रविवारी आषाढी अमावस्या आहे.
लोक या अमावस्येला, गटारी अमावस्या असेही म्हणतात. परंतु ते चूक आहे. त्यानिमित्त विशेष लेख……
आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या या अमावस्येला दीपपूजन केले जाते. दीप हे ज्ञानाचे प्रतीक आहे. दिव्याखाली अंधार असे पूर्वी म्हणायचे. परंतु दिवा अंधार दूर करतो. त्यासाठी त्याची आराधना करायची. घरातील सर्व दिवे अर्थात समई, पणती, निरांजन, धुपारती, दीपआरती सर्व लख्ख करायचे. काजळी काढून टाकायची यासाठी ही अमावस्या. आपणही संकल्प करूया दिव्याच्या अर्थात तेजाच्या आराधनेचा.
शुभं करोति कल्याणं । आरोग्य धनसंपदा ।
शत्रुबुध्दी विनाशाय । दीपज्योती नमोस्तुते ।।
आपल्या जीवनात प्रकाश आणि उजेड देण्याचे काम करतो तो दीप. आपल्या जीवनाला दिशा दाखवतो तो दीप. दीप जळत असतो. असं आपण म्हणतो खरे, पण नक्की दीपच जळत असतो का, हाच खरा प्रश्न असतो.
आपल्या बोलण्यात नेहमीच संदिग्धता असते. ते खरे अज्ञान ते दूर करण्याचे काम ज्ञानदीप करत असतो म्हणून आपण मिळेल तिथून ज्ञान मिळवण्याचा माणसाचा प्रयत्न असतो. पण हा अज्ञानाचा अंधकार दूर कसा करायचा. त्यासाठी काय करायला हवे. तर ‘गुरुने दिला ज्ञानरुपी वसा आम्ही चालवू पुढे हा वारसा‘ असे आपण म्हणतो आणि काही अंशी तसे करण्याचा प्रयत्नही करतो.
गुरू हा देखील ज्ञानदीपच असतो. तो आपल्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालतो आणि अंधकार घालवतो. त्याबाबत संस्कृत श्लोक हेच सांगतो…
अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकायां
म्हणजेच आपल्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाची शलाका प्रज्वलित करून आपल्याला सगळं काही स्वच्छ दिसेल याची व्यवस्था ते करतात.
दीप कशाचे प्रतीक आहे तर ते प्रकाशाचा मार्गदर्शक असलेले चिन्ह आहे. दिव्याच्या द्वारे आपल्या प्रकाश मिळतो तरी त्यासाठी केवळ दीप असून चालत नाही तर त्यासाठी तेल आणि वाती त्याचप्रमाणे त्या वाती प्रज्वलित करणाऱ्या काडीपेटीची आवश्यकता असते. हे खरे तर रूपकच आहे. म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम हा दीप जरी करीत असला तरी त्या दीपाचे पूजन करणे म्हणजे काय तर त्याला काही आध्यात्मिक अर्थ आहेत.
मनातील कुविचारांचा अंधकार दूर करण्यासाठी मार्गदर्शक अशा गुरूचा आधार घ्यावाच लागतो. नाहीतर अंधारात चाचपडत राहणे भाग पडते. आषाढ महिन्यात आपण गुरूपौर्णिमा साजरी करतो. म्हणजे काय करतो तर आपल्याला अध्यात्माची वाटचाल करायची असते. त्यासाठी नेमका मार्ग आणि दिशा सापडावी लागते. ती गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरू देत असतात. परंतु आषाढ अमावस्येला दीप पूजन असते. लाक्षणिक अर्थाने घरातील सर्व लहान मोठे दिवे स्वच्छ घासून पुसून देवघरात ठेवायचे. अन्य दिवशी आपण त्यातच ज्योत लावतो आणि वरील मंत्र शुभं करोति म्हणतो. पण त्याचा काय उपयोग त्या दिव्यांची स्वच्छता रोजच करायला हवी. लाक्षणिक अर्थ काही का असेना दिव्याची स्वच्छता म्हणजे त्याला वेगळाही अर्थ आहे.
गुरुपौर्णिमेला गुरुने दिलेला मंत्र, साधना आपण सुरू करतो परंतु काही दिवसांनी ती विसरतोही त्यावेळी आपल्याला आपल्याला गुरुमंत्र व साधनेचाही विसर पडून आपण संसार रत होतो. अशा वेळी आपल्या जीवनात अज्ञानाची अमावस्या येते. अमावस्येला सर्वत्र अंधारच असतो. आपले जीवनही अंधकारमय होते या जीवनात हे दीप प्रकाशाची ज्योत लावायची असते. त्यासाठी अमावस्येच्या दिवशीच हे दीप स्वच्छ, लखलकीत करायचे असतात. त्यावरील जळमटे दूर करायची असतात. त्यासाठी ही प्रतीकात्मक अमावस्या असते.
माणूस मुळातच शाकाहारी प्राणी. सिंहाला, लांडग्याला, कोल्ह्या-कुत्र्याला असे मांसाहार पचवण्यासारखे शरीर दिलेले असते. त्यांचे दात तसेच अणकुचीदार असतात. पण तरीही माणूस अट्टहासाने अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण करत असतो. त्यासाठी तो बहाणे शोधत असतो. एरवी तो वर्षभर आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी निमित्ते काढून त्याला हवी तशी ऐश करत असतोच. परंतु आषाढाचा शेवटचा दिवस म्हणजे शुद्ध शाकाहारी अशा श्रावणाची वर्दी देणारा दिवस असतो.
या श्रावणात भक्तीला उधाण येते,
सोमवारी महादेव अर्थात शिवशंकर,
मंगळवार व शुक्रवार दुर्गा देवी, सरस्वती आणि लक्ष्मीची पूजा कऱण्यात माणसाला रस असतो. त्याच दिवशी लोक गणेशाचीही पूजा व व्रत करतात.
बुधवार हा पंढरीच्या विठ्ठलाचा असतो. पांडुरंगाची एकादशीही असते.
गुरुवार तर प्रत्यक्ष अत्रिनंदन दत्त गुरूंचा असत. या दिवशी ज्ञानाचे दरवाजे खटखटून त्यातून ज्ञानगंगेत डुंबायचे असते. गुरु दत्तात्रेयांची भक्ती ही सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी केली जाते. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्हींचे प्रतीक असे हे त्रिगुणात्मक दत्तात्रेय.
शनिवारी मारुती, शनि यांची उपासना केली जाते.
तर रविवार हा त्या तेजोमय अशा सहस्ररश्मी सूर्याची आराधना करून आपला देह, चित्त, बुद्धी आणि वत्ती तेजोमय करायच्या असतात. अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.
आशा आकांक्षांना बळ देणारी अशी प्रेरणादायी ही आषाढ अमावस्या. तिला लोक गटारी का म्हणतात तेच मुळी कळत नाही. कदाचित गटारासम आपले आयुष्य होऊ नये, आपण व्यसनांच्या गटारात वाहून जाऊ नये असा त्याचा अर्थ असतानाही लोक गटारी म्हणजे दारूच्या नशेत धुत व्हायचे असाच अर्थ का घेतात कोण जाणे ? यंदाच्या गटारीला आपण ज्ञानोपासनेचे व्रत स्वीकारू या.
– लेखन : प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, गोवा
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800.