शीर्षक वाचूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या जातील. ते स्वाभाविक आहे. कारण शिक्षकाच्या लग्नाची दखल घ्यायचे कारण काय ? अन् हे शिक्षक आहेत तरी कोण ? पण एक शिक्षक या नात्याने मला या चांगल्या नव्हे उत्तम शिक्षकाची दखल घ्यावीशी वाटली. कारण दखल घेण्यासारखेच या शिक्षकाचे कर्तृत्व आहे. मी ज्या शिक्षकांबद्दल लिहितोय त्यांचे नाव खान सर आहे.
हे बिहार पटना येथे असतात. मागे इथूनच सुपर थर्टी क्लासचा जन्म झाला. त्यावर अमिताभ बच्चन नायक असलेला चित्रपट देखील निघाला. बिहारचे मागासलेपण, तिथल्या शिक्षणाचा दर्जा यावर बरेच (वाईट) बोलले जाते. पण इथेही प्रवाहाविरुद्धः पोहून बदल घडवून आणणारे लोक आहेत. जयप्रकाश नारायण इथलेच हे विसरता कामा नये. बिहारची अनेक तरुण मंडळी दिल्लीला जाऊन यू पी एस ची तयारी करतात. त्यातले काही यशस्वीही होतात या कहाण्या आपण ऐकल्या आहेत.
असेच गेल्या दशकात शिक्षणाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे खान सर. त्यांचे अनेक इंटरव्ह्यू यू ट्यूब वर उपलब्ध आहेत. व्हिडिओ आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ते बघावे. या माणसाने शिक्षण सहज सोपे सरल सरस करण्याचा विडा उचलला आहे. कोणतीही संकल्पना सोपी करून, प्रत्यक्ष व्यवहारातील उदाहरणे देऊन समजावण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. तेही शुद्ध हिंदीत ! त्यामुळे इंग्रजी भाषेचा अडथळा येण्याची शक्यता नाही. विषय समजण्याशी मतलब. तो कोणत्या भाषेत समजावला याला महत्व नाही.

अगदी आठ दहा विद्यार्थी संख्ये सह सुरू झालेल्या खान सरांच्या क्लासमध्ये आज लाखो विद्यार्थी शिकतात. करोना ने अनेकांच्या मनात धडकी भरली होती. पण त्या काळात काही चांगले देखील झाले. ऑन लाइन शिक्षण ऑन लाइन (ऑफिसचे) काम हे नवे प्रकार जन्माला आले. त्याचाच फायदा खान सराना मिळाला. त्यांनी नवे तंत्र शिकून ऑनलाईन क्लासेस सुरू केले. अन् बघता बघता त्यांच्या विद्यार्थ्याची संख्या भूमिती श्रेणीने वाढली. आधी बारावी पर्यंत शिकवणारे खान सर आता हळू हळू हिंदी माध्यमातून यू पी एस सी चेही काही निवडक विषय शिकवतात. या वर्गांची दिल्ली सारख्या मेट्रो शहरातील वार्षिक फी लाखोच्या घरात असते हे सर्वमान्य उघडे गुपित. पण खरंतर कमी पैशात शिकवतात. अगदीच गरीब असेल तर फी न घेता देखील शिकवतात. ट्युशन माफियानी त्यांना त्रास देण्याचा, करोडो रुपयात त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण खान सर डगमगले नाहीत. त्यांनी आपले व्रत सोडले नाही.
त्याची बोलण्याची, शिकवण्याची पद्धत विनोदी असते. कधी कधी त्यांची जीभ घसरते. कारण ते बोली भाषा वापरतात मुलाना सहज सोपे व्हावे म्हणून. काही जण त्यांच्या निवडक क्लिप्स वापरून त्यांना बदनाम करण्याचाही प्रयत्न करतात. पण खान सर कुणाचीही पर्वा करीत नाहीत. ते वर्गात दांडा ठेवतात चक्क. बेशिस्त मुलाना या छडीचा छान प्रसाद देखील मिळतो. त्यात मुलींचाही अपवाद नसतो. आश्चर्य म्हणजे पालकांची देखील तक्रार नसते. मुले सुधारताहेत, चांगले शिकताहेत हे पाहिले जाते. पण या सर्व गोष्टीमुळे खान सर सोशल मीडियावर अन् आता यू ट्यूब वर चर्चेत असतात.

