पहाटे तीन वाजता उठून, सर्व आवरून, रूमला कुलूप लावून आम्ही बाहेर पडलो…
पुढे नरेश त्यामागे आबा, आबा म्हणजे आर. आर. पाटील, माजी उपमुख्यमंत्री नव्हे हो… ते वेगळे ! हे आबाही त्यांच्याच गावचे, त्यापाठोपाठ डाकी साहेब ! ‘डाकू’ या नावाशी साधर्म्य असूनही, हा माणूस अतिशय सज्जन, मनमिळावू आणि प्रेमळ अर्थात हे लगेचच कळले !
त्यापाठोपाठ अस्मादिक आणि आमचे पाठी ग्रुप लीडर… अशोकजी सावंत साहेब !
प्रचंड दमदार आणि मनमिळावू वृत्तीचे व्यक्तिमत्व..!
श्री भवनाथ महादेवाचे दर्शन घेऊन परिक्रमा सुरू करण्याची प्रथा आहे, त्याप्रमाणे भगवान शंभू महादेवाचे दर्शन घेऊन चालण्यास सुरुवात केली…
पहाटे चार वाजता आम्ही सगळे मुख्य प्रवेशद्वारी पोहोचलो. रस्त्यावर अंधार म्हणण्यापेक्षा काऽऽऽळोखच होता…! मागून एक बॅटरी, पुढून एक बॅटरी… त्याच्या उजेडात मार्गक्रमण सुरू झाले…
पहिल्या १५ मिनिटांतच परिक्रमा म्हणजे काय ? ते कळाले !
आयुष्यात पहिलीच परिक्रमा आमची ! उत्साहाच्या भरात… होईल, करू या, करणारच, करायचीच, या जोषात आम्ही…!
अंधारात चालताना एके ठिकाणी पाणी होते, बूट आणि सॉक्स न काढता आम्ही ते ओलांडले अर्थात त्याचे परिणाम नंतर भोगले…
पाणी ओलांडताना सिंहगर्जना ऐकू आली आणि पिवळी फुलपॅन्ट घालण्याची बुद्धी झाल्यामुळे मी देवाचे आभार मानले ! माझी लाज राखली म्हणून…
तिथेच अंधारात गवतावर चार-पाच मुले बसली होती. बाजूने चालणाऱ्या माणसाने मला सांगितले, “काका, ईकडे सिंह पण आहे ! जरा भरभर पाय उचला… “आम्ही अगोदरच भरभर चालत होतो, जरा वेग वाढवला दुसरे काय करणार…
थोडसं पुढ जाऊस्तवर ती मुले धावत पळत आमच्यापाशी आली आणि सांगू लागली, “हमने शेरको देखा। व्हिडीओ और फोटोभी निकाला। बहुत नजदीक था हमारे, कुछ नही किया हमको…” इ… इ… पण सगळे खूष होते !
आता जरा अंधुकसा सुर्यप्रकाश पसरायला होता आणि त्याच बरोबर हेही जाणवत होते की आपण घामाघूम झालो आहोत…
सुरक्षित अंतरावर विश्रांती घेतली पण पुढचा डोंगर बघून छातीच दडपली…
भयंकर उंच होता तो आणि सगळे दगड-गोटे ! मला आठवले की लहानपणी घरातले सगळे “तू दगड आहेस !” असं म्हणायचे, पण मी असा दगड नव्हतो हे मला आता कळले. ह्याच गोट्यांतून पायवाट शोधीत चालणे. यांवर जरा पाय चुकला की माझा दगड फुटणार हे नक्की होते. परंतु अशोक सावंत आणि डाकी साहेब यांच्यामुळे चढणे आणि उतरणे सोपे झाले…
उतार संपल्यावर जरा विश्रांती घेतली. पाणी पिण्यासाठी एका दगडावर बसायला गेलो आणि अंदाज चुकला…
चक्क तोल गेला आणि समोरच्या दगडावर आपटलो आणि मग बसलो. तोपर्यंत दगडाने त्याचे काम केले, माझ्या गुडघ्याला आणि नडगीला मार बसला…
कळवळून ओरडलो, “आई ग !” लगेच भालदार चोपदार बाजूला उभे ! पॅन्ट वर करून बघितले तर चांगलंच खरचटलं होतं. चुना हातावर घेतला आणि त्यावर थापला, रक्त थांबलं…
उठलो. काहीच झालं नाही असं समजून चालायला सुरुवात केली…
अकरा वाजेपर्यंत जवळपास एक तृतीयांश अंतर पार झाले होते !
३६ किलोमिटरच्या या परिक्रमेमध्ये तीन ते चार ठिकाणी चहा, नाष्टा, जेवण, पिण्याचे पाणी उपलब्ध असते, तेही विनामूल्य…!
केवळ सेवा. प्रत्येकाला प्रेमाने आवर्जून सांगितले जात होते, “आईये, चाय नाष्टा कीजिए ! खाना खाईए, प्रशाद लिजीए !” इ. इ…
त्यामुळे तेथे छान उदरभरण केले, फोटोग्राफी केली, विश्रांती घेतली आणी पुढे निघालो…
॥अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
👨🏼🦯👨🏼🦯👨🏼🦯👨🏼🦯👨🏼🦯
भाग ३ अ समाप्त !
पुढील भाग ३ ब लवकरच…
…क्रमशः

– लेखन : गंधेकाका.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800