१. स्वप्नातली गझल
आज असे मी स्वप्न पाहिले
त्यात गझल फुलांचे झेले होते
गुणगुणत होते गझल अशी मी
मग वृत्तांची बरसातच होते
मना मनात हळुवार फिरू लागले
ती लगावली अन् तो मतला
अलामती ची गम्मतच न्यारी
काय म्हणावे अल्लड काफिया ला
काफियाची विनवणी केली
रदीफ बिचारा रुसून बसला
काय करावे काही सुचेना
हात जोडले मग गझलेला
विनवणी केली आर्जवे केली
तूच यावे माझ्या मन्मनी
गझल सखी तू माझी म्हणुनी
लेखणी वर यावे स्वार होऊनी
बघता बघता पहाट झाली
गझल लिहूनी पूर्ण जाहली
उठवीत होती कन्या मजला
प्रत्यक्षात….. गझल लिहायची राहून गेली

– रचना : सौ. अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
२. दंड
गंध आहे मातीला, पण अंध झाली माणसे;
ओठ शिवले अन् पुरेशी षंढ झाली माणसे १
काल होत्या अस्मितेच्या लख्ख ज्वाळा;
माखता सत्तेत लोभी, धुंद झाली माणसे २
पायपुसणी ती बरी, त्याहुनीही घातकी;
पोसलेली लाळलुत्री वंद्य झाली माणसे ३
माजला अंधार येथे नि भिकारी पौर्णिमा;
ओकणारी आग क्रोधी बंद झाली माणसे ४
वागणे बेतालले अन् भाषणे जंजाळली;
सज्जनांना नाडणारी दंड झाली माणसे ५

– रचना : श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
खुप सुंदर गझल खुप छान कविता
दंड कविता खुप वास्तववादी 👍👍👌👌👌