे म्हटले जाते. मिळालेल्या संधीच मापं पुरेपुर पदरात  घेऊन तिचं सोन्यात रूपांतर करणाराच  इथे ‘विक्रमादित्य’ म्हणून तळपतो.

– लेखन : शिल्पा सरदेसाई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments