Friday, October 18, 2024
Homeसंस्कृतीगणपति येती घरा !

गणपति येती घरा !

श्रीगणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला आणि असे गणपती चार दिवसांवर आले की सळसळता उत्साह नसानसात भिनू लागतो. वाऱ्याच्या वेगाने विचार धावू लागतात. अनेक कामे मार्गी लावायची असतात ती अगदी ट्रेनच्या डब्यासारखी डोळ्यासमोर सरकू लागतात. मग आठवतं अरे आपल्याला हळदी कुंकवाला To do list pad मिळाले होते की.
लगेच त्याचा शोध घेऊन मनात ते देणाऱ्या मैत्रीणीला शतशः धन्यवाद देऊन आणि हवी ती गोष्ट वेळेवर सापडवल्यामुळे स्वतःलाही काकणभर जास्तच धन्यवाद देऊन कामांच्या याद्या सुरू होतात.

एकीकडे घराची साफसफाई सुरू होते. आमंत्रितांच्या याद्या, इव्हाईटस्, काय परिधान करायचं ? (हो ना ! पुन्हा मागच्या वेळचीच साडी नको बाई आणि फक्त साडीच नाही काही, नवऱ्याचा कुरता कुठला, मुलांचे कपडे कोणते. किती ती व्यवधानं ! वेळ तरी कसा पुरणार ?) हवामान काय असेल ? एक ना अनेक . विचारांना, शरीराला उसंतच मिळत नाही.

पण काही म्हणा, सगळ्या घरात एक सुंदर उत्साह निर्माण होतो. कस असतं ना सण म्हटलं की आपण अगदी लगबगीने कामाला लागतो. रोजच्या व्यापातून थोडा वेळ मुद्दाम तयारीसाठी वेगळा ठेवतो. अंगात दहा हत्तींचं बळ आलेलं असत. हत्तीचं बळ तेवढं यावं बाकी …..
माणूस जेवढा कार्यरत तेवढा निरोगी राहतो असे मला वाटतं. कार्यरत असलो की शरीर, मन सगळं एखाद्या उद्देशाने प्रेरित झालेले असते. मॅग्नेट मधून विद्युत प्रवाह सोडल्यावर कसं ते विद्युत भारित होऊन अधिक शक्तिशाली होतं तसेच या उत्साहाने कार्यक्षमतेनेही होत असते. या निमित्ताने घरात चर्चा होते, काय करायचं, कसं करायचं वगैरे.

सजावट काय करायची याचीही एक वेगळीच मजा असते. कुणा एकाच्या सुपिक डोक्यातून एक भन्नाट कल्पना निघते .मग इतर सर्व ती आपापल्या परिने साकारण्यासाठी पुढे सरसावतात. मेहनत घेतात. त्यातच रुसवे फुगवे होतात, लठ्ठाझोंबी सुद्धा ! इतकच काय मानापमानाचे विदाऊट संगीत प्रयोग सुद्धा होतात. पण शेवटी थोडं तुझ, थोडं माझ करत सर्व डोलारा तयार होतोच. कारण सोप्प आहे . सर्वांच उद्दिष्ट एकच असतं ना! काही झालं तरी आपला बाप्पा छान सजला पाहिजे ही सुप्त इच्छा प्रत्येकाचीच असते.

कितीही मारामाऱ्या, खुन पसिना झाला तरी सिनेमाचा शेवट गोड होतोच की ! समाजातही असेच असते ना. एखादी, उत्तम उद्दिष्ट ठेऊन पुढाकार घेणारी व्यक्ती असते आणि इतर सर्वजण ते साकार करण्यासाठी हातभार लावत असतात. यात थोडं इकडे तिकडे होणारच ! त्यात काही अनैसर्गिक नाही.

गणपती यायचे म्हणजे एक विशिष्ठ क्रम ठरलेला असतो. आधी घरात सर्व तयारी पाहणे. जे नाही त्याच्या याद्या करून आधीच सर्व जिन्नस घेऊन येणे. पटेल मंडळी इकडे आली हे किती किती भाग्याचं वाटतं अशा वेळेला. मनात लाखोली वाहिली तरी आमची पाऊले सामान खरेदीसाठी तिकडेच वळतात. मग गणपति बसवायचा ती जागा स्वच्छ करून तयार करून ठेवणे. मखर करणे वा विकत आणणे. ठेवणीतली भांडी काढून ठेवणे, रुपेरीला धन्यवाद देत चांदीच्या वस्तू स्वच्छ करून घेणे. अनेकानेक बारिकसारीक कामे असतात. त्यातून अमेरिकेत गणपती बसवायचा म्हणजे तारेवरची कसरत! आधी कॅलेंडरची शहानिशा करण्यापासून सुरवात असते.

आपले कालनिर्णय सरसकट पाळायचे की नॅार्थ अमेरिकन पंचांग पाहायचे ? हा तिढा सोडवतो न सोडवतो तोच विकेंड येतोय की मधलाच दिवस ते पहायचे. विकेंड नसेल तर फारच तयारी करावी लागते. इथे लोकांना आमंत्रित करायचे की महिनाभर आधी तरी निमंत्रणे पाठवावी लागतात. घरची माणसे आसपास विशेष नसल्याने सर्व माणसे बाहेरच्या दुनियेत स्वतःला जखडून घेतात, कामांना वाहून घेतात, कारण नको असलेला एकटेपणा कोणाला हवा असतो ? हे काही वेगळं सांगायला नकोच. फक्त ते अलिखित स्वरूपात असतं .फार थोडे लोक हे कबूल करण्याचा प्रांजळपणा दाखवतात. जितका प्रांजळपणा अधिक तितका तो माणूस तणावमुक्त म्हणावयास हरकत नाही.

गणपतीच्या सणाची तयारी अशी झोकात सुरू होते.पण काही केल्या ते लहानपणापासून अनुभवलेले वातावरण मात्र जमून येत नाही. विविध वस्तुंनी फुललेला बाजार, खास गणेशोत्सवासाठी सजलेली दुकाने, लोकांच्या आपसातल्या चर्चा, तो गजबजाट , तो माहोल!
तिकडे भलेही सर्वजण त्या गजबजाटाने , गर्दीने हैराण होत असतीलही पण आम्ही परदेशी माणसे मात्र कुठे तरी ते सर्व शोधत असतो हे खचितच. प्रत्येक सणावाराचा तो भारतीय टच इथे ओढूनताणून आणावा लागतो. मन सदैव त्या कात्रीत सापडलेले असते. सतत काहीतरी राहून गेल्याची बोच मनाला सलत असते. पण जुनी म्हण आहे, लंकेत सोन्याच्या वीटा ! सोन्याच्या वीटा लंकेत राहिल्या म्हणून दुःख करत रहायचं की आहोत तिथे लंका निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा हा ज्याचा त्याचा विचार आहे.

भारतातच नाही इथल्या मेक्सिकन , क्युबन मावशींचाही भलताच तोरा असतो. घर साफ सफाई साठी या मावशीबाईंची आधीच रितसर वेळ ठरवून घ्यावी लागते.
या अशा सणाच्या वेळी मावशीबाई लई डीमांडमधी असतात. आपल्या कमनशिबाने त्या नाहीच आल्या तर स्वतः सर्व मेहनत करणे आहेच. स्वावलंबन कधीही उत्तमच ! त्या निमित्ताने आपला आपल्याच घराशी संवाद होतो. सर्वांनी मिळून कामे केली तर तो अधिकच आनंददायी होतो. छोट्या गोष्टीतून अगदी एकत्र केलेल्या कामातूनही निखळ आनंदाचं टॅानिक मिळू शकत.

गणपतीच्या दिवशी युट्यूब नाहीतर सीडीमधून , ॲपमधून गुरूजी अवतरतात आणि आम्ही आपले खऱ्या गुरूजींचा आभास निर्माण करत पूजा सुरू करतो. फरक एवढाच काही मधेच कमी पडलं तर या गुरूजींची बोलती तात्पुरती बंद करता येते. त्यांना काही दुसऱ्या पुजेची घाई नसते. आरामात आपल्या तयारीनुरूप पूजा सपन्न होते.

इकडच्या पद्धतीप्रमाणे श्रीगणेश दर्शन व त्यानंतर सर्वांना पूर्ण जेवणाचा प्रसाद असतो. त्यामुळे कसून तयारी असते. बऱ्याच वर्षांच्या ओळखी नंतर मराठी, अमराठी अनेक लोक ओळखीचे असतात. मग अशा वेळी कोणाला बोलवावे हे ठरवणे अधिकच क्लिष्ट होते. अनेक लोक गणेशोत्सव करतात , काही ठिकाणी मराठी मंडळांचाही गणपती बसतो. इन मिन दहा दिवसात हवामानाच्या, शाळा, कॅालेज, परीक्षा, नोकरी, मिटीग्ज या सर्वांच्या तालावर नाचत जशी सेवा घडेल तशी बाप्पाच्या चरणी रूजू करावी लागते. पण खरं सांगू का ? त्यातही एक अनोखे समाधान दडलेले असते.

या एका सणाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, अमराठी असतील तर सर्वांना मिग्लिश आरतीचे प्रिंट आऊट दिले जातात. त्यात पाहून ते सुद्धा बिचारे आ.. ऊ करत कसलेल्या भिडूंचा वेग पकडत आरत्या म्हणण्याचा प्रयत्न करतात. मुंबईकर, पुणेकर आपापल्या शैलीत तावातावाने, उत्साहाने आरोळ्या ठोकतात. विशेष म्हणजे आपण कितीही अशी विभागणी केली तरी सारा भारत एक होऊन बाप्पाला आळवत असतो.

इकडची घरे अगदी प्रशस्त आणि हवामानाने कृपा केली तर घराबाहेरही जेवणाची फार छान सोय करता येते. प्रत्येकच घरे अशा मोठ्या मेजवानीसाठी सज्ज असतात. क्वचित टेबल खुर्च्या भाड्यानेही मिळतात. ज्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करायचा नाही ते छोटे छोटे समुह बोलावतात. अशातही मजा येते कारण मग प्रत्येक कुटुंबाची विचारपूस करता येते . छान गप्पा, भजने, आरत्या असा साग्रसंगीत पाहूणचार व उत्साहात सर्व गोष्टी करता येतात. कोणत्याही प्रकारे उत्सवR करायचा असेल तर योजना मात्र आधीच आखुन पक्की करावी लागते. रोज एक समुह दर्शनासाठी येणार असेल तर रोजचा मेन्यू तयार करून तशी तयारी आलीच. शिवाय आजचा मेन्यू उद्या नको अशा कल्पनाही डोक्यात असतातच. वास्तविक आज आलेल्या माणसांना काल वेगळे लोक येऊन गेले हे माहितही नसते. हे सारे आपल्याच मनाचे आणि अंगात असलेल्या उत्साहाचे खेळ असतात.

कर्मधर्म संयोगाने मनाजोगती रजा मिळाली तर रोजचा दिवस विनासायास पार पडतो. अर्थात तो तसा पार पडावा म्हणून गणरायाचे आशिर्वाद आगाऊच घेतलेले असतात. चार दिवस घर हसतं खेळतं होतं. हल्ली व्हॅाटसॲपच्या कृपेने भारतातील घरच्या गणपतीचेही दर्शन घेतले जाते. डेकोरेशनची प्रदर्शने भरतात. दुधाची तहान ताकावर भागवली जाते. खूपदा वाटते तिकडची सणांची मजा एकदा तरी मुलांना अनुभवावयास मिळावी. पण कसचे काय ? अमेरिकन शाळा त्या बाबतीत कडक आहेत.
उन्हाळ्यात पण शाळा बुडवून भारतात येण्यासाठी लवकर निघणे, प्रत्येक सणाला सुट्टी घेणे ही ऐश परवडणारी नाही. शेवटी काहीतरी एक निवडावं लागतं. गणपतीत शाळेला हाफ डे मिळाला असली मजा या चिमण्यांच्या नशीबात नाही. शाळेच्या गणपतीची उत्साहाने तयारी करणं नाही. पण काय करणार .. जेवढ्या वीटा सोन्याच्या करणं शक्य आहे तेवढचं आपल्या हातात आहे.

शिल्पा कुलकर्णी

— लेखन : सौ. शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on चलो, अमरावती !
वर्षा महेंद्र भाबल on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सौ.मृदुलाराजे on विजयादशमी
सौ.मृदुलाराजे on चलो, अमरावती !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. on गुरूंच्या आठवणी
अजित महाडकर, ठाणे on “माध्यम पन्नाशी” :  १०
डॉ. प्रशांत भुजबळ on अभिनव टपालदिन