नमस्कार मंडळी,
आज अनंत चतुर्दशी. गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस. बघता बघता ११ दिवस कसे भुरकन आपल्या नकळत उडून गेले हे कळले ही नाही ना !
बाप्पा यायच्या आधी उत्सुकता आनंद अगदी ओसंडून वहात होता. सजावट काय करायची यावर वादविवाद, नैवेद्य काय करायचा, घर कसे सजवायचे, कोण कोण येणार ? सतराशे साठ गोष्टीवर चर्चा करणारे घर आणि घरातील माणसे आज सगळीच कशी हिरमुसलेली दिसत होती, गप्प गप्प होती.
सकाळच्या आरतीत पहिल्या दिवशीचा जोर नव्हता. मने गहिवरली होती. छोट्या कंपनीचे तर डोळेही भरून येत होते. अर्थात मोठी मंडळी ही याला अपवाद नव्हती. त्यांचे ही डोळे पाणावलेलेच होते. लहानमोठ्यांचा लाडका बाप्पा आज त्यांना सोडून चालला होता. काहीतरी गमवल्याची चुटपुट लावून चालला होता. तब्बल एक वर्षाचा विरह. बापरे ! सगळा उत्साह ऊर्जा चैतन्यच हरवल्यासारखे झाले होते. जीवाला हुरहूर लागली. त्याची ती अनेक रूप डोळ्यासमोरून हलतच नव्हती. पाहुणा म्हणून येतो आणि घरचाच होऊन जातो की हो.
पण मनात आले त्यालाही जायची इच्छा नसेल नाही का आपल्या भक्तानां सोडून ? इतकी भक्ती, इतके प्रेम पाहून तोही नक्कीच हळवा झाला असणार. सहजच बाप्पा कडे बघितले, त्याच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. चेहऱ्यावरील भाव ही कसनुसेच होते. वाटले आईची आठवण आली असेल. खूप दिवस झाले. अपरंपार सुख आणि आनंदात आपण तर बुडून गेलो आहोत, त्याच पूर्ण कर्तव्य त्याने केले आहे. आपली सारी दुखः घेऊन जात आहे. त्याला हसतमुखाने निरोप द्यायला पाहिजे. सोबत दही पोह्यांची शिदोरी आणि अनेक आठवणी. नक्कीच त्याचा आणि आपला विरह सुखावह होईल. दिवस पटापट निघून जातील. नव्या उमेदीने नव्या जोमाने स्वागत करू. आपली कर्तव्य कर्म इच्छा नकळत त्याच्या जवळ व्यक्त केल्या आहेत. त्या पुरी करण्याची जबाबदारी आहेच ना. त्यात मन गुंतवू, त्याच्या आशीर्वादाने असे काहीतरी काम करू की पुढच्या वर्षी अभिमानाने त्याला सांगता येईल.
विसर्जनाची तयारी जोरदार चालू झाली. सगळ्यांना विचार पटला. आज जास्तीत जास्त आरत्या म्हणून बाप्पाला निरोप द्यायचे ठरले. साकडे घालायचे. टाळ, झांजा, गाणी, नाद घोष धमाल करायची. आरतीचे निनाद वर्षभर त्याच्या कानी घुमू देत, हीच आपली आठवण कायम असू दे. हीच मनोमन इच्छा. काय मंडळी तुम्हालाही पटलं ना ?
हे लंबोदरा हे गणराया
मंगलमूर्ती मोरया
सुख समृद्धीचे वाण घेऊनी
पुढच्या वर्षी लवकर या.
— लेखन : मीरा जोशी. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर भावपूर्ण असा निरोपाचा लेख! प्रत्येकाच्या घरातील वातावरण शब्दातून चित्रित केले आहेत. खूप धन्यवाद मीरा ताई 🙏🌹