१. क्षण निरोपाचा
बाप्पा तुला निरोप देताना बांध सुटला रे मनाचा
नको नकोसा वाटतो
तो क्षण निरोपाचा
तुला ही कळली असेलच माझ्या मनाची घालमेल
असं वाटतं की का येते आमच्यावर अशी वेळ.
तुझ्या डोळ्यात
अथांग महासागर नांदतो
तरी ही वेडे भक्त आम्ही तुलाच बुडवायला निघतो..
सार्यांची विघ्न दूर करून त्यांना तूच तारतो
तरी तुझ्या भोवती आम्ही सुरक्षाकवच लावतो..
सगळं काही जाणवत असेलच ना तुला एकदंता
मग तूच दे ना आमच्या विचारांना परिपक्वता..
द्वेष मत्सर अन अहंकाराचा मिटवून टाक कोरोना
प्रेम आपुलकी अन माणुसकीचा मंत्र दे या जीवांना..
चार भिंतीतील घुसमट दूर कर तू गणराया
मजबुरीचा लॉकडाउन घेऊन जा पडतो तुझ्या पाया
थंडावलेल्याची साऱ्या
जिवांना तू दे नवसंजीवनी
महाल असो वा झोपडी भरून टाक नम्रतेच्या धनांनी
जलमय तुझं करताना हेच, हेच एक अबोल मागणं
पुन्हा नको येऊ देऊ असा निरोपाचा क्षण….

— रचना : सौ अनिता व्यवहारे. श्रीरामपूर
२. विसर्जन
वाजत गाजत गणराज आले
दहा दिवस विराजमान झाले
देवघर सजले फळाफुलांनी
आनंदोत्सव साजरे केले //१//
गौरीशंकर आले सोबतीला
घर भरले तुझ्या येण्याने
मोदक पुरणपोळी लाडू
नैवेद्याला बनले आनंदाने //२//
आरती भजन कीर्तन
भक्तीभावाने पूजा केली
आबालवृद्धांनी आनंदाने
स्तुती सुमने उधळली //३//
निरोपाची वेळ जवळ येता
कंठ सर्वांचा दाटून आला
विसर्जन करण्यासाठी तुझा
नयनांचा बांध फुटला //४//
गणपती बाप्पा मोरया
गजर करत निरोप देताना
पुढच्या वर्षी लवकर येण्याचे
वचन दिले तू जाताना //५//

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800