गावाकडं चाललो मी
मातीच्या गंधासाठी
चिखलात पाय भिजवून
निसर्गाशी मैत्री व्हावी म्हणून
पावसात चिंब भिजून
मनात उगम व्हावा म्हणून
एक आनंदांकूर
फुटावा म्हणून
नाही तिथं महाल
नाही नखरेल शृंगार
आहे फक्त एक ओंजळ माया,
अन् माणुसकीचा सच्चा वावर
घरची पिठलं भाकर
ओंजळभर प्रेम
हेच तर आहे
तिथलं शाही जेवण!
ओढे, डोंगर, ओलसर माती,
श्वासात भिनते शेतीची बाती
हातात बी, ओठांवर गाणी,
डोळ्यांत येते श्रमांचे पाणी
शब्द हरवले,
भावना सरल्या,
शहरी मुखवट्यांपासून
आत खोलवर झिरपल्या
गाव म्हणजे
केवळ वस्ती नाही
आहे जिवंत शिकवणी
साधेपणा, माणुसकीची
गाव शिकवतं
कमी गरजा
म्हणजे जास्त समाधान
निसर्ग गुरू महान
म्हणून चंदू म्हणतो
मातीशी नाळ जुळवा
सृष्टीशी संवाद साधा,
जिथून आलो, तिथेच जाणार
— रचना : डॉ चंद्रकांत हलगे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800