वर करणी, विनोदी आणि विडंबनात्मक वाटणारी ज्येष्ठ कवी मनमोहन रोगे यांची कविता, शेवटी गंभीरपणे इशारा देत आहे की, ही लोकशाही आहे. आणि त्यामुळे लोकशाहीत योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी मतदार म्हणून आपल्यावरच आहे !. श्री रोगे यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात हार्दिक स्वागत आहे….
– संपादक
सत्तेत असलेल्यांना विरोधासाठी
कधी विरोधकांना सत्तेसाठी
देतात घेतात म्हणे पाच पन्नास खोके
खाऊन खाऊन माजलेत सगळेच बोके
इकडून तिकडून खाऊन झाल्यावर
म्हणतात सगळेच बोके ओक्के
खोटे खोटे रोज भांडून झगडून
देतात एक दुसऱ्याला धक्के बुक्के
सत्तेत असो नाहितर विरोधात
नेते नेहमीच असतात मालामाल
मतदार जगतो रोज टाचा घासत
जीवनावश्यक वस्तूंसाठी होती हाल
इकडून तिकडे तिकडून इकडे
मारती उड्या बिनधास्त बेडके
निष्ठेच्या आणा शपथा घेऊन
सहज कापती निष्ठेचे मुंडके
लोकात मिसळून भाषणे ठोकती
देती एकावर एक धक्के
ऐकणारे तर गुंतून जाती
झोपाळ्यावर जणू घेती झोके
जे केले ते बोलूनच केले
कार्यकर्ते म्हणाले, साहेब ओक्के
आपण मात्र ओळखले पाहिजेत
लोकशाहितील हे फाजिल धोके

– रचना : मनमोहन रो. रोगे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खोके बोके ओक्के धक्के ..मस्त विनोदी मर्मभेदी काव्य
🌹खूप सुंदर विडंबन नं कविता.
सत्य परिस्थिती आता तीच आहे 🌹
धन्यवाद साहेब
मस्त 👌👌 गझलसम्राट कविवर्य सुरेश भट यांची “कुत्रे” गझल आठवली.