Monday, July 14, 2025
Homeकलागाता रहे मेरा दिल

गाता रहे मेरा दिल

सदाबहार एव्हरग्रीन अभिनेता देव आनंद ची जन्मशताब्दी आज पासून सुरु होतेय. म्हणजे देव आनंद आज जिवंत असता तर शंभर वर्षाचा झाला असता. या सळसळत्या वयात सारा अली खान वा जान्हवी कपूर ला घेऊन एखाद्या सिनेमा च्या शूटिंग मध्ये कार्यरत असता. तो गेला तेव्हा हौझी मधल्या two fat ladies ,eight & eight 88 सारखा तब्बल आठयांशी वर्षाचा होता.

खरतर ८८ वर्षांच्या आजोबांच्या वयाला शोभेल अशा माणसाचा एकेरी उल्लेख करणे सर्वस्वी गैर आहे. पण हा माणूस कधी म्हातारा झाला असे वाटलेच नाही. तारुण्यात त्याच्यात जेवढा उत्साह होता त्यापेक्षा जास्त उर्जा वार्धक्यात होती. किंबहुना या उर्जेनेच याही वयात त्याला कार्यरत ठेवले होते. खरेतर गेल्या ३० वर्षांमध्ये त्याचे सिनेमे आले कधी आणि गेले कधी ते समजलेच नाही. देव आनंद चा शेवटचा हिट चित्रपट म्हणजे देस परदेस. तो आला होता १९७८ साली. त्यानंतरच्या देव आनंद च्या चित्रपटाची नावे लक्षातच येत नाहीत. याचा अर्थ देव आनंद संपला होता असे नाही तर देव आनंद चा जमाना संपला होता. त्याच्या बरोबर त्याचा चाहता प्रेक्षक वर्ग देखील वयस्कर झाला होता. नवीन पिढीला त्यांचे नवीन idols सापडले होते, त्यामध्ये देव आनंद कुठेही नव्हता. पण देव आनंद हे मानायला तयार नव्हता. नवीन चेहरे introduce करत होता. तरुण पिढी बरोबर उत्साहाने काम करत होता. पण देव आनंद च्या नावावर चित्रपट हीट होण्याचा जमाना आता राहिला नव्हता. आधीचे चित्रपट तिकीट बारीवर आपटत असताना हा प्रत्येक नवीन चित्रपटासाठी financer कुठून आणतो हा प्रश्न आपल्यासारख्या चाहत्यांना पडायचा, देवानंद ला नाही. देव आनंद चा चित्रपट आपटला की सुरवातीला वाईट वाटायचे नंतर नंतर त्याचेही काही वाटेनासे झाले.

देव आनंद च्या व्यक्तीमत्वाची जादू जरी देस परदेस नंतर ओसरायला लागली होती तरी त्याधीच २०-२५ वर्षे ह्या देखण्या पंजाबी हिरोने जवळ जवळ तीन पिढ्यांना रुपेरी पडद्यावर आपल्या व्यक्तिमत्वाने भारावून ठेवले होते. देव आनंद चा अभिनय बघायला मला नाही वाटत कोणी जात होते. अभिनयासाठी मोतीलाल, बलराज सहानी, दिलीप कुमार वगैरे नट मंडळी होती. देव आनंद चा एक स्वतःचा अभिनयाचा एक ढंग होता, एक style होती आणि त्याच्या चाहत्यांना ती आवडत होती. त्यामुळे चित्रपटात तो कोणत्याही भूमिकेत असला तरी पडद्यावर तो देव आनंदच असायचा. एकदा चुकून माकून धोतर घालून ‘इंसानियत’ मध्ये दिसला तर लोकांनी त्या चित्रपटाकडे पाठच फिरवली.

असं म्हणतात की राजकपूर चा तिसरी कसम रिलीज झाला त्याचवेळेस देव आनंद चा दुनिया चित्रपट लागला होतं. तिसरी कसम बघितल्यावर त्यातील “पान खायो सैया हमारे”, “दुनिया बनानेवाले” वगैरे गाणी म्हणतच प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडत, पण देव आनंद चा ‘दुनिया’ इतका फ्लॉप झाला की तो सिनेमा बघून झाल्यावर देखील लोक ‘तिसरी कसम’ चे तेच गाणे म्हणत बाहेर पडायचे “दुनिया बनानेवाले काहे को ‘दुनिया ‘ बनाई !!!!!” त्याच्या चाहत्यांना त्याच्याकडून माफक अपेक्षा होत्या. त्यांना तो देवानंद आवडायचा जो केसाचा कोंबडा ठेऊन, तिरकी मान करत, वाकडे चालत नायिकेच्या मागे मस्त रोमान्स करत, गाणी गात, रमत, बागडत फिरायचा. देवानंदच्या चित्रपटातील गाणी अशी असायची की चित्रपट संपल्यावर ती गाणी गुणगुणतच प्रेक्षक theatre च्या बाहेर पडायला हवेत.

एकदा मेट्रो ला matinee ला Guide लागला होता. Guide मधली सर्व गाणी आठवतच सिनेमागृहात शिरलो. सिनेमा सुरु झाला आणि हाय रे देवा! हा देवानंद चा इंग्लिश मध्ये dub केलेला Guide होता. म्हणजे इंग्लिश version मध्ये गाणी नसणार होती. गाणी नाहीत मग देवानंद चा सिनेमा कसा काय बघायचा ?

आतापर्यंत च्या देवानंद च्या चित्रपटाकडे नजर टाका. त्याचा कुठला ही सिनेमा डोळ्यासमोर आणा. अगदी ‘नौ दो ग्यारह’ पासून त्यातील गाणी आठवा. त्यातील “हम हैं राही प्यारके हम से कुछ ना बोलिये”, “आंखो मी क्या जी”, ही गाणी, ‘मुनीमजी’ मधील “जीवन के सफर मी राही”, ‘कालापानी’ मधील “हम बेखुदिमे”, ‘काला बाजार’ मधले “खोया खोया चांद”, ‘तेरे घर के सामने’ मधले title song, तू कहा ये बता, ‘कुतुब मिनार’ मध्ये picturize केलेले सदाबहार “दिल का भंवर करे पुकार”, ‘गाईड’ मधले “गाता रहे मेरा दिल”, “तेरे मेरे सपने अब एक रंग हैं”, “काटोसे खिचके ये आंचल”, ‘दुनिया’ मधले “दूरिया नजदीकिया बन गई”, ‘तीन देविया’ मधले “लिखा हैं तेरी आंखो में”, “ख्वाब हो तुम या कोई हकीकत”, Jewel Thief मधले “आसमाके नीचे”, “ये दिल ना होता बेचारा”, ‘प्रेमपुजारी’ मधले “फुलोके रंग से”, “रंगीला रे”, Gambler मधील “चुडी नही मेरा”, CID मधील “लेके पहला पहला प्यार”, “जब प्यार किसीसे होता हैं” मधील “सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था”, “जिया हो जिया कुछ बोल दो”, ‘तेरे मेरे सपने’ मधील “मैने कसम ली”, “जीवन की बगिया महकेगी”, ‘असली नकली’ मधले “तुझे जीवन के डोर से बांध लिया हैं”, “तेरा मेरा प्यार अमर”, ‘हम दोनो’ मधले “अभी ना जाओ छोडकर”, “अल्लाह तेरो नाम”, “मै जिंदगी का साथ निभाता चला गया”, ‘जॉनी मेरा नाम’ मधले “पल भर के लिये कोई हमे”, “ओ मेरे राजा”, ‘हरे राम हरे कृष्ण’ मधील “कांची रे कांची रे”, “दम मारो दम”, ‘पेइंग गेस्ट’ मधले “चांद फिर निकला”, “छोड दो आंचल”, आणखी किती चित्रपट, किती गाणी आणि किती उदाहरणे हवी ?

प्रभात च्या ‘हम एक हैं’ पासून देव आनंद ची चित्रपटची कारकीर्द सुरु झाली. मग जिद्दी नंतर त्याने स्वतःचे नवकेतन production ची स्थापना केली व चित्रपट चालोत ना चालोत शेवटच्या श्वासा पर्यंत चालवले. बरे वाईट चित्रपट देत राहिला. ‘नौ दो ग्यारह’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय आनंद या प्रतिभावान धाकट्या भावा वर सोपवली. आणि पुढची १०-१५ वर्षे हे दोघे एकाहून एक संगीतमय हीट चित्रपट देत राहिले. तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, तेरे मेरे सपने आणि देव आनंद ला कारकीर्दीच्या शिखरावर नेणारा जॉनी मेरा नाम (गुलशन राय चा). देव आनंद च्या यशात आणि त्याला घडवण्यात विजय आनंद चा फार मोठा वाटा आहे.

देव आनंद च्या चित्रपटातील गाणी लक्षात राहतात ती नुसत्या चाली मुळे नाही तर विजय आनंद ने त्या गाण्याचे जे चित्रीकरण केले आहे, त्या खास विजय आनंद style मुळे. जॉनीच्या यशानंतर देव आनंद ने मागे वळून बघितले नाही व पुढले दशकभर तो राजेश-अमिताभ युगातहि राज्य करत होता. त्याचे स्वतःचे राज्य होते, स्वतःचा प्रेक्षकवर्ग होता, जो फक्त देव आनंदला बघायला यायचा. ६९ साली जॉनी मेरा नाम मराठा मंदिर ला रिलीज झाला, त्याच शुक्रवारी अप्सरा ला दिलीप कुमार चा गोपी आणि नॉव्हेल्टीला राज कपूर चा मेरा नाम जोकर लागला. जोकर साफ आपटला आणि राज कपूर कर्जात बुडाला. गोपी मध्ये दिलीप कुमार वयस्क झाल्याच्या खुणा दिसताच प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली. आणि जॉनी साठी मात्र लोकांच्या रांगा लागल्या. त्यानंतर रौप्य महोत्सव करूनच जॉनी मराठा मंदिर वरून खाली उतरला.

जॉनी नन्तर जोशीला, अमीर गरीब, बनारसी बाबू, शरीफ बदमाश असे त्याचे अनेक चित्रपट आले जॉनी नंतर आलेली प्रकाश मेहराची जंजीरची ऑफर केवळ त्यात हिरोला गाणी नाहीत म्हणून नाकारली (आणि आपल्या सुदैवाने आपल्याला अमिताभ गावला) देवानंदने जर जंजीर स्वीकारला असता तर विचार करा अमिताभ चा “ये पोलीस स्टेशन हैं तुम्हारे बाप का घर नही”, हा संवाद देव आनंद च्या style ने ऐकावा लागला असता !!
पण त्याच काळात विजय आनंद ने अभिनय करायचा मनावर घेतले आणि देव आनंद ने दिग्दर्शक होण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शक देव आनंदची पहिली निर्मिती प्रेमपुजारी बघून लोकांनी शालीमार theatre च्या सीट्स फाडल्या पण याच्यावर परिणाम झाला नाही. पुढच्या निर्मितीला हात घातला. तरुणाईला आकर्षक ठरेल असं विषय घेतला. झीनत अमान ला शोधून काढले. SD कडून RD कडे संगीताची सूत्रे गेली आणि चित्रपट निर्माण झाला “हरे राम हरे कृष्णा ” दम मारो दम ने सारा भारत डोलत होता आणि देवानंद? तो केव्हाच पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागला होता.

