Friday, November 22, 2024
Homeलेख"गप्पा"

“गप्पा”

आपला सर्वांनाच गप्पा आवडतात. पण जर कुणाला त्या आवडत नसतील तर त्यांनी आवडून घ्यायला हवं. आजच्या काळात “गप्पा” म्हणजे जणू “स्ट्रेस बस्टर” म्हटला पाहिजे. तर अशा या “गप्पा” या विषयावर तत्व चिंतनात्मक लिहिलंय,
अनुराधा जोशी, मुंबई यांनी.

अल्प परिचय
अनुराधा जोशी या बी. ए. (ऑ.) असून त्यांनी पहिल्यापासुन वाचन व लेखन हे छंद जोपासलेले आहेत. त्यांना लेख, निबंध, कथा, ललित लिहायला अधिक आवडतं.
काही दिवाळी अंक, डिजिटल अंक यातुन त्या लिहित असतात. “सावली” व “सोबती” ही दोन पुस्तके बोरिवलीच्या सुविद्या प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. त्यांना अनेक बक्षिसे व पुरस्कार मिळाले आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक

“गप्पा”
माणुस हा कळपामधे रहाणारा म्हणजेच समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तो एकटा असा राहू शकत नाही. समाजाशी त्याला जगण्यासाठी संवाद साधावा लागतो. मग गरज भासते ती खाणाखुणा, काही हुंकार किंवा हातवारे यांची मदत. यातुनच निर्माण झाली ती कामापुरती भाषा. आपली बोलण्याची शक्ती म्हणजेच वाणी, ….. तिच्या मदतीने माणुस समाजाशी संपर्क साधायला लागला. असा संवाद सुरू झाला. यातुनच स्वर, अक्षर शब्द बनले. त्या शब्दांना काना, मात्रा, वेलांटी, आकार ऊकार इ. चा साज चढवला व सुंदर सरळ सोपी अशी समाजाला कळेल अशी भाषा समाज बोलू लागला.

मुलांची बोबडी … ओवीतुन … अंगाईतुन..भारूड, किर्तन, गायन, वादन, अभंग, गवळणी अशा अनेक अंगातुन भाषा वाढत गेली. अलंकार, समास वृत्त, मात्रा, जोडशब्द वाक्प्रचार आणि ऊपमा यांनी ती सजत गेली. ऊद्योगांबरोबर कोसाकोसावर बदलत रूढ झाली. हजारो वर्षापूर्वी शिलालेखांवर भाषा कोरलेली दिसते. नाण्यांवर मुद्रांवर ती दिसते. म्हणजे हजारो वर्षांपासुन समाज संवाद, संपर्क साधत आहे. असं आपल्या ओळखीच्या भाषेतुन समोरच्याशी बोलत समाज वाढत गेला. विस्ताराबरोबरच प्रगल्भ झाला. शेती, दुष्काळ विहिरी पाऊस, रोगराई, घरबांधणी, कुटूंबव्यवस्था यातले प्रश्न सोडवत स्थिर झाला. यातुनच मोठमोठ्या संस्कृत्या नांदल्या.

असं हे प्रथम माणुस…. मग संपर्काची गरज… संवादाची तडफड… समाजाशी बांधिलकी … असं मनुष्य जीवन आज हजारो वर्ष चालत आलंय. माणुस, भाषा आणि समाज सगळीकडेच सुधारणा होत आली आहे. समाज स्थिरावला आणि आपल्याला जो जवळचा, आवडता किंवा कामाचा समोरचा माणुस असेल त्याच्याशी खुप वेळा संपर्क साधत संवाद वाढत गेला. कधी कामासाठी, कधी सल्लामसलतीसाठी तर कधी अगदी करमणुकीसाठी. या संवादालाच गप्पा म्हणतात.

वेळ जाण्यासाठी एखाद्या विषयावर मनमोकळं बोलणे म्हणजे गप्पा. गप्पा मारणं हा मनुष्याचा स्थायिभाव आहे. तो संधी मिळाली की कधीही, कोठेही, कोणाबरोबरही, कशाबद्दल तरी, काही तरी बोलायला लागतो. समोरच्याचा छान प्रतिसाद मिळाला की गोडी अधिकच वाढते. यात पुढे आणि काही जण भाग घेतात व इतरांचे, स्वत:चे छान मनोरंजन करतात, शिवाय आपला वेळही छान घालवतात.

