Tuesday, December 3, 2024
Homeसंस्कृतीगटारी नव्हे, दीप अमावस्या !

गटारी नव्हे, दीप अमावस्या !

येत्या, सोमवार १७ जुलै २०२३ रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे . महाराष्ट्रातील सर्व घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. पण हल्ली तर या दिवसाला “गटारी” म्हणून, आपल्याला लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी मिळत आहे. दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये,असे वाटते. ती कशी साजरी करायची हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे आणि त्याला तसे स्वातंत्र्यही आहे. पण गटारी ही आपली संस्कृतीच नसताना, आपण त्याची विकृत प्रसिद्धी कशासाठी करायची ? दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे “शुभेच्छा” म्हणून एकमेकांना पाठविणे, हॅपी गटारी म्हणून शुभेच्छा देणे या गोष्टी आपण कृपया कटाक्षाने टाळाव्यात.

यावर्षी एका मराठी वाहिनीने तर या दिवशी मराठी चित्रपट दाखविण्याच्या जाहिरातीत चक्क ”गटारी स्पेशल” अशी शब्द योजना केली आहे. वृत्तवाहिन्यांवर या दिवशी किती लाख बाटल्या मद्यविक्री झाली, किती किलो मटण फस्त झाले याच्या बातम्या पुन्हा पुन्हा दाखविल्या जातात. दीपपूजे ऐवजी गटारी म्हणून याला वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, एसएमएस, फेसबुक, व्हॉट्स ऍप इत्यादींवर कुप्रसिद्धी मिळू नये, ही काळजी आपण घ्यायला नको का ?

पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. त्याची काही पुढील प्रमाणे शास्त्रीय कारणे आहेत.

१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. हल्ली मत्स्यदुष्काळ वगैरे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
५) आजच्या प्रगत काळात अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण होते. लेप्टोस्पायरोसीस, चिकनगुनिया, बर्ड्स फ्लू अशा घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
६) आजवर मानव जातीचा सर्वाधिक संहार करणाऱ्या विविध साथी या रोगजंतूंमुळेच होतात, हे आपण पाहत आलो आहोत. अशा प्रकारे आपण जंतुसंसर्गाची शक्यता टाळली तर आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास थोडा अधिक वाव मिळतो.

अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.

या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच

१) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात.
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.

अन्य धर्मांमध्ये अत्यंत कडक उपास केले जातात. आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या उपासाचे बंधन तर नाहीच पण केवळ आहार बदल करूनही उपास करता येतो. या वर्षी भारतीय रेल्वेमध्ये श्रावण महिनाभर केवळ शाकाहारी जेवण दिले जाणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

पुढे ४ महिने साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी, पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वींच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते साफसूफ करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत. आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात असेच मनोभावे दीपपूजन करून, अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण नैवेद्य दाखवतात. दिव्यांच्या व्रताची कहाणी वाचली जाते. दिव्यांची आरती म्हटली जाते. या दिवशी अनेक जातीनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे. परंतु खूप आनंददायी आणि मंगलमय अशा या सोहोळ्याची माध्यमांकडून दखलच घेतली जात नाही.

पूर्ण श्रावण महिनाभर आणि गौरी जेवणापर्यंत कडक शाकाहार पाळला जात असे. म्हणून मग त्याआधी या दिवशी मांसाहार केला जात असे. हा सण नसून ही एक सामाजिक प्रथा होती. मग मुळात अस्तित्वातच नसलेल्या गटारी ‘सणा’चे आपण उदात्तीकरण करायचे की लाखो मराठी घरातील मंगलमय दीपपूजनाची लोकांना माहिती करून द्यायची ?…आपण हा निर्णय आता घ्यायलाच हवा.

आपल्याला माझी नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया ! या मांगल्याचा प्रचार करूया !!

सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा !

हा लेख जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावा.

अलका माने

— लेखन : अलका माने. रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण : २६
Dr.Satish Shirsath on पुस्तक परिचय
सौ. शिवानी श्याम मिसाळ. on कदरकर काकू : चैतन्याचा झरा
वासंती खाडिलकर, नासिक on कदरकर काकू : चैतन्याचा झरा
गोविंद पाटील on शब्दात येत नाही