प्रसिध्द लेखक श्री विश्वास पाटील यांची ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’ ही तमाशा प्रधान ३०० पानांची कादंबरी तीन दिवसात वाचून काढली. कादंबरी अतिशय आवडली.
तमाशा फडाला मिळणारीं पसंती, गौरव व पुरस्काराबरोबरच वाद विवाद, द्वेष, मत्सर, आजारपण, इत्यादी येणाऱ्या विविध अडचणी, संघर्ष, यांचे दर्शन या कादंबरीतून प्रकर्षाने येते. यात काही गाजलेल्या पारंपारिक पद्यरचना तर आहेच शिवाय लेखकाच्या स्वयंरचित रचनाहि आहेत. त्यामुळे २०२० च्या एप्रिलमध्ये प्रकाशित झालेली ही सर्वांग सुंदर अप्रतिम कादंबरी थोडी उशिरात हाती आली, याची रुखरुख वाटली.
अलीकडे एकाच वेळी संगीत,नाट्य, अभिनय आणि साहित्य असे चौरंगी दर्शन घडविणारी वगनाट्ये फारसी दिसून येत नाही. पूर्वी लावण्यांचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या पठ्ठे बापूराव यांच्या गणापासून सुरुवात होणारी लोकरंजनाची आणि खेड्या गावाच्या जत्रेतून अख्खी रात्र गाजवून सोडणारी तमाशाप्रधान लोकनाट्ये ग्रामीण जनतेत अतिशय लोकप्रिय झाली होती.
तंबू- कनातीवर पडलेल्या चांदण्यापेक्षाही आतले फडातले चांदणे लाजवाब असायचे. आभाळाच्या कडेवर चंद्र चढावा तशी उत्तररात्र अतिशय रंगत जायची. मराठी लोकसंगीताचा गौरव ठरणाऱ्या या परंपरेचे दर्शन विश्वास पाटील यांना झाले. त्यातूनच या कादंबरीचा जन्म झाला.
तसे ‘पानिपत’, ‘झाडाझडती” ‘संभाजी’ ‘महानायक’ ‘नागकेशर’ अशा महान कादंबऱ्या लिहिणारे विश्वासजी यांची ‘गाभुळलेल्या चंद्रबनात’ या फिरत्या चाकावरील रंगफडात फुललेली बेमिसाल प्रेमकहाणी तितक्याच तोलामोलाची आहे.
विश्वासजींच्या कादंबर्यांची अनेक भारतीय भाषेत भाषांतरे होऊन त्या लोकप्रिय झाल्या आहेत. ‘पानिपत’, ‘महानायक’ या कादंबऱ्यांची तर इंग्रजीतील नामवंत प्रकाशन कंपन्यांनी भाषांतरे प्रकाशित केली आहेत.
या कादंबरीत बाकेराव बागणीकर आणि गगनराव कवठेकर यांच्या तमाशाची अपूर्व अशी कथा आहे. रंगकली ही कादंबरीची नायिका. तिचा या फडात समावेश झाल्यानंतर तमाशा फारच रंगु लागला. एकापेक्षा एक चढीचे कलाकार एकत्र आल्याने महाराष्ट्रातील खेड्यात, जत्रेत हा तमाशा प्रचंड लोकप्रिय झाला.
गणगौळीनंतर रंगणारी रंगबाजी, बाकेराव सारखा चतुरस्त्र हजरजबाबी नायक. त्याच्या तोडीस तोड देणारी रंगकली फारच बहार उडवून द्यायची. ती स्वतःचंच नवं आभाळ निर्माण करणारी शापित अप्सरा आणि बाकेराव सारखा नवकोट मोत्यांचा तुरा असलेला कलावंत यांची प्रेमकहाणी या कादंबरीत आहे.
📗या कादंबरीत कधी स्वस्थ करणारे, कधी अस्वस्थ करणारे, कधी सुखावणारे तर कधी खूप दुखावणाऱ्या प्रसंगाचे भावशिल्प विश्वासजींनी फार चांगल्याप्रकारे कथित केले आहे. त्यामुळे कादंबरीचे साहित्यिक रूप बावनकशी झाले आहे….📘
संपूर्ण कहाणी सागून आपले औत्सुक्य मी घालवणार नाही ती आपण पूर्णपणे वाचलेलीच बरी !
थोडक्यात या तमाशाप्रधान कादंबरीचा आस्वाद आपणही घ्यावा…

– लेखन: सुधाकर तोरणे, निवृत्त माहिती संचालक
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800