१. पुनर्भेट
आकाशी घन गहिरा आवेगा सावरतो
साधत क्षण मोक्याचा सृष्टीवर ओघळतो
पान नवे फूल नवे गंध मनी दरवळतो
ओठावर गीत खुले मनमयूर मोहरतो
हलगीच्या तालावर नाद नवा दुमदुमतो
छंद जुना बहर नवा ढोल पुन्हा ढमढमतो
भाद्रपदी शुक्ल पक्ष चतुर्थीस क्षण येतो
प्रेमाने भेटाया लंबोदर अवतरतो
भक्तांच्या ह्रदयातुन लाट उठे हर्षाची
पूर्ण जणु उत्कंठा आज पुर्या वर्षाची
आवडते खाद्य तुला एक जुडी दुर्वांची
सारणही मोदाचे पारी पण भक्तीची !
— रचना : डाॅ.आनंद महाजन. पुणे
२. तू सुखकर्ता मोरया
हे गणराया गणाधीशा तू चिंतामणी तू मोरया
रूप मनोहर पावन करी मन मंगलमूर्ती मोरया
तू सुखकर्ता मोरया तू दुःखहर्ता मोरया
तू सुखकर्ता मोरया तू दुःखहर्ता मोरया || धृ ||
संकट मोचन करुणाधिशा, प्रेमाची बरसात तू
बुद्धी देवता, इष्ट देवता मंगलमय सुरुवात तू
ढोल ताशांच्या तालावरती स्वागत त्याचे करूया
तू सुखकर्ता मोरया तू दुःखहर्ता मोरया || १ ||
भक्तगणांचे अपराध सारे घेसी रे उदरात तू
दुःख हरुनी दान सुखाचे टाकीसी पदरात तू
नैवेद्याचा मान तयाला मोदक खाया देऊया
तू सुखकर्ता मोरया तू दुःखहर्तामोरया || २ ||
— रचना : सौ. प्रिती लाड.
३. विश्वाचा स्वामी अंतर्यामी बोलो गणपती बाप्पा की जय
ढोल ताशाचा गजर
आले बाप्पा लंबोदर !
ल्याइले हो पितांबर
आले आले विघ्नेश्वर…!
आले गणराज आले
पहा मूषकाच्या स्वारी !
आला भादव्याचा सण
वर्षो अमृताच्या सरी…!
आणा मोदक नैवैद्य
विद्या देवता आराध्य !
शक्ती लाभू दे दुर्बला
दूर रोग ते असाध्य…!
धूम्रवर्ण भालचंद्रा
विनायक वक्रतुंड !
माया तुझी विश्वावरी
अशी राहू दे अखंड…!
टाळ मृदुंग गजर
भाव भक्तीचा बहर !
साज श्रुंगार देखणा
त्यात शोभे विघ्नहर…!
येता विरहाचे क्षण
दाटे कंठ दाटे मन !
पुढल्या वर्षी लवकर यावे बाप्पा
गजानन शूर्पकर्ण…!
— रचना : तृप्ती काळे. नागपूर
४. गणपती बाप्पा मोरया बोला
पार्वती नंदन पृथ्वीवरी आला |
आनंदी आनंद घेवूनीया आला ||
चला चला जाऊ त्याच्या स्वागताला |
मृदुंग वीणा अन टाळ सोबतीला ||१||
वाजत गाजत गणपती आला |
ह्रदय सिंहासनी येवून बैसला ||
षोडशोपचारे पूजूया त्याला |
देव हा पावतो भक्ताला ||२||
करुया आरती गणपती बाप्पाची |
जास्वंद वाहूया जुडी दूर्वांची ||
नैवेद्य थाळी लाडू मोदकांची |
ओवोळू धूपदीप माझ्या गणेशाला ||३||
पुण्य करा धर्माने चाला |
साह्य करा एकमेकाला ||
विसरा जाती पंथ भेदाला |
गणपती हे सांगे आम्हा तुम्हाला ||४||
— रचना : प्रवीण देशमुख. कल्याण
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800