भूतकाळाकडे मागे वळून पाहायचे नाही, वर्तमानात जगायचे व भविष्याचा विचार करायचा हीच त्याची ‘सोच’ होती. त्यामुळे देवानंद nostalgic वगैरे होण्याच्या भानगडीत पडायचा नाही. हा पण कधीतरी एकाच बाबतीत हळवा व्हायचा ती सुरैया ची आठवण आल्यावर. दोघांचे प्रेम तसे जगजाहीर. पण केवळ धर्माच्या लक्ष्मणरेषा ओलांडू शकले नाहीत. सुरैयाची आजी आड आली व देव आनंद ने हम हैं राही प्यारके म्हणत कालापानी च्या सेट वर कल्पना कार्तिकशी लग्न केले.पण सुरैयाच्या वाढदिवसाला न चुकता तिच्या चर्चगेट च्या निवासस्थानी देव आनंद कडून फुलांचा गुच्छ दरवर्षी जायचा.
असा देव आनंद “मै जिंदगी का साथ निभाता चला गया” असे म्हणत “हर फिकरको धुएमे उडता चला गया” करत जगला. शेवटपर्यंत “गाता रहे मेरा दिल” हीच त्याची इच्छा होती. म्हणूनच “आसमान के नीचे दिल का भंवर करे पुकार” करत प्रत्येक सिनेमात “प्यार का राग” आळवत राहिला. आम्हाला असाच देव आनंद हवा होता जो “पलभरके लिये कोई हमे प्यार कर दे” म्हणत या खिडकीतून त्या खिडकीत हेमाला सतावत होता. “जिया हो जिया कुछ बोल दो म्हणत” आशाला रेल्वे गाडीतून खुणावून विचारत होता. “कांची रे कांची” म्हणून मुमुशी लगट करीत होता. “जैसा देश वैसा वेश” म्हणत मुलीच्या वयाच्या टीना ला हात धरून समजावत होता.. “आज फिर जिने की तमन्ना हैं” म्हणाऱ्या वहिदा ला “तेरे मेरे सपने एक रंग हैं” म्हणून आश्वासन देत होता.

आम्हाला असाच देव आनंद हवा होता. प्रत्येक वर्षी २६ सप्टेंबर ला येणाऱ्या वाढदिवसातून तो फक्त वयाने वाढत होता पण आपले चिरतारुण्य जपत होता. सदाबहार हा शब्द त्याच्याच साठी जन्माला आला होता. देस परदेस नंतर गेले २५-३० वर्षे यश त्याला हुलकावणी देत होते. हरे राम हरे कृष्ण आणि देस परदेस हे चित्रपट वगळता दिग्दर्शक म्हणून अपयशच पदरी पडत होतं. शरीफ बदमाश, स्वामीदादा, अव्वल नंबर, लूटमार, सेन्सॉर, सच्चे का बोलबाला, आनंद और आनंद ते शेवटच्या चार्जशीट पर्यंत एकाहून एक चित्रपट पडत होते पण हा खचून जात नव्हता. पुन्हा नव्या उमेदीने, नव्या आशेने नवीन चित्रपट निर्माण करत होता. माझा एक चित्रपट हीट जाऊन दे माझ्या दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीची सर्व समीकरणे बदलतील. हा त्याचा विश्वास होता. केवळ त्याच्या या दुर्दम्य अशावादासाठी तरी त्याचा एखादा चित्रपट हीट व्हावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण शेवटी “अभी ना जो छोडकर के दिल अभी भरा नाही” असे चाहते म्हणत असतानाच फिल्म इंडस्ट्री च्या चालत्या बोलत्या गाईड ने या जगाचा निरोप घेतला.त्याला जाऊनही एक तपाहून अधिक काळ लोटला आहे. पण अजूनही त्याच्या चित्रपटातील गाणी कानावर पडली की देव आठवतोच.त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो. त्याच्या लकबी आठवतात.सदाबहार या शब्दाचा अर्थ फक्त त्यांच्याबाबतीत खरा ठरतो.

आज त्याचा बंगला पाडून 400 कोटीला विकला जातोय. काही वर्षातच तिथे नवीन उंच इमारतही उभी राहील .पण देव आनंद या माणसाने ज्या कोटी भारतीयांच्या हृदयात जे अढळ स्थान मिळवले आहे त्याची किंमत अमूल्य आहे. यापुढेही जेव्हा जेव्हा रेडिओ वर, टीव्ही वर, सोशल मीडियावर देव आनंद ची गाणी ऐकली जातील,बघितली जातील, डिकशनरी मधे एव्हरग्रीन या शब्दाचा अर्थ शोधला जाईल तेव्हा देव आनंद चा एकमेव चेहरा डोळ्यासमोर तरळेल याबद्दल शंका नाही.

प्रशांत कुलकर्णी

— लेखन : प्रशांत कुलकर्णी. अबुधाबी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. सदाबहार देवानंद यांच्या सीनेकर्तुत्वाचा नेटका आढावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments