१. हॅलो हॅलो गणपतीबाप्पा ☎️📱📞
लहान मुलाचे बाप्पाकडे छोटेसे गाऱ्हाणे…
हॅलो हॅलो गणपतीबाप्पा
आपण मारु का हो थोड्या गप्पा
तुमची सोबत दहा दिवसाची
नव्हती वाटत भिती कशाची
हॅलो हॅलो……📞📞
तुम्ही गेले तुमच्या गावाला
पप्पा मम्मी पण गेले आँफीसला
फ्लॅटमध्ये आता मी एकटा
चालतो आयाच्या तोंडाचा पट्टा
हॅलो हॅलो…..☎️
पाहू कितीतरी मी टिव्ही
कॉम्प्युटरवरील तो मुव्ही
अभ्यासाचा पाडला मी फडशा
नको वाटतात ह्या गोष्टी आताशा
हॅलो हॅलो…….📱
बाप्पा तुम्ही आले आमच्या घरी
पंचपक्वान्ने रोज मम्मी करी
मोदकाची चव किती न्यारी
म्हणून आवडती तुम्हा ती भारी
हॅलो हॅलो……📞📞
वाट पाहते का तुमची आई
म्हणून जाता तुम्ही घाई घाई
लवकर याहो पुढल्या वर्षीही
तुमच्या येण्याची वाट मी पाही
हॅलो हॅलो….☎️
–– रचना : अरुणा गर्जे. नांदेड
२. निरोपाचा क्षण
अष्टाक्षरी काव्य रचना
देतो निरोप बाप्पाला
अश्रू पूरात वाहतो
अरे जना सोड सारे
कालचक्री का धावतो ?
फटाक्यांचा गदारोळ
कानी कर्कश ध्वनीत
भल्या मुर्ती मिरवत
नाच तो दणदणीत
कंटाळतो ह्या गोष्टींना
त्रागा येतो मनावर
टाळ मृदुंग चिपळी
आवडते मजतर
घर झाली रिती सारी
रस्ते रिकामे होणार
वर्ष पुढचे गाठाया
बाप्पा घरात येणार
मखरात स्थापनेची
वाट तुम्ही पाहतात
राग रोष न ठेवता
मनोमनी मोदे त्यात
मला नकोच अमिष
सुवर्णालंकार घ्यावे
आशीर्वाद स्वच्छ मन
दोन हस्त मज द्यावे
–– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
मागे कधी तरी गणपतीची भव्य मुर्ती पाहून तिचे विसर्जन
होते. हे छान नाही वाटले. तेव्हा केलेली कविता…
३. मिरवणूक
शहाणी माणसं सांगून दमली..
मुर्तीची उंची कमी करा म्हणाली l
पण नंतर करोनानी केली किमया..
नियमांचे पालन करू लागली दुनिया..
नाही मिरवणूक,
नाही अडवणूक …
नाही गुलाल, फटाके,
नाही अंगाला झटके….
नाही उगीच रोषणाई,
नाही कोणाची बढाई…
नाही डीजे, नाही आवाज
नाही खोटा खोटा साज….
घरची फुलं नी सोज्वळ तबक,
आरास सजली, नी दिसलीही सुबक….
भक्तिभावाने घर भरली
बाप्पाची पूजा मनापासून झाली ।
आता मात्र पालथ्या घड्यावर पडले पाणी
परत सुरू झाली नेहमीचीच ती गाणी l
गणपतीला मनोरंजनाचे मॅाडेल बनवले
त्यासाठी सर्वच नियम धाब्यावर बसवले l
शहाणी माणसं सांगायची थांबली
मूर्तीची उंची वाढतच राहिली l
— रचना : चित्रा मेहेंदळे. अमेरिका
४. गणपती बाप्पा
माझा भाव माझा देव…
वर्णू कसे अतुल शब्दात
तु सुखकर्ता, तु दुःखहर्ता
तुझ्या आगमनाने, विघ्नहर्ता,
होतो घराघरात आनंद उत्सव गाण l
रूप तुझे गणेशा, आकर्षक सुंदर
मनमोहक अतुल हृदयस्थान ll1ll
तु आदी ना अंत, आनंद अनंत,
तु नीलो नलो नभात, तु सर्वात l
तु दुःख हरता, संकट टळता,
देतो रहा खुशाल, दुःखहर्ता वरदान ll2ll
तु रिद्धी सिद्धी आणि प्रसिध्दी,
देतोस सुख शांती, ज्ञानप्राप्ति l
थोर तूझी महिमा अगाद,
वर्णू कसे मी अतुल शब्दात ll 3ll
तु ज्ञानसिद्धी, आत्मशक्ती,
आनंद ह्रदयी परमानंद वस्थी l
नभात अनमोल सुंदर हस्ती
असे एकमेव अतुल विश्वात ll4ll
शरण तुला आलो गणराया
सेवा, धर्म, कर्म कराया l
दे आत्मशक्ती लढाया,
जिंकू आम्हीच अतुल असे विश्वास ll5ll
आत्मप्राप्ती, देहमुक्ती,
ॐकार तुझात सामावली जीवसृष्टी l
शरण तुम्हाला आलो हो गणराया,
घे हृदयात आम्हास,
नीलबिंदू प्रकाश पोटात l
नीलबिंदू प्रकाश पोटात ll6ll
— रचना : अतुल सोनवणे. ठाणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अप्रतिम…श्री अतुल सोनवणे जी..सुंदर शब्दलेखन…👌👌