क्षितिजाच्या उंबरठ्यावर
बसले होते एकटी निवांत
विहंगम दृश्य पाहुनी
मन झाले शांत शांत..१
क्षितिजाच्या उंबरठ्यावर
अमळ विसावले जरा
आकाशीचा रंगोत्सवाने
शोभीवंत दिसे धरा..२
क्षितिजाच्या उंबरठ्यावर
विशाल सागराची गाज
क्षणभरात उतरवितो
माणसातील माज..३
क्षितिजाकडे पाहता
स्वप्ने बघितली नयनात
आज वाटते कृतार्थ
उतरली ती सत्यात..४
आयुष्याच्या संध्याकाळी
परमेशाचे नाम वैखरी
क्षितिजाच्या उंबरठ्यावर
कानी पडली भैरवी..५
रचना : डॉ दक्षा पंडित
सँनडिआगो, अमेरिका
संपादन : देवेंद्र भुजबळ
☎️ 9869484800