गंगी

0

“गंगे चल, उशीर होतुया. मालकीन बाई वरडतील ! “सहा सात वर्षांची गंगी धावतच आईच्या मागे निघाली.
“आये, किती बीघी बीघी चाललीयास, जरा दमानं चल की !”

डोंगरावरच्या आदिवासी पाड्यावर राहणारी गंगी खाली तालुक्याच्या गावाला निघाली होती. गंगीचे मायबाप दोघं बी मोहाची फूलं वेचून गुजरान करायचे. एके दिवशी गंगीच्या माय देखत बिबट्यानं गंगीच्या बापाला ओढून नेलं. माय ओरडून राहिली पण दाट जंगलात कुणी बी सोडवायला आलं नाही. पोटची तीन ही लेकरं परदेशी झाली. माय हिंमतीने उभी राहिली. पण या आदिवासी पाड्यावरचं लोकांचं जगणं बेभरशाचं होतं. डोंगर उतारावर तुटून तुटून चाळीस एक घरं होती. सगळ्यांचं जगणं कष्टाचं होतं. पावसाळ्यात या लोकांचे खूप हाल व्हायचे. गंगीचा आठ वर्षांचा थोरला भाऊ साथीच्या रोगानं दगावला. माय ऊर फुटस्तवर रडली. झोपडीतल्या वैदूनं चाटण दिलं पण काही उतार पडला नाही.
धाकली चिमी कुपोषणाने ग्रस्त होती. एका वर्षात तीन जीव हकनाक गेले. आता दोघी माय लेकीच राहिल्या होत्या. गंगीचा बाप बिबट्यानं ओढून नेल्याने मोहाच्या फूलाचा नाद तिनं सोडून दिला. डोंगराखाली राहणाऱ्या वन अधिकाऱ्याच्या घरी ती कामाला जाऊ लागली.

पाड्यावर चौथी पर्यंतची शाळा होती. परंतु गंगीला कापडं नसल्याने तिला शाळेत घातलंच नव्हतं. एकदा मालकीन बाईने त्यांच्या लेकीचे जुने कपडे दिले. ते कापडं बघून गंगी आनंदाने नाचू लागली. गंगी मायला म्हणाली,
“आये ! म्या उद्यापासून साळंत जाऊ ?”
गंगीला शाळा शिकायची खूप इच्छा होती. माय म्हणाली,
“गंगे ! साळंत जायला पाटी पेन्सील बी लागतीया नव्ह ! थांब जरा, अशी घाई करु नगंस.”
एके दिवशी गंगी मायला म्हणाली, माय मी तुझ्या संग येऊ ! मला मालकिनीच्या लेकीला बघायचं हाय ! सारखं मायच्या मागं लागून ती आज मायसंगं मालकिन बाईच्या घरी निघाली होती.

डोंगरावरचा दगडा धोंड्याचा रस्ता तुडवत अनवाणी पायाने दोघी मायलेकी निघाल्या होत्या. गंगीला मध्येच ठेच लागत होती, बोट ठसठसत होतं पण ती तशीच पळत होती. डोंगर उतरुन पार लांब लांब चालल्यानंतर एकदाचं घर आलं. लांबूनच तो बंगला बघून गंगी हरखून गेली. फाटक उघडून मध्ये जाताच अंगणात मोठा कुत्रा होता. त्याला बघताच गंगीची बोबडी वळली. पण मायला बघताच तो जिभल्या चाटू लागला. त्याला थोपटताच तो शांत झाला.