अशा या गप्पा मग राजकारण, एखादी तात्कालीन घटना, देशाची प्रगती, नातेवाईक व त्यांच्या तऱ्हा, शिक्षण समाजप्रवृत्ती इ. अनेक कारणांवर रंगतात.
गाडी ऊशीरा आली इतकी साधी घटनाही गप्पांचा विषय होऊ शकतो. पण वेळ छान जातो.यात तावातावाने, आकांडतांडव करून बोलणार्यांची, शेरेबाजी करणार्यांची, टिका करणार्यांची, बोलणार्यांची छान हौस भागते. ऐकणार्यांची मजा होते. करमणूक तर छानच होते.

अनोळखी व्यक्तींशीही गप्पा मारल्याने ओळखी वाढतात. पुढे त्या जपल्या जातात. काही गरजेची आवश्यक माहिती कळते.सहाय्य मिळते. आनंद मिळतो. सोबत मिळते.

गप्पा दोन प्रकारच्या असतात. सकारात्मक म्हणजे सरळ साध्या आणि नकारात्मक म्हणजे टिका, अपमान, अवहेलना करणार्या.
समाजातील स्त्रीवर्ग नकारात्मक गप्पा मारण्यात पुढे तर पुरूष बरेचदा सकारात्मक गप्पा मारतात. मुलं, तरूण चैतन्यपूर्ण, आनंददायी गप्पा मारतात तर वयस्कर मंडळी कंटाळवाण्या, निराशेच्या त्याच त्या गप्पा मारतात.

सर्वात रंगतात त्या पुरूषी गप्पा. म्हणजे राजकारण, आपले कामकाज कचेरी, सोसायटी, कमिटी एकूणच मार्केट शिक्षणपद्धती यावरच.
खुप हिरीरीने तावातावाने हे समाजपुरूष मतं मांडत असतात. त्यांच्या नकारात्मक किंवा कधी कधी गमतीच्या गप्पा म्हणजे बायकोचे माहेर, बायकोच्या चुका, तिचा आळस ह्या विषयावर असतात.

आता एक स्री ही दुसर्या स्त्री ची शत्रू असते असं समजलं तर स्त्रिया या नेहमीच नकारात्मक गप्पा मारतात. सतत दुसरीची टिंगल टवाळी, नालस्ती करण्यात त्या मजेत गप्पा मारत वेळ घालवतात.
स्वता:चा तोरा, माहेर, मुलांची हुषारी, आपली श्रीमंती यावर मात्र हिरीरीने सकारात्मक बोलत आपला प्रभाव टाकतात. आपलं सासर, नातेवाईक, नवर्याच्या नावडत्या सवयी, सासरच्या भोचक व आगाऊ समजलेल्या बायका, शेजारणी, मोलकरणी अगदी मैत्रीणी सुद्धा. कोणाकोणाला म्हणून सोडत नाहीत. ही अशी निंदा नालस्ती करण्यात त्या कितीही वेळ काम असलेतरी गप्पा मारू शकतात. अगदी फालतू गोष्टीतही टिका सोडत नाहीत… जाऊ आगाऊ आहे.. नणंद नखरेल आहे, सासू आळशी आहे.. मोलकरीण भोचक आहे, शेजारीण कशीतरीच आहे, दुधवाला ऊशीराच येतो, वाणी किती खराब सामान देतो, शिक्षक मुलांकडे लक्षच देत नाही, आपलं सोडून इतरांची मुलं कशी बेशीस्त आहेत….
अहो, असे मोजता येणार नाहीत इतक्या विषयांवर बायका कितीही वेळ नकारात्मकच गप्पा मारतात. जणू सगळे वाईट… निकम्मेच… व आपण तेव्हढे चांगले… शिस्तशीर… सोशिक.. समजुतदार.. इ…इ.