तिशी पार केलेल्या खान सरानी जून महिन्यात पारंपारिक पद्धतीने केलेले लग्न म्हणूनच मीडियावर सध्या गाजते आहे. त्यांनी लग्न फक्त घरच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत केले. पण गाजले ते रिसेप्शन ! त्यांनी वेगवेगळी आठ दहा पार्ट्या दिल्या असे चर्चेत आहे. बिहारची राजकीय मंडळी वेगळी. मिडिया, टी वी वरील मंडळी वेगळी. अन् मुख्य म्हणजे त्यांचे हजारो नव्हे लाखो विद्यार्थी वेगळे ! आश्चर्य म्हणजे हे समारंभ साधे साधे नव्हते. लाखो च्या बजेटचे अत्यंत खर्चिक होते. यावरून शिकवणी वर्गात कमी फी आकारून देखील ऑनलाइन क्लासेस मुळे किती उत्पन्न होऊ शकते याची कल्पना यावी. जसे की खान सर अन् इतरही अनेक जण उघड पण म्हणतात, यावरून आपली सरकारी शाळेतील शिक्षण व्यवस्था किती कुचकामी आहे हेही सिद्ध होते. देशातल्या कोणत्याही गावात, शहरात बघा, गल्लोगल्ली असे ट्युशन क्लासेस वाढले आहेत. आय आय टी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारी साठी च्या कोटा फॅक्टरीज बद्दल न बोललेले बरे !

एकीकडे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा डंका पिटायचा पण दुसरीकडे शालेय शिक्षणाच्या दर्जा कडे, गुणवत्ते कडे दुर्लक्ष करायचे या गंभीर विरोधाभासामुळेच खान सरांची त्यांच्या सारख्या शिक्षकांची सामाजिक गरज वाढते आहे.. हा प्रश्न जागतिक आहे. कारण अनेक वर्षापूर्वी हार्वर्डच्या एका पदवीधराने (त्याचे नाव सल खान!) आपल्या पुतणीला शिकवण्याच्या निमित्ताने सुरू केल्या क्लास मध्ये चक्क बिल गेट ची मुले शिकायला गेली आहेत ! या क्लासेस चे भव्य रूपांतर खान अकॅडमीत झाले आहे. हे क्लासेस जगभर अनेक भाषांत उपलब्ध आहेत.
आपले बिहार पाटणाचे खान सर प्रसिद्धीच्या झोतात आले, त्यांचे खाजगी लग्न, त्यांनी लाखो विद्यार्थ्यांना स्वागत समारंभाच्या निमित्ताने दिलेली भव्य दिव्य मेजवानी चर्चेत आली गाजली ती यामुळेच. हे सारे खान पुराण माझ्यासारख्या शिक्षकाच्या लेखनाचा विषय झाले ते ही यामुळेच.
साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे
असे कवी नी फार पूर्वी लिहून ठेवले आहे !

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैदराबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारा लेख! खरोखर या गोष्टी वाचून चकित झाले. प्रा. डॉ. विजय पांढरीपांडे धन्यवाद.
खरंतर तुमचे सर्वच लिखाण अत्यंत वाचनीय असतं.या पोर्टलवरही तुमचा लेख पाहिला की आधी तोच वाचते. अभिप्राय दिला जात नाही कारण पुष्कळदा बसमध्ये, ट्रेनमधेही वाचते. आत्तासुद्धा ट्रेनची वाट पहात लिहीत आहे.
या लाखो विद्यार्थ्यांमधून खान सरांसारखे शिक्षक निर्माण झाले का? त्याचीही आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद वेगळ्या लेखाबद्दल.
… नीला बर्वे,
सिंगापूर