दोघी मायलेकी बंगल्यात आल्या. मालकीन वाटच बघत होती. “मालकिनबाई ही माझी लेक गंगी ! तायसाबला बघायचं म्हणून रडतच बसली. म्हणून आज तिला संग घेऊन आले बघा ! गंगे, गपगुमान बसायचं. कशाला बी हात लावायचा नाय !” गंगी विस्फारलेल्या डोळ्यानं त्या घराचं वैभव डोळ्यात साठवित होती. तितक्यात मालकिनीनं आवाज दिला,
‘शर्वरी ! गंगी आलीय तुला भेटायला !’ दहा वर्षाची शर्वरी रुम मधून बाहेर आली. दोघींची नजरानजर झाली. गंगी भानावर आली. आधी मालकिनबाईच्या पाया पडली, मग शर्वरी कडे जात,
तायसाब ! तुमी लय छान हाव बघा ! हे बघा, तुमी दिलेला झगा घालून म्या तुमाला भेटाया आलो.”
गंगीचा निरागस, भोळा भाबडा अन् मोकळा स्वभाव दोघींना पण खूप आवडला. शर्वरीने गंगीचा हात धरुन आपल्या रुममध्ये घेऊन गेली. दोघींच्या गप्पा अन् खेळणं सुरु झालं.
गंगी शर्वरीला म्हणाली, ‘तायसाब ! मला लिहाय वाचाय शिकवाल !’
‘अगं शिकवेन की, माझी जुनी पुस्तकं, वह्या सगळं तुला देते. तू पाड्यावरच्या शाळेत रोज जायचं. शाळा बुडवायची नाही. जे शिकवतील ते ध्यान देऊन शिकायचं. सुट्टीच्या दिवशी रोज इथं यायचं आपण खेळत जाऊ’ गंगी आणि शर्वरीची मस्त दोस्ती जमली. गंगीच्या मायचं काम संपताच दोघी घरी जायला निघाल्या. शर्वरीला नवीन मैत्रिण मिळाली होती. ती खूप आनंदात होती.

गंगी आज लई खूष होती. उद्यापासून शाळेत जायाचं. शिकून तायसाब सारखं आपण बी मोठं व्हायचं ! जणू ती स्वप्नात तरंगत होती. ती मायला म्हणाली, ‘माय मी उद्या शाळेत जाऊ ?’
‘शाळेत जायाचं पर कुणासंग कलागत करायचं नाय. साळा सुटली की नीट घरला यायचं !’
गंगीनं मायला होकार दिला. सकाळी गंगी लवकर उठली. राखूंडीनं दात घासून आंघोळ केली. तायसाबनं दिलेला झगा घालून, पाटीपुस्तक घेऊन तयार झाली. मायचं काम होताच दोघी शाळेत गेल्या. गुरुजींनी गंगीचं नाव रजिस्टरला नोंदवून घेत, जन्मतारीख विचारली,
गंगीची माय म्हणाली, ‘ठावं नाय, पर गंगी सहा वरसाची हाय. शिमग्याच्या आधीचा तिचा जलम हाय ! मास्तर म्या निघू का ? पोरीला नीट शिकवा बरं का ! असं म्हणत तिनं हात जोडले आणि ती कामाला गेली.

गंगी चुणचुणीत अन् हुषार होती. लक्षपूर्वक प्रत्येक गोष्ट शिकायची. मन लावून अभ्यास करु लागली. तिची प्रगती पाहून गुरुजी अधिक लक्ष देऊ लागले. अक्षरांची ओळख होताच ती जोडाक्षरे शिकू लागली. तिच्या अक्षरांना सुंदर वळण होते. घरी गेली की शर्वरीने दिलेली गोष्टीची पुस्तके वाचायचा प्रयत्न करु लागली. ज्याचा अर्थ कळायचा नाही ते दुसऱ्या दिवशी लगेच गुरुजींना विचारायची. तिची बुध्दी चौकस होती. सतत शंका विचारत रहायची.

वार्षिक परीक्षा झाली. गंगी वर्गात पहिली आली. इयत्ता दुसरीला तिने प्रवेश घेतला. शाळा चौथीपर्यंत असली तरी एक शिक्षकी होती. एका झोपडी वजा व्हरांड्यात चारी वर्ग भरायचे. गंगीची प्रगती बघून गुरुजींनी पहिलीचा वर्ग गंगीवर सोपवला. आपला अभ्यास करीत इयत्ता पहिलीच्या मुलांना ती शिकवू लागली.

गंगी इयत्ता तिसरीत होती. वार्षिक परीक्षा तोंडावर आली होती. गंगी वेळ मिळेल तसं शर्वरी कडे जायची. तिच्याकडून पुस्तके आणून वाचून पुन्हा परत करायची. तिच्या बोली भाषेत आता खूप सुधारणा झाली होती. साधेच कपडे पण स्वच्छ आणि नीटनेटके रहायची तिला छान सवय झाली होती. आदरार्थी कसं बोलावं हे तिला शर्वरीच्या सानिध्यात आल्याने माहित झाले होते. स्वत:च्या आईला ती चांगल्या चांगल्या गोष्टी वाचून दाखवायची. आईला तिने सही करायला शिकवले.

असेच छान दिवस चालले होते. परीक्षा चार दिवसावर आली होती. गंगीमुळे सगळ्याच मुलांना अभ्यासाची गोडी लागली होती. मुलांची दंगामस्ती, मारामारी कमी झाली होती. मन लावून सारीच अभ्यास करीत होती. परंतु गुरुजी मात्र चिंताग्रस्त दिसायचे. चौथी पर्यंतची मुलं तशी लहानच होती. त्यांना काही कळायचं नाही. पाड्यावरची कर्ती सवरती तरुण पोरं कामासाठी शहरात गेलेली. गावात म्हातारा-म्हातारी, बायका लेकरं राहातं होती. शासनाचं शाळेला पत्र आलेलं, पुढच्या वर्षी पटसंख्ये अभावी शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गुरुजींची नोकरी जाणार होती. यापेक्षा गुरुजींना या पाड्यावरच्या गरीब, होतकरु मुलांच्या भविष्याची चिंता लागली होती. गंगीने सगळ्यांनाच जीव लावला होता. हे या मुलांना सांगायचं कसं ? गंगीला शिक्षणाची प्रचंड गोडी आहे. ती चौथी पास देखील होणार नाही. काय करावं, गुरुजींना कळत नव्हतं. त्यांनी तालुका, जिल्हा पातळीवर पत्र व्यवहार सुरु केला होता. तीन चार पत्र पाठविल्यानंतर शासनाचं पत्र आलं. निर्णय झालेला आहे.

आता काहीच बदल होणार नाही. गुरुजी हताश झाले होते. मुलांना ऐन परीक्षेच्या काळात शाळा बंदची बातमी देणं बरोबर नाही हे लक्षात गुरुजी शांत होते. परीक्षा झाली. पेपर तपासून निकाल तयार केला. महाराष्ट्र दिन 01 मे ची तयारी करण्यासाठी गुरुजी आदल्या दिवशीच शाळेत आले. तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांना बोलावून पताके लावून साफसफाई करुन घेतली. गंगी आणि तिच्या वर्ग मित्रांनी शाळा सारवून, सडा रांगोळी काढून सुशोभित केले. उद्या आपापल्या पालकांना घेऊन यायचे हे ही गुरुजींनी बजावून सांगितले.

सर्वच मुलांना निकालाची आणि झेंडावंदन नंतर खाऊ मिळणार याची उत्सुकता लागून राहिली होती. सकाळी सात वाजता शाळा गजबजून गेली. विद्यार्थी, पालक खूपच आनंदात होते. गावातल्या एका बुजूर्ग आजी – आजोबाच्या हस्ते झेंडावंदन झाले. गुरुजींनी मुलांना प्रगती पुस्तकं दिली. प्रत्येक वर्गातील पहिले तीन नंबर सांगितले. त्या सर्वांचं गुरुजींनी खूप कौतुक केले. विशेषत: गंगीची अचंबित करणारी प्रगती आणि तिने छोट्या मुलांना शिकविण्यासाठी घेतलेले कष्ट हे ही कौतुकाने सांगितले. शेवटी गुरुजींनी सरकारचा शाळा बंद करण्याचा तो कटू निर्णय सांगितला. ते ऐकताच गंगीने मोठ्याने हंबरडा फोडला. पालकांपासून मुलांपर्यंत सारेच गुरुजींना विनवू लागले. बिच्चारे गुरुजी ते ही हतबल होते.त्यांची रोजीरोटी हिसकावली गेली होती. शेवटी गुरुजी एवढंच म्हणाले, “हे पाहा, मला जे शक्य आहे ते मी प्रयत्न करणार आहे शेवटी यश येणं न येणं हे त्याच्या हाती आहे !” एवढे बोलून गुरुजींनी जड अंत:करणाने सर्वांचा निरोप घेतला. सारा गाव चिंतेत पडला. आता काय करायचं ?

जून महिना उजाडला. दर वर्षीप्रमाणे 15 जूनला सगळी मुलं शाळेत आली. गंगीने शाळा झाडून, सारवून स्वच्छ करुन ठेवली होती. सारे विद्यार्थी गुरुजींची वाट बघत होते. नेहमी प्रमाणे प्रार्थना झाली. पहिला दिवस आहे, गुरुजी येणार अशी गंगीला खात्री वाटत होती. दुपारचे दोन वाजले पण गुरुजी आलेच नाहीत. सर्व मुलं रडू लागली. गंगीलाही रडू आवरत नव्हतं. गंगी मुलांना म्हणाली, “गुरुजी येणार असते तर आतापर्यंत आले असते. ते आता येणार नाहीत. “मुलांनी एकच गलका केला. “काय करायचं आता गंगूताई ! तूच सांग.! ” उद्या तुम्ही तुमच्या माय, बा नाही तर आज्याला शाळेत घेऊन या. आपण ठरवू काय करायचं ते !’
गंगी रातभर झोपली नाय. तिच्या मायच्या डोळ्याला भी डोळा लागत नव्हता. गंगी मायला म्हणाली, ‘माय काय करावं काय बी समजना झालंय बघ. ‘उद्या मालकीनबाईला विचारुन बघावं. त्या काय तरी सांगतील.
‘व्हय माय ! माझ्या बी डोक्यात तेच हाय. तू सकाळी जलदी कामाला जा. मी सगळ्यांना घेऊन तिथं येते.’

दुसऱ्या दिवशी सारे पालक आणि विद्यार्थी शाळेत जमा झाले. गंगीनं तालुक्याला जाऊन आवाज उठवावे लागेल हे सांगताच सारेच तयार झाले. पाच वर्षाच्या लेकरांपासून म्हातारे ही निघाले. गंगीने सर्वांना मालकीन बाईकडे नेले. ताईसाबने तिच्या बाबांसोबत चर्चा केली. एक निवेदन लिहून सगळ्यांच्या सह्या घेऊन पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितले. गंगीने त्यांच्या सूचनेनुसार निवेदन तयार करुन सगळ्यांची नावं आणि अंगठे घेण्यात आले. त्या सर्वांना घेऊन गंगी साहेबांना भेटायला गेली. या मुलांची बाजू मांडणारे कुणी ही नव्हते. गंगीने आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत” आमच्या शाळेला मान्यता द्या.

आमचा शिक्षणाचा अधिकार हिरावू नका. आम्हाला शिकू द्या. आम्ही आदिवासी आहोत. आम्ही गरीब आहोत. “त्यांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले. शासनाला निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिले. शासनाचे उत्तर येताच कळवू म्हणत बोळवण केली. गंगी दर पंधरा दिवसाला आॅफिसला जायची. चौकशी करायची आणि माघारी यायची. इकडे ती आपल्या या पाड्यातल्या मुलांना शिकवायची. एखाद्या दिवशी गुरुजी येतील आणि शाळा सुरु होईल म्हणून वाट पाहायची. सहा महिने उलटून गेले,
ना शासनाचे पत्र आले, ना गुरुजी आले !
शासनाने अजिबात दखल घेतली नाही. अशा लाखो गंगी, चिंगी, चंगळी, ढमी, रंग्या, सुभान्या, भीमा आहेत जे आज शिक्षणापासून वंचित आहेत.

एक वास्तव वाचण्यात आले, या वर्षीच्या मार्च महिन्यात सरकारने एकूण अठरा हजार मराठी शाळा बंद केल्या आहेत, केवळ पटसंख्येच्या अभावी ! या गरीब, वंचित मुलांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे पाप सरकारने केले आहे. मुलींच्या शिक्षणाची आधीच परवड आहे. त्यात शासनाचे हे आडमुठे धोरण ! परंतु गंगी सारख्या मुली शांत बसणार नाहीत, हे निश्चित !!!

प्रभा वाडकर

— लेखन : प्रभा वाडकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version