पण कधीतरी, अगदी कधीतरी बायका सकारात्मक बोलतात हं ! पण आपल्या फायद्यासाठीच. गाडीत सहप्रवासी महिला काही विणत, शिवत, भरत असेल तर शिकण्यासाठी… त्या कोणता टाका .. कसा घालायचा.. रंग रेशीम कोणते ?… भरतकामात किती ऊलट … किती सुलट.. सांखळी कूठे ? रूद्राक्ष गांठ कशी मारायची ? विविध वीण कशी करायची ? यावर अगदी कीस पाडतात.साड्या, रंग पोत प्रकार इ. तर जिव्हाळ्याचाच विषय. मग काय ! सकारात्मक गप्पाच रंगतात. यातुन मी कशी खरेदी स्वस्तात व चलाखीने करते. आपली आवड खुप दर्जेदार आहे याचा दिखावा मात्र ठायी ठायी ओसंडून वहातो. हा असतो कामकाजावर कचेरीला जाणारा आणि गाडीतच भेटणारा गट.

पण अजुन एक गट ऊंबरठा, चुल व मुलं, ओटा नळाचं येणारे पाणी, स्वैपाक, अनेक पदार्थ, चव, रेसीपी आणि महागाई यातच अडकलेला असतो. सतत वैतागलेला.. कामात गुंतलेला. इथे साड्यांपेक्षा रेसीपी हा गप्पांचा एक अविभाज्य भाग असतो. खुप जिव्हाळ्याचा. आपण किती घरात मरमर मरतो, किती स्वादिष्ट, पौष्टिक पदार्थ बनवून पैसे वाचवतो, पण “घरकी मुर्गी दाल बरोबर” हाच न्याय मिळतो.

देव पूजापाठ, अध्यात्म इ. रंगलेल्या गप्पा दुरूनच ऐकण्यासारख्या असतात. मुलांच्या गप्पा बहुदा क्रिकेट, हॉकी, फूटबॉल अशा खेळांवर किंवा बूट, ड्रेस, मुली, सिनेमे यावर आनंदाच्या ऊमेदीच्या हंसत्या खेळत्या ऐकाव्यात अशा असतात. दिवाळीत फटाके, ऊन्हाळ्यात आंबे थंडीत लौकर ऊठावे लागते किंवा कधी सहल आणि पावसाळ्यात येणारी मजा इतकाच बदल आढळतो. मुली फॅशन, कपडे, अलंकार, मुलं यातच रमतात.

वयस्कर मात्र सध्याची महागाई, आजची ऊधळी आळशी पिढी, मुलं, सून, नोकरीतील अन्याय यावर निराशाजनक गप्पा मारतात. ते राजकारणातही निराशच असतात.

सर्वात मजेशीर म्हणजे सासरहुन माहेरी आलेली मुलगी व आई यांच्या रात्रभर चालणार्या गप्पा. त्या काय बोलत बसतात हे पुरूषांना कधीच समजणार नाही. आजीच्या नातवंडांबरोबरच्या गप्पा, नवरा बायकोच्या हळू आवाजातल्या गप्पा, दोन जिवलग मैत्रीणींच्या गप्पा, प्रियकर प्रेयसीच्या तर तासनतास चालणाऱ्या गप्पा हे तर मोठे गहनच विषय आहेत. ते काय, कशावर, किती गप्पा मारत बसतात, हे त्यांचे त्यांनाच समजते की नाही, कोण जाणे !

अशा या गप्पा रंगतात. तेव्हढा वेळ मजेत जातो. घड्याळामागे धावायला लावणारे दैनंदिन जीवन, महागाई, वाटेला आलेले माणसं, त्यांचे स्वभाव, परिस्थिती, रोजच्या अडचणी, संकटे, ताण, चिंता या बरोबरच भेडसवणारे आपले भविष्य .. हे सगळे क्षणभर विसरले जाते. मनासारखे मत मांडता येते. आनंदी साथसंगतीत विरंगुळा मिळतो. आपलेपणा जपला जातो, यासाठी गप्पा वरदानच ठरतात.

अशी आहे गप्पांची मजा. अर्थात माझं हे लिहिणं म्हणजे तुमच्याशी मारलेल्या गप्पाच आहे. नाही का ? तुम्हाला काय वाटते ?????

अनुराधा जोशी.

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments