नमस्कार, मंडळी.
मथळ्यातच असल्या प्रमाणे “खरपूस आणि लोणकढ” असं काही लिहीत आहेत.. दीपाली मुकुंद दातार.
त्यांनी गेली २० वर्षे आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केले आहे.
त्यांना कविता, ललित लेख व कथा लेखनात विशेष रस आहे. निवडक कविता, ललित लेख हंस, शब्द दर्वळ, चपराक, पृथा, समतोल, रानवारा, सोलापूर संचार या दिवाळी अंकातून प्रसिद्ध ‘शारदीय मोरपिसे’ कवितांच्या जन्मकथांवर आधारित पुस्तक २०१९ साली प्रसिद्ध झाले आहे. सेतू अभिवाचन संस्थेतर्फे अनेक दर्जेदार साहित्याचे अभिवाचन त्यांनी केले आहे.
आल्हादिनी या संस्थेच्या त्या संस्थापक असून या संस्थेद्वारे साहित्यिक, सांगितिक, अध्यात्मिक अशा २३ कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.
न्यूज स्टोरी टुडे मध्ये त्यांचे हार्दिक स्वागत आहे…
आमच्या घरी दर पंधरा दिवसाला जमवलेल्या सायीला विरजण लावून त्याचे दही झाले की लोणी काढून तूप कढविणे हा उद्योग नेमाने होत असतो. अलीकडे हा उद्योग नोकरी करणाऱ्या महिला करत नसल्याचे कळले, एवढेच नाही तर ‘विरजण’ हा शब्द देखील त्यांच्या शब्दकोशातून हद्दपार झाल्याचे समजल्यावर आमच्याकडचा हा उद्योग अगदी वाखाणायलाच हवा असे मनातून वाटले.
पहिल्या वाफेचा गरम गुरगुट्ट्या भात, साधं वरण, लिंबाची चतकोर फोड आणि त्यावर घरच्या साजूक तुपाची धार आम्हाला भलतीच प्रिय. शिवाय सणावारी पुरणावरणाचा नैवेद्य केला की त्यावर घरी कढवलेले खमंग ताजे तूप अगदी हवेच हवे. अशावेळी आपल्याला कोलेस्ट्रॉल वगैरे असल्याच्या आठवणी आम्ही माळ्यावरल्या बासनात मस्त गुंडाळून ठेवतो आणि रवाळ तुपाचा मनसोक्त आस्वाद घेतो.
तर आजही घरी तूप कढविण्याचा कार्यक्रम चालू होता. लोणी अंमळ जास्तच निघल्याने आणि इतर सर्वच कामे आटोपल्याने गॅसशेगडीच्या मंद आचेवर लोण्याचे भांडे ठेवून, मी बाल्कनीतल्या खूर्चीत बसून बाहेर पडणारा रिमझिम पाऊस निवांतपणे पाहत होते. तूप कढल्याचा खमंग वास यायला अजून बराच वेळ असल्याने मनास घटकाभर उसंत मिळाली होती.
पावसाकडे पाहता पाहता मस्त तंद्री लागली असताना कसे काय कोण जाणे पण विंदा करंदीकरांचा ‘खुर्च्यांनाही मने असतात’ हा लघुनिबंध आठवला आणि गालातल्या गालात हसू येऊ लागले. विंदा या लेखात म्हणतात “भारताच्या अर्वाचीन इतिहासाचे दोन खंड पडतात. तक्क्यांचे युग आणि खुर्च्यांचे युग. खुर्च्यांच्या युगात जन्माला आल्यामुळे आपण खुर्च्यांना अडखळत अडखळत आयुष्याचा एकेक टप्पा गाठत असतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर एकेक खुर्ची उभी असते. आता उभी असते हा शब्द प्रयोग पुष्कळांना पटणार नाही ! पण खुर्च्या उभ्या असतात की बसलेल्या ?”
स्वतः विद्यार्थी असताना विंदांना एकच खुर्ची वेगवेगळ्या अवस्थेत दिसते. राज्यशास्त्राच्या व्याख्यानानंतर ती त्यांना झोपलेली दिसे, संस्कृतच्या व्याख्यानांनंतर बसलेली वाटे, तर इंग्रजीच्या व्याख्यानानंतर ती एकदम उभी असल्याचा भास होई. असे वाटण्यामागे काय लॉजिक होते ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण मला मात्र या कल्पना फार गमतीशीर वाटल्या.
माझेही मन नकळत शाळकरी झाले आणि विचार करू लागले की, आमच्या वर्गातली खुर्ची इतिहासाच्या तासाला पेंगत असायची की भूगोलाच्या ? मराठी, इंग्रजी, संस्कृतच्या तासाला मात्र ती खुर्ची अगदी टक्क जागी असायची. संस्कृतच्या तासाला तर इतकी की, विसर्गाचा उच्चार करतेवेळी पोटात खड्डा पडतो का काय ?,
शहामृगाचा ‘श’, पोटफोड्या ‘ष’ यांचे उच्चार नीट झालेत का, उच्चार करताना जीभ कधी, कुठे नि किती टाळ्याला लावली हे सारे ती बारीक नजरेने पहायची. विशेषतः ‘आशिष’ ह्या आमच्या मित्राला संस्कृत मध्ये नाव सांगावे लागले तर धडकीच भरायची. मग आपल्या नावातला आधी शहामृगाचा ‘श’ बरोबर म्हणून नंतर षटकोनाचा ‘ष’ म्हणताना एकदा त्याची जीभ जी टाळ्याला लागली ती पुन्हा खालीच येईना.
पुढे कितीतरी दिवस वर्गात तो गप्प गप्प रहायचा ते त्याच्यामुळेच की काय, असे कधी कधी आम्हाला वाटायचे. खुर्च्यांचा मनाचा विचार करणारे विंदा लेखात शेवटी या निर्णयाप्रत येतात की या खुर्च्यांना विनोदाचेही अंग आहे. त्याचे असे झाले, घरासमोरच्या बंगल्यात एक गुजराथी शेटजी रोज संध्याकाळी आपल्या प्रशस्थ अशा गच्चीत एका वाटोळ्या खुर्चीत डुलत असलेला त्यांना दिसायचा. एकदा न राहवून त्यांनी त्या गुजराथ्याला त्याविषयी विचारले की, “रोज असे डुलत बसण्याचा तुम्हाला कंटाळा येत नाही का ?” तर शेटजी म्हणाले, “अरे बाबा ये तो आमचा व्यायाम हाय. ”डुलकी काढत असतानाच एवढे शब्द विंदांशी बोलून शेटजी गच्चीतून बंगल्यात उठून गेले पण पुढे दोन मिनिटे ती खुर्ची तशीच डुलत राहिली. व्यायामाच्या या अभिनव प्रकाराचे एकीकडे आश्चर्य वाटत असतानाच दुसरीकडे त्यांना वाटले की, ती खुर्ची त्या शेटजीला वेडावत तर नसावी ? मग त्यांच्या मनात हळूच विचार आला की, ही खुर्ची वात्रट तर नसेल ना ?
– लेखन : दीपाली दातार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800