Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीगुढीपाडवा : मोठा गोडवा

गुढीपाडवा : मोठा गोडवा

भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात. भारतातील प्रत्येक सणाचे आपले धार्मिक महत्व, पावित्र्य आणि इतिहास आहे. आणि अशाच काही सणांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा.

भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढीपाडवा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाढवा हा चैत्र महिन्याची आणि हिंदू नववर्षाची सुरुवात करतो. महाराष्ट्रामध्ये घराबाहेर दारासमोर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र महिना भारतीय सौर पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे आणि ह्या महिन्याची सुरुवात चैत्र प्रतिपदेने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये उगादी, चेटी चांद अशा वेगवेगळ्या नावानी आणि पद्धतींनी साजरा केला जातो.

इतिहास :-
गुढीपाडवा हा हिंदू सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. गुढीपाडव्याचा इतिहास हा वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथांवरून माहिती करून घेतला जाऊ शकतो.

एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हाने ह्या सृष्टीची निर्मिती केली होती.

दुसऱ्या, एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम चौदा वर्षे वनवास भोगून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या, तोरणे उभारून रामचे स्वागत केले होते.

गुढीपाडव्याचा अजून एक इतिहास असा कि, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांना पराभूत करण्यासाठी ६ हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले. त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण करून त्यांच्या साहाय्याने शकांचा प्रभाव केला. आणि ह्याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना ज्याला शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते त्याची सुरुवात करण्यात आली. गुढीपाडव्याचा इतिहास हा समृद्ध आणि पवित्र मानला जातो.

असा करतात साजरा
चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ हि गुढी उभारली जाते. गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते.

गुढीपाडवाच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते. त्यामागे शास्त्रीय महत्व आहे. कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठी हि चांगली असतात. चैत्र महिन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरु होतो. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी हि पावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते.
आजकाल गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून लोक पारंपरिक पेहराव करून एकत्र जमतात, एकमेकांना शुभेच्छा देतात.

आध्यात्मिक, नैसर्गिक, सामाजिक महत्व

आध्यात्मिक महत्व
गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि कळक(बांबू) हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो. नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते. असे मानले जाते कि जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. त्यामुळे गुढीपाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे. राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले. आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असे मानले जाते.

नैसर्गिक महत्व
चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. जी मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायी आहेत. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. कडुलिंब पित्ताचा नाश करते आणि त्वचेसाठीही अतिशय लाभदायक असते. गुढीपाडव्याच्या दरम्यान हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. झाडांची पाने हि शिशिर ऋतूमध्ये गळून गेली असतात तर गुढीपाडव्याच्या सुमारास झाडांना नवीन पालवी फुटत असते. सभोवतालची झाडे वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

सामाजिक महत्व
गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस मानला जातो. ह्यावेळी हाती घेतलेले काम यशस्वी होते असे मानले जाते.गुढीपाडव्याच्या दिवशी लोक आपल्या पारंपरिक पोषाखामध्ये एकत्र समजतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. ज्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.गुढीपाडव्याच्या दिवशी पाण्याच्या घड्याचे दान देणे शुभ मानले जाते. ह्यातून असे सूचित होते कि गुढीपाडव्याचा दिवशी लोकांची मदत आणि दानधर्म करणे शुभ असते.

तर करू या संकल्प,
नव्या वर्षाचा, नवा समाज उभारण्याचा ..

अनंत जाधव

– लेखन : अनंत जाधव.
विद्यार्थी, संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४