सा क व्य व्हॉट्सॲप समूहाच्या दुसऱ्या परदेशस्थ मराठी ऑनलाईन कवी संमेलनात कवयत्री तनुजा प्रधान यांच्या कवितेचे “कुटुंब रंगलंय काव्यात” फेम प्रा विसुभाऊ बापट यांनी केलेले रसग्रहण…
जुन्या काळात सुविधा कमी होत्या, प्रवासाला जायचं तर एस्.टी घ्या गाडीला पर्याय नव्हता. बरं… त्या गाड्याही खूपच कमी असायच्या. पण सुट्टीच्या काळात मामाच्या गावाला जायचं अगदी ठरलेलं असायचं.! प्रवासाला जातांनाची तयारीही जोरदार असायची.! तहान लाडू,भूक लाडू बरोबर बांधून घेतलेले असायचे. चणे, फुटाणे, खडीसाखर, लिम्लेटच्या गोळ्या, सगळी तयारी अगदी जय्यत असायची.
हसत-खेळत, गाण्याच्या भेंड्या लावत तर कधी आईच्या मांडीवर डुलक्या घेत प्रवास सुरू असायचा. गाव जवळ येईल तशी घराची ओढ लागायची, आणि झाडांच्या….घरांच्या ठराविक खुणा दिसायला लागल्या की ती घराची ओढ अधिकच तीव्र व्हायची. पण आता सगळेच बदलले आहे.
एस्.टी ची जागा आता एसी गाडीने घेतली आहे. तहान, भूकेची सोय सध्या मॉलवरच होते. खुणांच्या घरांची जागा आता इमारतींनी घेतली आहे, खुणांची झाडे तोडली गेली आहेत. जुन्या काळातील सगळीच मजा आजच्या काळात नाहीशी झाल्याने आता फक्त जुन्या काळातील आठवणींची शिदोरी सोबत घेऊन प्रवास करणेच क्रमप्राप्त आहे.
हे सर्व आपल्या सहज-सोप्या शब्दांत अमेरिकेत रहात असलेल्या तनुजा प्रधान यांनी त्यांच्या “गावाकडे निघताना” या कवितेत सांगितले आहे.

– रसग्रहण : प्रा.विसुभाऊ बापट. मुंबई.
आता प्रत्यक्ष कवितेचा आस्वाद घेऊ या
गावाकडे निघताना…
आज गावाकडे निघताना
क्षणभर पाय अडखळला
सोबत शिदोरी आठवणींची
घेऊन जाऊ म्हणाला (१)
पूर्वी गावाला लाल डब्याच्या
एस्. टी. तून जायचो
वाटेत चणे-फुटाणे-खडीसाखर
अन् लिम्लेटच्या गोळ्या खात जायचो (२)
जेवायला सोबत आईने केलेली
तूप-चटणी-पोळीची सुरळी असायची
अन् परत भूक लागली तर सोबत असलेली
ग्लुकोज-मारीची बिस्किटे खायची (३)
तहान लागली तर पाणी प्यायला शाळेची
पाण्याची बाटली असायची सोबत
नाही म्हणायला काचेच्या बाटलीत असायचे
घरून आणलेले लिंबाचे सरबत (४)
गाणी म्हणत, हसत खेळत,
आईच्या मांडीवर खुशाल झोपत
लाल डब्यातला प्रवास संपायचा
खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत (५)
गाव जवळ येताच
गावाबाहेरची घरे दिसत
ओळखीची खूण पटली की
घराचे अजूनच वेध लागत (६)
आताशा लाल डब्याच्या
एस्. टी. ने जाणे दूरच राहिले
एसी गाडीतून प्रवास करणेच
आताचे जीवन झाले (७)
नाहीत आता लिम्लेटच्या गोळ्या
नाहीत आता तूप-चटणीच्या सुरळ्या
भूक लागली तर वाटेत फूड मॉल
नाहीतर हॉटेल किंवा ढाब्यात जातो खायला (८)
गावाकडे जाताना गावाबाहेरील घरांच्या
खुणाही आता नाहीशा झाल्या
रस्त्यावरच्या झाडांच्या जागा
छोट्या मोठ्या घरांनी घेतल्या (९)
बदलेल्या ह्या गोष्टींनी
आज मनात काहूर माजलंय
कारण परत आज गावाला जायला
मनातलं कोंबडं आरवलंय (१०)
गावाकडे आज निघताना
सोबत घेतलीये शिदोरी आठवणींची
ओळखीच्या खुणा शोधणारी बेडी
अडखळलिये मनावरची (११)
– रचना : तनुजा प्रधान. अमेरिका 💙🌷🌿
कवयत्री प्रत्यक्ष कविता सादर करताना पाहू या….
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800
हूरहूर लावणारी सुंदर कविता जून्याआठवनीत घेवुन गेली 👌👌👌👌
धन्यवाद।
खूप खूप धन्यवाद आशा ताई!🙏💐🙏