Wednesday, February 5, 2025
Homeलेखगती

गती

पृथ्वी हल्ली जरा जास्तच जोरात फिरते का हो ? म्हणजे अचानक गती वगैरे वाढली नाही ना ? उगाच गुगल करायला जाऊ नका. असं काहीही सापडणार नाही. मग मी असं का म्हणतेय हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ?

अहो बघावं तिकडे प्रत्येक गोष्टीची गती वाढतेय. कोणाला उसंतच नाही जरासुद्धा. नकळत आपण कशाच्यातरी मागे सतत धावत असतो. इतके की पृथ्वीच जोरात फिरतेय असं वाटू लागलय.
सर्वत्र वेगाच्याच गोष्टी समोर येतात. कुठल्यातरी विद्यार्थ्यांनी फास्ट ट्रेनची प्रणाली शोधली. तर कुठे सुपरसॅानिक विमानांच्या सुरस कथा. अहो इतकच काय खाद्यपदार्थातही सारं इन्सटंट होतय. इंटरनेटचा स्पिड तर जितका वाढेल तितका हवाच आहे. खरच कळत नाही ही गती मानवाला कुठे नेणार आहे ?

अर्थात रूग्णवाहिकेचा वेग वाढला तर तो हवाच आहे. त्याने कोणाचे तरी प्राण वाचतील. पण खाणं त्वरीत, आराम त्वरीत, संगीतही वेगवान .. अशाने संथ लयीची गाणी तयार होतील का ?
झाली तर ती कोणाला आवडतील का ? मुळात असं गाणं सुचायला लागणारा वेळ गीतकार, संगीतकार आणि गायक सारेच देऊ शकतील का ? माझ्या पीढीचं त्यातल्या त्यात ठिक आहे. आमच्या पीढीने होणारा बदल एका संक्रमण काळात अनुभवला आहे. पण येणाऱ्या भावी पीढ्या कोणास ठाऊक काय गतीने बदल अनुभवतील ?

बदल हा या जगाचा स्थायीभाव आहे. हे त्रिवार सत्य पण कुठेतरी आत असं जाणवतं याला करणीभूत आपणच आहोत. आपल्याला सध्या इतक्या गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत की एका गोष्टीवर मन स्थिर होणं मुष्कील झालय. गती असो वा नसो प्रत्येकजण सगळ्यात नाक खुपसतोय. जे जे उपलब्ध आहे ते मी उपयोगात आणलचं पाहिजे असा गोड गैरसमज प्रत्येकाचा होतोय. यात आपल्याला काय आवडतं, काय चांगलं जमू शकतं, कशासाठी प्रयत्न करायचे आहेत ? या साऱ्याची सरमिसळ होत चालली आहे. असं वाटतं अशी स्थिती पूर्वीही होऊन गेली का ?

म्हणूनच ऋषी मुनी, संत एकांतवासात जात असत का ? हल्ली आपण एकांत वासात जायचं म्हटलं तरी शक्य होईल का ? इतकी व्यवधानं आजुबाजूला वाढत आहेत. मनाचा वेग तर प्रचंड आहेच पण हल्ली तो ही आणखीच वाढलाय की काय अशी शंका येते.
प्रत्येक माणूस काही ना काही शोधतोय. अर्थात बाहेर ! पण आत मात्र आपल्याला काय हवय यापासून दूर दूर जातोय. या तफावतीत आणखीच तगमग वाढते आणि नव्या जोमाने बाह्य जगातील शोध चालू होतो.

टेक्नॅालॅाजीला दोष द्यावा की त्यामागे जाणाऱ्या मानवाला ? पुन्हा जगाबरोबर नाही चाललात तर तुम्ही मागे पडाल असा मोलाचा सल्ला देणारे अनेकजण असतातच. नाही म्हणायला खरी खरी साधना, परमेश्वराचा ध्यास यावर मात्र या गतीचा परिणाम नाही. तिथे मात्र प्रत्येकाचा वेग वेगळा, लागणारा वेळही वेगळा. शास्त्रीय संगीत साधनेचंही तसंच म्हणता येईल. सूर, गळा तयार व्हायला अजुनही वेळ द्यावा लागतो. तो काही इन्सटंट मिळत नाही. म्हणजेच ती अनुभूती घ्यायची असेल तर आवश्यक तो वेळ द्यावाच लागेल तिथे हयगय चालणार नाही.

शिंपल्यात तयार होणारा मोती वेळ घेऊनच पाणीदार होतो. कृत्रीम मोत्याला तशी सर नाही.पण कृत्रीम व अस्सल यातील भेद जाणणारी दृष्टीसुद्धा वेगापायी गमावत चाललोय.रामानंद सागर यांचे रामायण आपण डोक्यावर घेऊन नाचत होतो ते आज पहाणं थोड कष्टाचं होतय कारण इतकं थांबण्याची आपली सवय तुटली आहे. मग या गतीपुढे व्यवधानांपुढे हार मानायची का आपण ? ही गती अशी वाढतच राहणार यात शंका नाही.

सिस्टीम वर विद्युत भार जास्त आला की कसं आपणं चक्क काही गोष्टी स्विच ॲाफ करतो. म्हणजेच भाराचं नियमन करतो. तसंच काहीसं करण्याची गरज आहे. आपल्या स्वतःच्या निकषांची चाळणी लावून गोष्टी तावून सुलाखून निवडल्या पाहिजेत. जे जे उपलब्ध आहे त्या पाठीमागे न जाता निवडक ते वेचायला शिकलं पाहिजे. संगीतात रुची असेल तर त्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत. स्वयंपाकात असेल तर त्यासाठी वेळ राखला पाहिजे. इथे इंन्सटंट ला नकार देण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी लागेल. एक दिवस, किमानपक्षी एक तास गॅजेट्स शिवाय जगता येते का पहायला हवे. नसेल जमत तर सवय करण्याची नितांत गरज आहे असे समजावे.

मनाचा हरवत चाललेला समतोल हवा असेल तर योग्य दिशेने वाटचाल करण्यास त्याला भाग पाडले पाहिजे. हे सारे कोणा दुसऱ्याच्या समाधानासाठी नाही तर स्वतःच्याच मनाला समाधान, शांती मिळावी याचसाठी. देवाधर्माची आवड असेल तर किमान पाच मिनिटे परमेश्वरासन्निध शांत बसले पाहिजे. देवावर विश्वास असणारे नसाल तर नुसतेच पाच मिनिटे डोळे बंद करून पहा. उत्तरे नक्कीच सापडतील.

वाढणाऱ्या वेगाचं अवडंबर न माजवता आपण शांतता मिळवण्यासाठी काय करू शकू याचा शोध घेणं अधिक फायद्याचं ठरेल. स्लो ट्रेन पकडायची की फास्ट नॅानस्टॅाप की दोन्ही न पकडता चिंतन करायचं हे तुम्हीच ठरवा. शांतता मिळवण्यासाठी धावायचं की शांत व्हायचं तुम्हीच ठरवा. दोन्ही तुमच्याच हातात आहे.

शिल्पा कुलकर्णी

– लेखन : शिल्पा कुलकर्णी. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी