आमचा मुलींचा गृप तसा हुशार होता पण काहीवेळेला साध्या चुका झाल्या म्हणून पेपर देऊन बाहेर पडलो की हळहळ वाटायची. नेमके काही मुलांनी हे कधी हेरले कुणास ठाऊक. बारावीच्या सेंड ऑफच्या दिवशी आमच्या गृपलाच फिशपोण्ड मिळाला-‘मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, जवाब याद आते है पेपर होने के बाद..’. आमच्या रसायनशास्त्राच्या तासाला मुले प्राध्यापकांना विचित्र त्रास द्यायची. सरांचा आवाज फार बारीक होता आणि त्यांना शिकवण्याचे रसायनही काही केल्या जमत नव्हते. मागच्या बाकावरच्या मुलांना तर काहीच ऐकू यायचे नाही. मग त्यांच्या तासाला ‘म्याव-म्याव’ सुरू झाले. आम्हाला वाटले की कुणीतरी मांजराचा आवाज काढते आहे. पण नंतर कळले की एका मांजरला मुलांनी प्रत्यक्ष वर्गात आणून बाकाखाली लपवून ठेवले होते. सरांनी अर्थातच शिक्षा केली त्यांना, पण मांजराने वर्गात त्यावेळी धुमाकूळ घातला आणि सरांना सळो की पळो करून सोडले शिवाय तास झाला नाही तो नाहीच. आम्हाला त्यावेळीमांजराचे वर्गात येणे इतके विनोदी वाटले होते की, नंतर त्या आठवणींचे मांजर पुढे अनेक वर्षे आमच्या मनात अधून मधून ‘म्याव-म्याव’ करीत राहायचे, सरांची आगतिकताही जाणवायची.
मांजरे डोळ्यापुढे आली तेव्हा मला अचानक लक्षात आले की आपल्या लाडक्या कवयित्री शांताबाई शेळके यांना मांजरे फार आवडायची अगदी माणसांइतकीच! कदाचित त्यामुळेच ती त्यांच्या लेखनातही जागोजागी आली आहेत.
१९९६ साली शांताबाई जेव्हा एकोणसत्तराव्या अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या तेव्हा गमतीने वि. वा. शिरवाडकर म्हणाले होते, “मांजरांकडे लक्ष ठेवा. नाहीतर शांताबाईंबरोबर शे-दीडशे मांजरेही व्यासपीठावर जाऊन बसतील. ”या विधानातून स्टेजवर शंभर मांजरांसह विराजमान झालेल्या शांताबाई माझ्या डोळ्यापुढे कुसुमाग्रजांनी उभ्या केल्या होत्या.
मनाच्या अंगणात मिस्किलविनोदी रिमझिम सुरू असताना पाऊस एकदमच थांबला. विचारांची साखळी तुटली तसा नाकाला वास येऊ आला. फार नाही पण थोडासा उशीरच झाला होता, तूप जरा अधिकच कढले होते. खमंग होऊन करपण्याच्याच बेतात होते तितक्यात मी पटकन उठून गॅस बंद केला. रात्रीच्या वेळी कढवलेले ते ताजे तूप, गरम भात आणि मेतकूट यांच्यावर घालून घेताना माझ्या नवर्याचने कोपरखळी केली, “आज तूप खरपूSSSSस नाही तर करपूSSSSस झालेय. पण असू देत ग, ते ही खमंगच लागते आहे बघ. ”आता त्याला काय ठाऊक की माझ्या खुसखुशीत, खमंग आठवांचे कढ त्यात उतरलेत म्हणून एवढे छान लागते आहे ते !

– लेखन : दीपाली दातार
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
छान झालाय! एकदम फक्कड