Sunday, September 8, 2024
Homeयशकथागावडे मॅडम, शतायुषी व्हा !

गावडे मॅडम, शतायुषी व्हा !

भारत सरकारच्या मुंबई दूरदर्शन केंद्रात १ मार्च १९८६ ते २१ ऑक्टोबर १९९१ अशी जवळपास ६ वर्षे सेवा करून मी २२ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात जिल्हा माहिती अधिकारी, वर्ग १ म्हणून अलिबाग येथे रुजू झालो. तिथून पुढे २६ वर्षे माझी सेवा महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालक, उपसंचालक, संचालक म्हणून झाली. थोडक्यात सांगायचे तर एकूण २६ वर्षांपैकी, अर्धी अधिक म्हणजे जवळपास १३ वर्षे माझी सेवा मंत्रालयात झाली.

या सेवकाळात लक्षात राहिलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक प्रमुख अधिकारी म्हणजे श्रीमती वीणा गावडे उर्फ गावडे मॅडम होय. आपल्या वयाचा आज अमृतमहोत्सव साजरा करीत असलेल्या गावडे मॅडमना आयुष्याचे शतक झळकविण्याची संधी मिळो आणि त्यांचे सतत मार्गदर्शन लाभत राहो, यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.

खरं म्हणजे, आज प्रसार माध्यमात मुली, महिला मोठ्या संख्येने दिसत आहेत आणि अर्थातच ही स्वागतार्ह बाब आहे.परंतु गावडे मॅडम ज्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या अधिपरिक्षक, पुस्तके व प्रकाशने या कार्यालयात अनुवादक म्हणून रुजू झाल्या, त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. कालांतराने त्यांची सेवा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे, मंत्रालयात वर्ग करण्यात आली.

गावडे मॅडम

गावडे मॅडम यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मराठी, हिंदी आणि विशेष म्हणजे इंग्रजी भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांनी महासंचालनालयात काही काळ लोकराज्य इंग्रजी आणि हिंदी महाराष्ट्र मानस या मासिकांसाठी उपसंपादक म्हणून काम केले.

पण गावडे मॅडम यांची खरी ओळख निर्माण झाली आणि कायम राहिली ती म्हणजे विभागीय संपर्क अधिकारी, वर्ग १ म्हणून. अनेक प्रमुख विभागांचे मंत्री, राज्यमंत्री, सचिव तसेच मुख्य सचिवांचे विभागीय संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. एकाच वेळी मंत्री कार्यालय, संबंधित खात्यांचे सचिव, अधिकारी, स्वतःच्या विभागाचे अधिकारी, सहकारी आणि माहिती खात्यातील लोकांचा ज्यांच्याशी सतत संबंध येतो, त्या प्रसार माध्यमातील व्यक्ती अशा सर्वांचाच विश्वास संपादन केला होता. पत्रकारांसाठी त्यांचा कक्ष म्हणजे चांगल्या बातम्यांचा सोर्स, उठण्याबसण्याचे हक्काचे ठिकाण असे. शासनाची एखादी महत्त्वाची बातमी, निर्णय, योजना प्रसिद्ध करावयाची असल्यास गावडे मॅडम तसे पत्रकारांना हक्काने सांगत असत आणि पत्रकारही त्यांचे ऐकत असत.

श्री योगेश त्रिवेदी

या बाबतीत बोलताना दैनिक सामना चे अनेक वर्षे मंत्रालय प्रतिनिधी राहिलेले श्री योगेश त्रिवेदी उर्फ गुरुजी म्हणतात,
माझे मंत्रालय आणि विधिमंडळ हे कार्यक्षेत्र असल्याने मंत्रालयात रोज फिरणे हे आलेच. पण म्हणून केवळ पत्रकार कक्षात ‘फेव्हिकोल’ लावल्याप्रमाणे बसून राहिलो तर हाती काहीही लागणार नाही, याची खूणगाठ मनाशी बांधून पायाला भिंगरी लावल्यागत मंत्रालयाचे सर्व मजले पायाखाली घातले. या काळात माहिती व जनसंपर्क विभागात डीएलओ नावाच्या म्हणजे विभागीय संपर्क अधिकारी यांच्या विभागात न चुकता चक्कर मारणे हा एक रोजचा परिपाठ झालेला. याच पैकी एक म्हणजे विभागीय संपर्क अधिकारी वीणा गावडे मॅडम अर्थात आमची आक्का.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर जबरदस्त पकड असलेली आमची आक्का म्हणजे माहिती खात्यामधले आमचे हक्काचे ठिकाण. मी अंबरनाथ हून मंत्रालयात येत असल्याने लवकर यायचे आणि मंत्रालयातून प्रभादेवी सामना मार्गे पुन्हा अंबरनाथ असा रोजचा दिनक्रम. मग तिथे आक्का बरोबरच सुभाष खंडेलवाल, प्रभाकर शांडिल्य, बापू मायदेव, म. ना. राणे, सुधाकर तोरणे, देवेंद्र भुजबळ, निरंजन राऊत, अरुणकुमार नवाडे, निलीमा पिटके, वर्षा शेडगे, महाजन बाई, शोभा पौडवाल, जयंत करंजवकर, वसंत पिटके, दत्ता कुळकर्णी, सुभाष सूर्यवंशी, श्रीपाद नांदेडकर, सतीश पंडित, मुक्ताबाई पवार, ज्योतीबेन लायजावाला, चंद्रिकाबेन नाणावटी, जेठालाल शाह, मुरलीधर बंदसोडे, भीमराव इंगळे, रंगनाथ चोरमुले, होराभूषण पुरुषोत्तम शुक्ल, सतीश लळीत, अनिरुद्ध अष्टपुत्रे, सदाशिव कांबळे, हेमंत खैरे अशी असंख्य अधिकारी मंडळी आमच्या वर्तुळात पत्रकारांबरोबर वावरत होती. पण आक्काची धावपळ काही विचारु नका.

मायेच्या ममतेने वावरतांना आक्काचा कधी कठोर तर कधी वात्सल्याचा झरा, करुणेचा सागर अनुभवायला मिळत असे. आपल्या कामावरची निष्ठा, काम करण्याची पद्धत, मेहनत आणि ज्यांच्यासाठी काम करायचे त्यांच्यासाठी झोकून देऊन काम करण्याची जिद्द ही आक्का च्या ठायी पहायला मिळाली. असंख्य मंत्री, अगदी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, मुख्यसचिव यांच्या भूमिका वर्तमानपत्रात छापून येण्यासाठी आक्काने घेतलेले परिश्रम आणि त्यासाठी जिद्दीने काम करुन एखाद्या घोरपडीसारखी चिकाटी मी स्वतः अनुभवली आहे. विशेष म्हणजे आक्का सेवानिवृत्त झाल्यावरही आपलेपणाने संबंध टिकवून ठेवले आहेत.”

गावडे मॅडमनी एक सोडून तीन मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ही समर्थपणे जबाबदारी पार पाडली आहे.
वेळप्रसंगी उपसंचालक (वृत्त) या पदाचा अतिरिक्त कार्यभारही समर्थपणे सांभाळला.

गावडे मॅडम ना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेकदा शासन स्तरावर गौरविण्यात आले आहे. तसेच अनेक पत्रकार संघटनांनीही त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला आहे.

अशा या दैनंदिन जीवनात, कामकाजात सतत हसतमुख, कार्यक्षम राहिलेल्या गावडे मॅडम यांना वैयक्तिक जीवनात मात्र अनेक संकटांचा सामना करावा लागला. ऐन तरुण वयात त्यांच्या पतीचे निधन झाले. पोटी दोन लहान मुले. अशा परिस्थितीत काळ वेळ, शनिवार, रविवार, सणवार न पाहता काम करावी लागणारी त्यांची माहिती खात्यातील नोकरी होती.
कित्येकदा ऐनवेळी येणाऱ्या कामामुळे त्यांना वेळेत घरी निघता येत नसे. घरची ही दोन चिल्ली बिल्ली आईची आतुरतेने वाट पहात असे. त्यावेळी गावडे मॅडम यांच्या जीवाची होणारी घालमेल आम्ही बघितली आहे. अशा परिस्थितीतही त्या काम अर्धवट सोडून कधी गेल्या नाहीत. आजही आपण बघतो, काही महिला एकीकडे स्त्री पुरुषांच्या समानतेच्या गप्पा मारतात पण वेळ प्रसंगी त्या स्त्री असल्याचे भांडवल ही करतात. पण गावडे मॅडमनी असे कधी काही केले नाही.

अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळत गावडे मॅडमनी दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केले. एक मुलगा एमबीबीएस डॉक्टर झाला तर दुसरा मुलगा इंजिनियर झाला. दोघेही आता सुस्थापित आहेत.दोघांचेही विवाह झाले असून गावडे मॅडम आता आजीची भूमिकाही आनंदाने पार पाडत आहेत.

गावडे मॅडम यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. भुजबळ सर, अतिशय उत्तम लेख लिहून एका प्रेरणादायक व्यक्तिमत्त्वाचा सुंदर परिचय करून दिला आहेत. गावडे मॅडम ह्यांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांना ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  2. खुप छान माहिती लेखातून वाचताआली, सुरेख लेखन आहे, गावडे मैडम ना अनेक शुभेच्छा

  3. त्यांची कारकीर्द जवळून पाहता आली. त्यांची कामांची लगबग मीही अनुभवली आहे. मंत्रालयातील तो सगळा काळच डोळ्यासमोर उभा राहतो.

  4. त्यांच्या कारकीर्दीत मीही त्यांच्या कामाची लगबग, कामाप्रती झोकून देणे अनुभवले आहे. तो काळच जवळ जवळ डोळ्यासमोर उभा राहतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments