कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला गेलं की, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ठरलेलाच असतो. आणि अमुक एक पाहुणे अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार असे हमखास वाक्य असतेच ! पण खरोखरच फक्त पाहुण्यांनाच वेळात वेळ काढून यावे लागते का ? श्रोतेही वेळात वेळ काढूनच आलेले असतात.. श्रोत्यांचेही आभार मानतात, पण आपणासारखे रसिक श्रोते अगदी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, ही फ्रेझ मात्र श्रोत्यांसाठी कोणी वापरली आहे, असे मला तरी आठवत नाही…
पण अगदी खरं सांगू ? वेळ ही खरोखरच अमूल्य अशी गोष्ट आहे. वेळ म्हणजे समय असा सर्वसाधारण अर्थ आपण घेत असलो तरी वेळ या शब्दाला अर्थाचे वेगवेगळे पदर आहेत. आपण खूप वेगवेगळ्या संदर्भात हा शब्द वापरतो.
उदा.. आपण कित्येक वेळा असे म्हणतो की, “बाप रे ! वेळ कसा गेला, कळलंच नाही…” खरं तर वेळ हा प्रकार त्याच्याच गतीने पुढे पुढे सरकत असतो.. पण आपण उद्योगात असलो की आपल्याला जाणवतं की वेळ कसा गेला कळलंच नाही..
याउलट आपण जेव्हा उद्योगात नसतो, कार्यमग्न नसतो, तेव्हा मात्र हा वेळ जाता जात नाही, आणि मग आपण “शी ! कसलं बोअर होतंय !” असं म्हणत बसतो..
दुसरं म्हणजे आपल्या आवडत्या माणसांच्या सहवासात रमताना आपला वेळ चटकन निघून जातो,पण आलेली व्यक्ती, समोरची व्यक्तिआपल्या पसंतीची नसेल तर तिच्याशी काय बोलावे हा प्रश्न पडतो, आणि वेळ जाता जात नाही..जोडीदाराच्या अकाली निधनामुळेही उरलेल्याचे आयुष्य अगदी धीम्या गतीने पुढे सरकत..
वेळ ‘घालविणे’ ही अजून एक कन्सेप्ट ! अशा वेळी काही माणसे चक्क चकाट्या पिटत हिंडत असतात !
आपली आजची तरुण पिढी आपल्या कामात, उद्योगधंद्यात कमालीची बिझी आहे. त्यांना सांगावे लागते, “अरे, आपल्या घरासाठी, आई वडिलांसाठी, बायका मुलांसाठी थोडा तरी वेळ देत चला रे ! “पण इतकं आपण बोलतोय ते नुसते ऐकून घ्यायलाही त्यांना वेळ नसतो..
उत्तरायण आणि दक्षिणायन यात बदलणारा दिवस रात्रीचा वेळ, दोन विभिन्न देशातील वेळेचे गणित, हा अजून एक वेगळाच प्रकार !
वेळ सूर्योदयाची, वेळ सूर्यास्ताची, वेळ तिन्हीसांजेची, वेळ दिवेलागणीची, असे आपण म्हणतो..तर पावसाने अगदी वेळ ‘गाठली’ असे आपण म्हणतो…
काही गोष्टी वेळ ‘साधून’ करण्याजोग्या असतात. आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याकडे मागायची आहे, कोणती परवानगी मागायची आहे, अशा वेळी त्याचा मूड पाहून वेळ साधावी लागते..
कधी कधी एखादी साधी गोष्ट, एखादा साधा विचार असतो, पण ‘अमक्या अमक्या वेळी एव्हडी साधी गोष्ट मला कशी काय नाही सुचली’ असे आपण म्हणतो..
वेळ काळ पाहून बोलावे, असे सर्वसाधारणपणे आपण म्हणतो, पण अनेकांना कोणत्या वेळेला आपण काय बोलावे याचा पोच नसतो, आणि मग वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करायची वेळ येते..
अजून 2/3 गोष्टी सांगता येतील..आपण सकाळी व्यायाम म्हणून फिरायला जातो..आपली मैत्रिण असते आपल्यासोबत.. खर तर व्यायामाला जाताना बोलू नये, गप्पा मारू नयेत, असे म्हणतात.. पण व्यक्ती दोन म्हणल्या की थोडं तरी बोलणं होतंच, आणि मग आपले भोज्याचे ठिकाण कधी येते कळतंच नाही, रस्ता लवकर कटतो, आणि मग आपण म्हणतो, “आज बोलायच्या नादात वेळ कसा गेला कळलंच नाही…”
आपण अनेक छंद जोपासत असतो. कोणताही छंद म्हणलं की झोकुन द्यावंच लागतं स्वतःला डिव्होशन लागतं.. भरपूर वेळ द्यावा लागतो त्यासाठी..मग आपण छंदात असलो की वेळ, तासच्या तास कसे निघून जातात काही पत्ताही लागत नाही…ज्याने स्वतःला कशातच गुंतवून घेतलेले नसते त्याला मात्र वेळ अगदी खायला उठतो.
आपल्या आवडीची गोष्ट, आपल्या आवडीचे काम असले, की माणूस आपली दैनंदिन कामे एकप्रकारच्या शिस्तीत उरकून वेळेचा सदुपयोग करून घेतो. प्रत्येक क्षण आणि क्षण उपयोगात आणतो..
पण याउलट सुट्टीच्या दिवशी बघा ना.. त्यादिवशी वेळच वेळ असूनही रोजच्या इतकीही कामे होत नाहीत..
आणि हो, ज्या गोष्टी आपल्याला करायची अजिबात इच्छा नसते, त्या गोष्टींसाठी मात्र स्वतःला वेळ असूनही, माणूस, ‘मला अजिबात वेळ नाहीये,’ हे सांगून ‘वेळ मारून’ नेतो. आणि ‘वेळ नाहीये’ ही सबब खूप छान असते..समोरचा माणूस त्यावर काहीही बोलू शकत नाही..!
एखाद्या गोष्टीची तारीख पूर्व नियोजित असली की मग माणूस वेळ मोजायला सुरवात करतो.. काउन्ट डाऊन सुरू होते.. ‘कर्म’ या सिनेमात तर या विषयावर दोन गाणीही आहेत.. एक आहे “समय तू जलदी जलदी चल”, आणि दुसरे आहे, “समय तू धीरे धीरे चल”….
काही वेळा तर इतक्या सुंदर असतात, की त्या वेळच्या साऱ्या आठवणी, सारे क्षण जपून ठेवावेत..माझ्याच आयुष्यातील एका सोनेरी वाढदिवसानंतर मी केलेली आभाराची एक कविता आहे…
‘क्लिक‘
वर्षामागूनी सरली वर्षे,
माहित नाही, अजुन किती..।
तुमच्या माझ्या भावबंधनातुनी,
सुंदर जुळली रेशीम नाती ।
असेच मिळू देत प्रेम तुमचे,
कळेना आभार मानू किती..।
त्यापेक्षा आजच्या साऱ्या दिवसालाच,
ठेवावे म्हणते “क्लिक” करुनी..
आजच्या साऱ्या दिवसालाच,
ठेवावे म्हणते, “क्लिक” करुनी…

– लेखन : सौ.अनुराधा जोगदेव. पुणे
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
वा! अनुराधाताई !वेळ या विषयावर किती सुंदर लिहीले आहे!