Sunday, December 22, 2024
Homeलेखखरीखुरी माऊली

खरीखुरी माऊली

अलीकडेच एक संस्मरणीय तोलामोलाची भेट घडली. नगरजवळील शिंगवे येथील, मनगाव माउली सेवा प्रतिष्ठानचे विख्यात समाजसेवी डॉ राजेंद्र धामणे यांना फोनवर विचारले, ‘आहात काय’ माउली ‘त, येऊ काय ? ‘
डॉक्टरांनी सांगितले,
‘ जरुर या .. ‘
मनाला ऊर्जा देणाऱी ही भेट ठरली.

बेघर, निराधार, मनोविकार असलेल्यारल, असाध्य विकारांनी गांजल्या पिडलेल्या महिला रुग्णांना वैद्यकीय उपचार, स्वयंपूर्णता आणि निवारा देऊन उभे करणारे मनगाव डॉ राजेंद्र आणि डॉ. सुचेता धामणे यांनी शिंगवे परिसरात माउली सेवा प्रतिष्ठानच्या रुपाने उभारले ही फार तोलामोलाची – अनमोल कामगिरी त्यांनी केली आहे. हे काम सोपेही नव्हते अन् अक्षरशः शून्यातून उभारले. फार फार जिकिरीचे.

माऊली प्रतिष्ठानच्या स्थापनेविषयी सुरुवातीला ऐकल्यापासून होता होईल तेवढा अल्पस्वल्प मदतीचा खारीचा वाटा मी उचलत गेलो. तेंव्हापासून डॉ धामणेंचा परिचय घडत गेला होता. तरीही प्रत्यक्ष भेट यावेळी घडली आणि मनगावची थक्क करणारी घडण पाहता आली.

पॉन्डिचेरीहून दुपारी परतलेल्या डॉक्टरांनी प्रवासातील शीणभाग दगदग असूनही मी फोनवरून ‘ शिंगवेत , येतोय .. ‘ असे म्हटल्यावर आवर्जून या म्हणाले !

‘ माउली ‘ तील रुग्णांचे , पीडित – वंचितांचे व्यवस्थापन अत्यंत नेटके , शिस्तबद्ध आणि थक्क करणारे . हे अवघे काम वाटते तेवढे साधेसरळ अन् सोपे मुळीच नव्हते आणि नाही याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. नात्यागोत्यातील तसेच सख्ख्या माणसांना आपत्तीत, आजारपणात ( अनेक ठिकाणी ) लोक कसे पाहतात , वागवतात ते जगरहाटीत अवतीभवती आपण पाहतोच ! इथेतर डॉ . राजेंद्र आणि डॉ . सुचेता या दांपत्याने केवढ्या काळजीकाट्याने – निगुतीने उपेक्षित विश्वाचं सह्रदय पालकत्व स्वीकारलेलं आहे .

अक्षरशः रस्त्यावरल्या भयाण जगण्याला इथल्या ‘ माउलीत ‘ पुनर्जन्म लाभतो असे म्हणावे लागेल . जगण्याचे नवे प्रकाशपर्व सुरु होते . आश्वासक आधार मिळतो . मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगण्याला , उभे राहण्याला सामर्थ्य प्राप्त होते . बळ लाभते . आजारपण अन् नैराश्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या जीवाला आभासी जगतात या ‘ माउलीत ‘ मिळणारा अपार मायेचा संवेदनशील आसरा लाख लाख मोलाचा .. अवर्णनीय . आपण जगणार हा आत्मविश्वास काय जगात विकत थोडेच मिळतो देवा ! तथापि इथे मात्र कमालीच्या सोशीकतेने ही अनुभूती डॉ . राजेंद्र – डॉ . सुचेता देतात.

‘ मनगाव ‘ चे लोकार्पण झाले तेंव्हा प्रकल्पाच्या परिपूर्तीचे समाधान जेवढे डॉ . धामणेंना झाले त्यापाठोपाठ निर्मितीसाठी झालेले अपार – अतुलनीय परिश्रम आणि खर्च याबद्दल बाहेरच्या विश्वाला क्वचितच समग्र माहिती असू शकते .. चांगली माणसं जगात कमी असतील, असतात. मात्र समाजातील दानशूर घटकांनी , संवेदनशील – जागरुक भान असणाऱ्या माणसांनी वेळोवेळी या प्रकल्पाला मदत केली आणि करत आहेत .

मनगाव – माऊलीतील वेगवेगळे उपक्रम प्रेरणादायी आहेत . येथून निघताना डॉक्टरांनी ( प्रकल्पाच्या कार्याला साजेशी असणारी ) दिलेली माऊली संत ज्ञानोबारायांच्या पसायदानाची भेट प्रतिमा सर्वार्थाने साजरी म्हणावी लागेल .. पसायदानाचा खराखुरा आशय समजलेली ही खरी समाजव्यवस्थेतील जिगरबाज देवमाणसं ! यापेक्षा अधिक काय बोलावं ?
— लेखन : डॉ.सुनील शिंदे. अकोले, नगर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. डॉ. धामणे पती- पत्नीं ना विनम्र अभिवादन आणि salute ! समाज कल्याणासाठी जिवाचे रान करणारे हे सैनिकच !
    डॉ. सुनील शिंदे यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्यामुळे या थोर कार्याची माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments