खरंच मी माझ्याशी रोज रोज भांडत असते
रोजच अनेक प्रश्न देवालाच विचारत असते…
खरंच सांग देवा तू अस्तित्वात आहेस काय ?
चराचरात आहेस ना मग इतका का अन्याय ..
महाल कुठे, झोपड्या किती तुला दिसत नाहीत ?
का उगाच सोंग घेतो, सारे तुला आहे माहित
दोन घास मिळत नाहीत अन्नासाठी तरसतात
महालात मात्र सोने मोती रोज बरसतात …
रातदिन राबतात बायका, तरी त्यांचे किती हाल ?
बघतोस ना तरी तिची उधडतात रोज खाल
काडीची किंमत नाही मान नाही स्थान नाही
देवळात तिला बसवतात नि उधे ग अंबे म्हणतात आई…
अब्रूचे तर धिंडवडे सरेआम निघतात रोज
असे कसे लिहिलेस रे बायकांच्या नशिबी भोग
आत एक बाहेर एक माणूस मात्र कमाल आहे
सारी सत्ता त्याच्या हाती बायका मात्र हमाल आहेत
हाडाची करतात काडे कुटूंबासाठी झिजतात किती
तिच्याच नशिबी लिहिलीस तू हाल आणि कपट नीती
कां कां देवा असे सांग मला उत्तर दे
भेदभाव करतोस रे दुटप्पी आहे तुझी रीती..
घे हाती सारी सत्ता तू आहेस दाखवून दे
न्याय नाही दिलास तरी अन्याय नको होऊ दे
बायका आणि मुलांशिवाय संसारालाअर्थ नाही
सुखी होतील संसार बघ सुखी कर आधी आई…..
— रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800