Monday, September 15, 2025
Homeलेखगांधी विचार

गांधी विचार

महात्मा गांधीजींच्या आदर्श विचारांची यादी खूप मोठी आहे. यापैकी आपण फक्त एका विचाराचा जरी स्वीकार केला तरी आपले संपूर्ण जीवन आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलेल.आज त्यांची जयंती आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ या काही “गांधी विचार”….

शरीर आणि मन स्वच्छ नसेल तर ईश्वराची कधीच प्राप्ती होऊ शकत नाही. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी तना मनाचे शुद्धीकरण आवश्यक आहे. क्रोधावर शांततेने विजय मिळविता येतो तसेच एखाद्या अन्यायाविरुद्ध शांततेने लढा दिला तर विजय हा आपलाच होतो.

महात्मा गांधीजींच्या विचारांवर आपल्या जीवनाचा प्रवास करत अनेक नेत्यांनी आपले जीवन यशस्वी केले. महान आत्मा या त्यांच्या उपाधी प्रमाणे खरोखर गांधीजींचा प्रत्येक विचार अपयशाच्या अंधकारमय मार्गातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाटसरूसाठी एक दिशादर्शक अखंड जळणारी ज्योत आहे. त्यांच्या विचार सागरातुन घेतलेले काही विचार पुढील प्रमाणे

1)  स्वतःच्या स्व शोध घ्यायचा असेल तर स्वतःला इतरांच्या सेवेत समर्पित करा:-
सेवेचे महत्त्व गांधीजींनी आपल्या स्वतःच्या आचरणातून संपूर्ण जगाला पटवून दिले. आश्रमातील भाजी निवडण्यापासून तर डाळ-तांदूळ निवडण्यापर्यंत सर्व कामे ते स्वतः करायचे. स्वालंबी जीवनाचे महत्व आणि त्यातून मिळणारा आनंद काय असतो हे त्यांनी जगाला दाखवून दिले.

2)  जगाला बदलायचं असेल तर सुरुवात ही आपल्यापासून व्हायला हवी:-
कोणतेही बदल घडवायचे असेल तर त्यासाठी उपदेश देत बसण्यापेक्षा त्या बदलाची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. संपूर्ण जगाला स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी गांधीजींनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छतेची सुरुवात केली. कोणत्याही बदलाची सुरवात स्वतःपासून करायला हवी याचे सुंदर उदाहरण म्हणजे गांधीजी.

3)  विश्वास ठेवणे हा एक गुण आहे. अविश्वास हा दुर्बलतेची जननी आहे:-
कोणत्याही कामाची सुरुवात केल्यानंतर आपण त्या कामात यशस्वी होणारच हा विश्वास सर्व प्रथम स्वतःमध्ये निर्माण करता यायला हवा त्यानंतर यश हे तुमच्याकडे आपोआप आकर्षित होते. कामाची सुरुवात करत असताना जर तुमच्या मनामध्ये अविश्वास निर्माण झाला तर याचा अर्थ ते काम यशस्वी करण्यास तुम्ही असमर्थ आहात.म्हणून यशप्राप्तीसाठी विश्वास ठेवणे या महत्त्वपूर्ण गुणाची खूप आवश्यकता आहे.

4)  प्रसन्न रूपी अत्तर तुम्ही इतरांवर शिंपडल्यास त्याचे काही थेंब तुमच्या हातावर ही नक्कीच पडतील:-
ज्याप्रमाणे रंग उधळणारे हात देखील रंगून जातात अगदी त्याच प्रमाणे तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाचा अत्तर जितका तुम्ही इतरांवर शिंपडाल तितकेच तुमचे स्वतःचे जीवन प्रसन्न होत जाईल.

5)  बलहीन व्यक्ती कोणालाही क्षमा करू शकत नाही बलवान व्यक्तीच इतरांना क्षमा करू शकतो:-
झालेल्या अपराधाबद्दल जर समोरची व्यक्ती माफी मागत असेल तर ज्या व्यक्तीमध्ये उच्च विचारांचे बल असेल तीच व्यक्ती इतरांना माफ करू शकते. अनेक विचारांच्या गुंत्यात गुरफटलेली व्यक्ती कधीच बलवान होऊ शकत नाही बलवान होण्यासाठी नेहमी सकारात्मक विचारांची सोबत करता यायला हवी तरच आपण इतरांना माफ करू शकतो.

आपल्या विचारांच्या बळावर संपूर्ण जगावर प्रभुत्व गाजवणारे गांधीजी म्हणजे केवळ एक व्यक्तिमत्त्वच नसून सत्य अहिंसेचे उपासक होते.महात्मा गांधीजींच्या आदर्श विचारांची यादी खूप मोठी आहे यापैकी आपण फक्त एका विचाराचा जरी स्वीकार केला तरी आपले संपूर्ण जीवन आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच बदलेल.

पुनम सुलाने

– लेखन : पुनम सुलाने, हैदराबाद
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments