15 मार्च 1977. मेजर संदीप उन्नीकृष्णन याचा जन्मदिवस !! आज त्याच्या 46 व्या जयंती दिनानिमित्त हा विशेष लेख.
मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना विनम्र अभिवादन.
– संपादक
26 नोव्हेंबर 2008.
वेळ : रात्रीची
स्थळ : ताज महल पॅलेस हॉटेल, मुंबई.
आपण जेव्हा सर्व जण हॉटेल वर चालू असलेल्या लाईव्ह हल्ल्याच्या बातम्या बघत होतो, तेव्हा प्रत्यक्षात एक 31 वर्षाचा तरुण मेजर हॉटेलच्या आत मध्ये जखमी अवस्थेत दहशतवाद्याशी दोन हात करत होता….
नाव होते.. मेजर संदीप उन्नीकृष्णन !
मूळचा केरळ राज्यातील कोझिकोडे जिल्ह्यातील चेरूवनूर येथील असलेला हा परिवार बेंगलोरला येऊन स्थायिक झाला होता.
संदीप….आईवडिलांचा एकुलता एक मुलगा !
वडील निवृत्त आयएसआरओ अधिकारी तर आई गृहिणी..
लहानपणापासूनच गुणी असलेल्या संदीपच्या रोमारोमात देशप्रेम भरलेलं होत. शाळेपासून खेळामध्ये आवड असलेला एक अथॅलेटिक, अष्टपैलू तरुण संगीतामधेही रुची ठेवत असे.
1995 साली संदीपने NDA जॉईन केले. NDA सारख्या सैन्याच्या अकादमी मधून बाहेर पडल्यानंतर त्याला 12 जुलै 1999 ला बिहार रेजिमेंटची सातवी बटालियन मध्ये लेफ्टनंट पदावर रुजू करण्यात आले. त्या नंतर त्याने जम्मू कश्मीर, राजस्थान या ठिकाणी आपले कर्तव्य चोख बजावले.
संदीप हा सर्व अधिकाऱ्यांचा आवडता विद्यार्थी होता. त्याला त्याच्या वयाने लहान आणि मोठे सर्वच पसंद करायचे. भारतीय सेनेतील सर्वात कठीण प्रशिक्षण
“घातक कमांडो कोर्स” पूर्ण करून त्यात त्याने वरच्या क्रमांकाचे स्थान मिळवले. (या ट्रेनिंग मध्ये 40 km अंतर 35 kg चे आपले साहित्य आणि सामान घेऊन ठराविक वेळेत पार करावे लागते. हा फक्त एक मुद्दा सांगतो यावरून याच्या कठोरपणाची कल्पना येईल). त्याच्या हया साहसी आणि निडर गुणामुळे त्याने NSG कमांडो पद मिळवले.
त्याची शारीरिक क्षमता आणि दुर्दम्य साहस बघून त्याची निवड NSG कमांडोसाठी झाली होती.त्याने प्रक्षिक्षण पूर्ण केल्यानंतर 2007 साली त्याला NSG च्या स्पेशल ग्रुप मध्ये ठेवण्यात आल.
कारगिल युद्धाच्या वेळी प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊन त्याने आपलं धैर्य दाखवलं होत. पाकिस्तानी सैन्याच्या होणाऱ्या तोफांच्या हल्ल्यात व दारुगोळ्यांच्या वर्षांवामध्ये संदीपने सहा सैनिकांच्या एका टीमचे नेतृत्व केले होते. शत्रूपासून अगदी जवळच्या अंतरावर संदीप ने एक पोस्ट बनवली. त्या दरम्यान तो शत्रूची प्रत्यक्ष हालचाल आणि रणनीती यांची माहिती मिळवत होता.
ऑपरेशन ” ब्लॅक टोरनेडो “……
संदीपच्या खऱ्या साहसाचं आणि धैर्याचं प्रदर्शन हे 26/11 च्या मुंबईवर झालेल्या हल्ल्यात दिसून आले. त्यातील चार आतंकवादी ताज हॉटेलच्या आत घुसले होते.
26 नोव्हेंबर 2008. दक्षिण मुंबईतील अनेक प्रतिष्ठित इमारतींवर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. त्यापैकीच एक इमारत होती जिथे अतिरेक्यांनी हल्ला करून लोकांना बंधक बनवले, ती म्हणजे ताजमहल पॅलेस हॉटेल.!!
या आत्मघाती हल्ल्याची पार्श्वभूमी सांगणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे.
अतिशय सुनियोजितपणे केलेला हा प्लॅन पाकिस्तानात खूप दिवस आधी शिजला होता.
लष्कर -ए -तैयबा ने आतंकवाद्यांना मानशेरा, मुजफ्फराबाद या ठिकाणी प्रशिक्षण दिलेले होते.
सुरुवातीला एकूण 32 आतंकवादी या हल्ल्यासाठी निवडले गेले. त्यातून 13 जणांची निवड करण्यात आली, जे हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करू शकले. प्रशिक्षणात त्यांना आत्मघातकी हल्ला, सर्व प्रकारचे हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण आणि जर भारतात पकडले गेले तर पोलीस किंवा आर्मीने दिलेला त्रास सहन करण्याची हिंमत हे सामील होते.
एकूण 13 अतिरेक्यांपैकी तीन अतिरेक्यांना कश्मीर मधील दुसऱ्या मोहिमेवर पाठवून दहा जणांची मुंबई हल्ल्यासाठी निवड करण्यात आली.
इस्माईल खान हा ग्रुपचा लीडर होता.
हल्ल्यापूर्वी काही दिवस या दहा जणांना कराची मध्ये एका गुप्त जागेत ठेवण्यात आले. त्यांचा कुणाशीही संपर्क येऊ दिला नाही. या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार झाकी उर रहमान लखवी, अबू हमजा, युसूफ ऐलियास मुझमिल आणि खाफा हे होते.
मुंबई कडे प्रवास….
एका छोट्या बोटीतून 22 नोव्हेंबर 2008 सकाळी आठ वाजता या दहा आतंकवाद्यांनी कराची बंदर सोडले.
40-45 मिनिटाच्या प्रवासानंतर त्यांना एका मोठ्या बोटीमध्ये शिफ्ट करण्यात आले तिचे नाव होते
“अल हुसेनी”. त्यामध्ये अगोदर पासून सात आतंकवादी मदतीसाठी उपलब्ध होते. एक संपूर्ण दिवस त्यांनी ह्या बोटीवर घालवला. 23 नोव्हेंबर 2008 दुपारी तीन वाजता त्यांना एक भारतीय बोट ‘एम व्ही कुबेर’ ही नजरेस पडली. तिच्यामध्ये पाच भारतीय होते. त्या सर्वांनी एम व्ही कुबेर वर कब्जा केला आणि चार जणांना तिथेच मारून टाकले. त्या मासेमारी बोटीचा कप्तान अमरसिंग सोळंकी त्याला जिवंत ठेवून त्याला बोट मुंबईच्या दिशेने न्यायला लावली.
26 नोव्हेंबर 2008 दुपारी चार वाजता मुंबईपासून काही अंतरावर त्यांनी बोट थांबवली. जसा थोडासा अंधार पडला, इस्माईल खानने पाकिस्तान मध्ये संपर्क करून गाईड करणाऱ्या हँडलरला माहिती दिली.त्यांनी सांगितले “आता जहाजाच्या कॅप्टनला मारून टाका”. इस्माईल खान ने सोळंकी याला तिथेच मारून टाकले.व उरलेले जवळपास एक तास पंधरा मिनिटांचे अंतर ते स्वतः बोटीने पार करून मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला लागले.
किनाऱ्यावर उतरताच अगोदर ठरल्याप्रमाणे त्यांनी पाच जोड्या बनवल्या. प्रत्येक जोडीत दोन अतिरेकी.
टीमचा कप्तान इस्माईल खान ची जोडी अजमल अमीर कसाब बरोबर होती.
पाचही जोड्या टॅक्सी करून वेगवेगळ्या दिशांनी निघाले. पैकी दोन जोडींनी टॅक्सीतून उतरताना टॅक्सी मध्ये स्फोटके पेरली होती ज्याचा नंतर स्फोट होऊन दोन टॅक्सी ड्रायव्हर मारले गेले.
रात्री 9.15 च्या सुमारास अजमल कसाब आणि इस्माईल खान हे CST रेल्वे स्टेशनमध्ये घुसले आणि अंदाधुंद गोळीबार सुरु केला त्याचबरोबर ग्रेनेड ही फेकले.
त्या ठिकाणी 58 लोक मृत्यूमुखी पडले तर 104 जण गंभीर जखमी झाले. या वेळी त्यांना कंट्रोल करणे हे आपल्या पोलीस दलाला खूप मोठे आव्हान होते.
अशावेळी प्रसंगावधान राखून कित्येक लोकांचे प्राण वाचवले ते सीएसटी रेल्वे स्टेशन असलेले अनाऊन्सर श्री.विष्णू झेंडे यांनी.!! त्यांना जेव्हा स्टेशनवर मोठ्या धमाक्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी ताबडतोब परिस्थितीचा अंदाज घेतला. पहिल्या मजल्यावरून नेमके खाली काय होते हे बघितले तेव्हा त्यांना दोन आतंकवादी हातात बंदूक घेऊन अंदाधुंद फायरिंग करताना दिसले. सोबत ते ग्रिनेड ही फेकत होते. ताबडतोब ते अनाउन्समेंट रूममध्ये गेले आणि हिंदी आणि मराठीतून अनाउन्समेंट चालू केली. “आतंकवादी हल्ला झालेला आहे. बाहेर जाण्यासाठी प्लॅटफॉर्म नंबर एकचा वापर करा. सर्वांनी प्लॅटफॉर्मच्या बाहेर जा. पुढे येऊ नका.”
त्यानंतर हे दोन अतिरेकी ब्रिज पार करून कामा हॉस्पिटल कडे निघाले . कामा हॉस्पिटल जवळ त्यांना पुन्हा पोलिसांच्या टीमचा सामना करावा लागला. आणि समोरच्या पोलिसांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार चालू केला. त्या ठिकाणी चार पोलीस अधिकारी शहीद झाले.पोलिसांच्या बॉडीज गाडीतून बाहेर काढून त्यांनी पोलिसांच्या गाडीचा ताबा घेतला. परंतु ती गाडी गिरगाव चौपाटीच्या पोलिसांच्या नाकेबंदी मध्ये अडकली. तिथे झालेल्या फायरिंग मध्ये इस्माईल खान हा मारला गेला तर अजमल कसाबला तुकाराम ओंबळे त्यांनी जिवंत पकडले.
दुसऱ्या बाजूला लिओपोल्ड कॅफे कडे दोन आतंकवादी गेले होते, हाफिज अर्शद आणि नासर… त्यांनी अंदाधुंद गोळीबार करून काही ग्रेनेड फेकले. त्या ठिकाणी जवळपास दहा नागरिक मारले गेले आणि कित्येक जखमी झाले. त्यानंतर पाचच मिनिटात हे दोन अतिरेकी ताजमहल हॉटेल कडे निघाले.
ताजमहल हॉटेल ही मुंबईतली खूप जुनी वास्तू. 1903 साली बांधलेल्या ह्या हॉटेलच्या दोन विंग होत्या. एका विंग मध्ये 290 रूम्स तर ताज टॉवर मध्ये 275 रूम…
एकूण चार आतंकवाद्यांनी ताजमहल हॉटेलला टार्गेट केले होते. पहिल्या जोडीने रात्री साडेनऊच्या सुमारास आत मध्ये प्रवेश करत ओपन फायरिंग सुरू केले. काही मिनिटात त्यांनी वीस लोकांवर गोळीबार केला. दुसऱ्या जोडीने उत्तरेच्या दिशेने फायरिंग आणि ग्रेनेड फेकत आत प्रवेश केला.
अतिरेक्यांनी ताजमहाल हॉटेलच्या मध्यवर्ती घुमटाखाली बॉम्ब फेकले, त्यामुळे प्रचंड आग लागली जी नंतर ताजच्या वरच्या मजल्यांवर भडकली.
चौघेही अतिरेकी हेरिटेज विंगच्या सहाव्या माझ्यावर पोहोचले. जो कोणी समोर येईल त्याला ते मारत चालले होते. सहा पोलीस अधिकाऱ्यांनी येथेच हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मार्कोस कमांडो हॉटेलमध्ये दाखल झाले.
दुसऱ्या दिवशी नॅशनल सेक्युरिटी गार्ड्स हे दिल्लीहून आले आणि त्यांनी ऑपरेशनचा ताबा घेतला. हॉटेलच्या आतमध्ये खूप भयानक परिस्थिती होती. हॉटेलमधील उतरलेल्या बहुतेक पाहुण्यांनी भीतीने दरवाजे आतून बंद करून घेतले होते.
सरकारला स्पेशल कमांडो फोर्स बोलवण्याशिवाय पर्याय नव्हता. दहशतवादी हे अत्याधुनिक हत्यारांसहित हल्ला करत होते. पूर्व तयारीनीशी आलेल्या आतंकवाद्यांकडे एके 47, युद्ध सामग्री, 9MM पिस्तूल, हॅन्ड ग्रेनेड काही ड्रायफ्रूट्स व एका स्वतंत्र बॅग मध्ये IED. त्यांच्याशी जर मुकाबला करायचा तर प्रशिक्षित कमांडो शिवाय पर्याय नव्हता.
मुंबईमधील हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी नॅशनल सेक्युरिटी गार्ड्सला दिल्लीहुन पाचारण करण्यात आले.
कमांडोच्या टीमसह एक स्पेशल विमान मुंबईत दाखल झालं.
ऑपेरेशनच नाव होत
“ब्लॅक टोरनेडो “!!
“51 स्पेशल ॲक्शन ग्रुप” हे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे (NSG)एक युनिट आहे. संपूर्ण जगात केवळ भारतीय NSG कमांडो हे सगळ्यापेक्षा वेगळे आहेत त्याचे कारण हे ऑफेन्सिव अटॅक करतात. तर इतर सर्व डिफेन्सिव्ह अटॅक करतात. म्हणजे NSG कमांडो स्वतःचा जीव वाचवून लढत नाही तर जीव धोक्यात घालून, मृत्यूची जोखीम पत्करून शत्रुशी लढतात.हे युनिट भारतातल्या कोणत्याही प्रकारच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला नेस्तानाबूद करून बंधकांना दहशतवाद्यापासून सोडवण्यासाठी कटिबद्ध असते. या युनिट मधील कमांडोंना सर्व प्रकारचे कठीण प्रशिक्षण दिलेले असते. अतिरेक्यांनी केलेला हल्ला मग तो हवा, पाणी,जमीन कोणत्याही स्तरावर असेल त्या ठिकाणी हे कमांडो जाऊन आपले ऑपरेशन पार पाडतात.यांचे ब्रीद वाक्यच आहे, “सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा “.
संदीप याच युनिटच्या 10 कमांडोंचा टीम कमांडर होता. त्यांच्यावर हॉटेलमध्ये असलेल्या दहशतवाद्यांना संपवणे आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या बंधकांना सुरक्षित सोडवणे हे मुख्य टार्गेट होते.
दहा कमांडोंचा ग्रुप घेऊन संदीपने आत हॉटेलमध्ये प्रवेश केला.
अतिरेक्यांच्या तावडीतून 14 बंधकांची सुटका करण्यात संदीप आणि त्यांची टीम यशस्वी झाली होती.
जिन्याने सहाव्या मजल्यापर्यंत कमांडो पोहोचले. त्यांच्यानंतर असे लक्षात आले की आतंकवादी हे तिसऱ्या मजल्यावर आहेत. आतंकवाद्यांनी काही महिलांना बंधक बनवून दरवाजा आतून बंद केलेला होता.
संदीप आणि त्यांच्या टीमने तो दरवाजा तोडला. परंतु आतंकवाद्यानी केलेल्या राऊंड फायर मध्ये संदीप चा सहयोगी सुनील यादव हा पूर्णपणे घायाळ झाला. त्याला आठ गोळ्या लागल्या होत्या. अशाही परिस्थितीत संदीपने अतिरेक्यांशी लढा चालू ठेवला व त्याचबरोबर जखमी सुनील यादव ला सुद्धा सुरक्षित बाहेर काढले. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी पुन्हा आतंकवाद्यांचा पाठलाग चालू केला. तोपर्यंत आतंकवादी हे हॉटेलमधील दुसऱ्या मजल्यावर पोहोचले होते. परंतु संदीप हा त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग करत राहिला.आणि हा पाठलाग करत असतानाच अचानक एका आतंकवाद्याने संदीप वर पाठीमागून फायरिंग करून संदीपला घायाळ करून टाकले. त्याच ठिकाणी संदीप हा गंभीरपणे जखमी झाला आणि त्याला वीरमरण प्राप्त झाले.
हॉटेल मध्ये एकूण चार आतंकवादी होते. त्या चौघाना यमसदनी पाठविण्यात आपले कमांडो यशस्वी झाले.
त्यांच्या खिशात भारतीय बनावट ओळखपत्र आणि हातामध्ये भगवा धागा मुद्दामहुन बांधला होता जेणेकरून भ्रम निर्माण होईल.
हॉटेलमध्ये उतरलेले पाहुणे आणि हॉटेलचा स्टाफ असे एकूण 32 लोक दहशतवाद्यांनी ठार केले. तर 450 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले.
संदीपने आपल्या सहकाऱ्यांना सांगितलेले की,
“तुम्ही वरती येऊ नका, मी सांभाळून घेतो.” आणि हेच त्याचे शेवटचे शब्द होते.
26 जानेवारी 2009 रोजी संदीपला मरणोप्रांत भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘अशोक चक्र‘ ने सन्मानित करण्यात आले.
देशासाठी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी वीरमरण प्राप्त करणाऱ्या या कमांडोंने देशासाठी आपले जीवन खरोखर दान केले.
हे आपल्या देशाचे खरे ‘हिरो’ आहेत, ना की स्वार्थी राजकारणी किंवा फिल्मी कलाकार…
ह्या महान कमांडोचे स्मरण करून भावपुर्ण आदरांजली !!!!

– लेखन : प्रकाश फासाटे.. मोरोक्को.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
देशाच्या सुरक्षेसाठी आणि मानवतेच्या रक्षणासाठी झुंज देत मृत्यूला कंटाळलेल्या शूर सैनिकाची मन हेलावून टाकणारी शौर्यगाथा.
देशाच्या सुरक्षेसाठी आणि मानवतेच्या रक्षणासाठी झुंज देत मृत्यूला कंटाळलेल्या शूर सैनिकाची मन हेलावून टाकणारी शौर्याचा.