भारती विद्यापीठाचे जनक डॉ. पतंगराव कदम यांची काल जयंती झाली. त्यानिमित्ताने हा विशेष स्मृती लेख. डॉ. पतंगराव कदम यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
गरिबीशी व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जीवनाचे ध्येय साध्य करणारा ग्रामीण भागातील एक सर्वसाधारण युवक ते उच्च शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून नोकरी, भारती विद्यापीठाची स्थापना करून शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणारे शिक्षण महर्षी, राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःतील नेतृत्व गुण ओळखून आमदार, मंत्री होऊन महाराष्ट्राच्या राजकारणातील लोकनेता, सहकार व उद्योगाच्या माध्यमातून परिवर्तन घडविणारे यशस्वी उद्योजक, सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी काम करणारे समाजकारणी असा पतंगराव ते डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा प्रवास फक्त प्रेरणादायीच नाही तर सर्वांसाठी एक आदर्श आहे.

शिक्षणाचा ध्यास :
दि. ८ जानेवारी, १९४४ सांगली जिल्ह्यातील दुष्काळी व दुर्गम भागातील सोनसळ या ८०० लोकवस्तीच्या खेड्यात पतंगरावांचा जन्म झाला. दररोज ५ किमी चालत जाऊन शिरसगाव (जि.सांगली) येथे प्राथमिक शिक्षण आणि पुढील मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण कुंडल (जि. सांगली) येथील क्रांतिसिंह नाना पाटील वसतिगृहात राहून पूर्ण केले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे ‘कमवा आणि शिका’ योजनेअंतर्गत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील वाडिया कॉलेज मधून टिचर्स डिप्लोमा पूर्ण केला. अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करत पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रातील प्रशासकीय समस्या’ या विषयावर पीएच. डी. संपादन केली. अशा प्रकारे पतंगरावांनी MA, TED, LLM, PhD उच्च शिक्षण पूर्ण केले.
स्वतःचे विद्यापीठ स्थापण्याचे स्वप्न :
सन १९६१ मध्ये पतंगराव कदम हे पुण्यात आले आणि सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालय, हडपसर येथे ७० रु. मासिक पगारावर अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करू लागले. परंतु शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याचे ध्येय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे दि. १० मे, १९६४ रोजी ग्रामीण विद्यार्थ्यांची गणित आणि इंग्रजी या विषयात गुणवत्ता वाढविण्याच्या उद्देशाने कोचिंग व परीक्षा घेण्यासाठी सदाशिव पेठ, पुणे येथे चाळीतील १० x १० च्या एका खोलीत खिशात फक्त १९ रू. असताना भारती विद्यापीठाची स्थापना केली. पुढे १९६८ मध्ये शंकरराव मोरे विद्यालय, एरंडवणे, पुणे येथील महानगरपालिकेची शाळा चालवायला घेऊन पुढील वाटचाल सुरू केली. त्यानंतर एरंडवणे येथेच यशवंतराव मोहिते महाविद्यालय, मॅनेजमेंट कॉलेज, फार्मसी कॉलेज, लॉ कॉलेज सुरू केले आणि धनकवडी, पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. दि. २६ एप्रिल, १९९६ रोजी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय म्हणून मान्यता मिळाली. आज भारती विद्यापीठ ही देशातील नावाजलेली शिक्षण संस्था आहे. एखाद्या व्यक्तीच्या मालकीचे किंवा खाजगी विद्यापीठ स्थापन करण्याची कायदेशीर तरतूद नसतानाच पतंगरावांनी त्यांनी गणित व इंग्रजी कोचिंग क्लासेस सुरू करतानाच ‘भारती विद्यापीठ’ बोर्ड लावून सुरुवात करणे यातून अस्तित्वात नसलेले स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची दुर्दम इच्छाशक्ती दिसून येते.

नेतृत्व गुण व राजकीय प्रवास :
यशवंतराव मोहिते, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या काळात तरुण वयातील पतंगराव राजकारणाकडे आकर्षित झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. दि. १ जुलै, १९६८ ला महाराष्ट्र राज्य रस्ते व वाहतुक महामंडळाचे बोर्ड मेंबर हे त्यांचे पहिले राजकीय पद. १९८० मध्ये त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून भिलवडी – वांगी या मतदारसंघातून लढवली आणि त्यात त्यांचा पोस्टल मतांमध्ये निसटता पराभव झाला. त्यातून हार न मानता १९८५ साली पहिल्यांदा आमदार झाले. १९९० साली दुसऱ्यांदा आमदार आणि १९९० मध्येच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री झाले. त्यानंतर १९९९, २००४, २००९, २०१४ असे ६ वेळा आमदार झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीत शिक्षण, पाटबंधारे, उद्योग व वाणिज्य, महसूल, सहकार, वने, संसदीय कामकाज, मदत व पुनर्वसन अशा विविध मंत्रालयांचे काम पाहिले. शिक्षित, सुसंस्कृत, कार्यक्षम, विचारधारा व पक्षाशी निष्ठावान राजकारणी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा लोकनेता म्हणून महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
सहकार व उद्योगातील योगदान :
केवळ भारती विद्यापीठ च नाही तर पतंगराव कदमांनी अनेक संस्थांची स्थापना करून ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले. भारती बझार, भारती सहकारी बँक, अभिजीत कदम पतसंस्था, सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी, सोनहिरा दूध संघ, सोनहिरा कुक्कुटपालन संघ, कृष्णा येरळा सूत गिरणी इत्यादी अनेक संस्थांची स्थापना केली. कुंडल येथे वन अकादमी आणि पलूस व कडेगाव येथे औद्योगिक वसाहतींची उभारणी केली.

सामाजिक कार्यात अग्रणी :
भारती विद्यापीठाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, उच्च शिक्षणासाठी फी माफी, १०००० पेक्षा अनेक लोकांना १ रु. ही न घेता नोकरी आणि १ रु. न घेता बदली, लाखो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. राजकीय पक्ष आणि अन्य भेदाभेदाचा विचार न करता त्यांनी सर्व क्षेत्रातील लोकांना व गोरगरीब लोकांना कायमच मदत केली.

लोकतीर्थ :
दि. ९ मार्च, २०१८ रोजी, वयाच्या ७४ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानंतर लिलावती रुग्णालय, मुंबई येथे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर सांगली जिल्ह्यातील वांगी – अंबक जवळ पूर्णाकृती पुतळा आणि “लोकतीर्थ” हे स्मारक व संग्रहालय उभारण्यात आले आहे. ते अभ्यागतांसाठी सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत आणि रविवार सकाळी १२ ते रात्री १२ या वेळेत खुले असते.
८२ व्या जयंती निमित्त, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या, कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला अभिवादन !

— लेखन : डॉ. विशाल माने.
माजी पोलीस अधिकारी, नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
