Sunday, July 13, 2025
Homeकलागणेशोत्सव महिमा

गणेशोत्सव महिमा

आज, दिनांक १९.०९.२०२३ पासून ते २८.०९.२०२३ पर्यंत गणेशोत्सव आहे. त्या निमित्त हा माहितीपर लेख. गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
– संपादक

श्री गणेशाच्या सोंडेच्या अग्र भागाची दिशा व स्थान यावरून त्याचे ४ प्रकार पडतात.
१) सिद्धी विनायक :-
गणपतीच्या सोंडेचा अग्र भाग हा त्याचा उजव्या वरच्या भागाकडे वळला असता त्यास सिद्धी विनायक म्हणतात.
२) ऋद्धी विनायक :-
गणपतीच्या सोंडेचा अग्र भाग हा त्याच्या डाव्या वरच्या भागाकडे वळला असता त्यास ऋद्धी विनायक म्हणतात.


३) बुद्धी विनायक :-
गणपतीच्या सोंडेचा अग्र भाग हा उजव्या खालच्या भागाकडे वळला असता त्यास बुद्धी विनायक म्हणतात.
४) शक्ती विनायक :-
गणपतीच्या सोंडेचा अग्र भाग हा डाव्या खालच्या भागाकडे वळला असता त्यास शक्ती विनायक म्हणतात.

गणपती म्हणजे समूहाचा पती, म्हणजे नेता. गणपती तत्वज्ञानाची देवता आहे, तसेच तो नेताही आहे, त्या मुळे तो बुद्धीमानही असलाच पाहिजे, म्हणून त्याचे मस्तक हे हत्तीचे आहे, कारण हत्ती हा सर्वश्रेष्ठ बुद्धिमान प्राणी आहे.

गणपतीला बाह्य सौंदर्य नाही, पण आंतरीक सौंदर्याचे वैभव भरपूर आहे. गणपतीच्या प्रत्येक अवयवातून घेण्यासारखं खूप काही आहे.

हत्तीचे कान हे सुपासारखे आहेत. “सार सार को ग्रही लई और थोथा देई उडाये” म्हणजे फोलकटे फेकून देऊन स्वच्छ भाग स्वतःकडे ठेवते. तात्पर्य असे की बोलणे सर्वांचे ऐकावे, परंतु योग्य ते घ्यावे व बाकीचे सोडून द्यावे.

मोठे कान हे श्रवण भक्तीचे दिग्दर्शक आहे.

गणपतीचे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्म दृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात.

हत्तीची सोंड (नाक) दूरपर्यंत हुंगते, म्हणजे मानवी जीवनात दुरदर्शीपणा असला पाहिजे हे दर्शविते.

गणपतीला दोन सुळे असतात, एक पूर्ण आणि दुसरा अर्धा (तुटलेला). पूर्ण सुळा हा श्रद्धेचा व अर्धा सुळा हा बुद्धीचा. याचा अर्थ असा की, बुद्धी थोडी कमी असली तरी चालेल, पण श्रद्धा मात्र पूर्ण हवी.

गणपतीला चार हात असतात. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक आणि चौथा हात आशीर्वादाचा. अंकुश वासनावर नियंत्रण ठेवतो. पाश शिक्षा सामर्थ्याचा आहे. मोद म्हणजे आनंद. ज्या हातावर मोदक आहे, तो जीवनात आनंद निर्माण करतो, आणि चौथा हात हा आशीर्वाद देतो.

गणपतीला लंबोदर म्हणतात. ऐकलेल्या सर्व गोष्टी पोटात साठवून ठेवतो, याचे ते सुचक आहे. गणपतीचे पाय लहान (तोकडे) आहेत, त्यामुळे तो धावू शकत नाही. म्हणजेच कोणत्याही बाबतीत उतावीळ पणा करू नये, हा त्याचा मतीतार्थ आहे.

गणपतीचे वाहन उंदीर आहे. हे एकमेव असे वाहन आहे की जे घरात प्रवेश करू शकते. म्हणजेच महान पुरुषांची साधने ही लहान व नम्र असावीत याचे ते द्योतक आहे. उंदीर हे मायेचे देखील प्रतीक आहे. उंदीर चावतो, पण चावण्यापूर्वी तो त्या जागी फुंकर घालतो, त्या मुळे तो चावला आहे हे त्या क्षणी तरी समजत नाही.

गणपतीला दुर्वा आवडतात. महत्व नसलेले गवत त्याने स्वतःसाठी घेऊन त्याचे मूल्य वाढविले आहे. गणपतीला लाल फुल प्रिय आहे. लाल रंग हा क्रांतीसुचक आहे. गणपतीला तांदूळ वाहतात. तांदळाला संस्कृत मध्ये अक्षता म्हणतात. अक्षत म्हणजे अखंड… . न तुटलेला.
याचा अर्थ असा की भक्ती ही अखंड असावी.

अध्यात्मिक दृष्ट्या इंद्रियांचा गण म्हणजे मन. मन शांत असेल तर कार्य सिद्धी होते , म्हणून गणपतीला प्रथम पूजनाचा मान दिला जातो, तो या मुळेच.

गणपतीचा प्रत्येक अवयव हा मार्गदर्शी आहे. तो दु:खहर्ता आहे, म्हणून श्री गणेशाला प्रथम नमन करताना ……..
“वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ।
निर्विघनं कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा।।”
असे हात जोडून म्हणतात.

ह्या गणेशोत्सव काळात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते. गौरी व गणपती यांचे नात्यासंबंधी वेगवेगळे विचार आहेत. काही ठिकाणी पार्वती रुपात आई आपल्या बालकाला भेटावयास येते. काही भागात ती बहीण रुपात येते असे मानतात. अनुराधा नक्षत्रावर या गौरींचे आगमन होते. ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पूजन होते, म्हणून यांना ज्येष्ठा गौरी म्हणतात. मूळ नक्षत्रावर यांचे विसर्जन होते.
।। इति शुभम् ।।

— संदर्भ : संस्कृती पूजन.

अरुण पुराणिक


— लेखन : अरुण पुराणिक पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments