१. गुढीपाडवा
चैत्रपालवी हिरवी खुलली,
वसंतरूतू बहरला,
थंडगार, सुगंधी वारा घेऊन,
गुढीपाडवा आला,
लगबग झाली घराघरातून,
सडे टाकले अन रांगोळ्या,
नवे वस्त्र लेवूनी हर्षभराने,
गुढीपाडवा आला,
सारे जमले आपुलकीने,
आनंद बहर दाटला,
गोडधोड विविध पक्वान्ने केली,
गुढीपाडवा आला,
वेग वेगळी फुले ही फुलली,
सुगंध दरवळे, धराही सजली,
वृक्ष बहरले, वेली सजल्या,
गुढीपाडवा आला,
हर्षभरीत त्या नवयौवना,
सजूनधजून बसल्या,
चैत्रकोकीळ गातो गाणे,
गुढीपाडवा आला..!!!
रचना : हेमंत भिडे. जळगांव
२. नव वर्षाचे स्वागत
जूनी गळाली पालवी
बघा शिशिर संपला
नुतन धुमांरसवे
गाली वसंत हासला ||
गीत स्वागत म्हणन्या
असे कोकिळ सादर
ऋतु बघा कसे हे ..
एकमेकास देती आदर ||
आम़वृक्ष मोहरला
शुभ्र चांदण्यांची शाल
पांघरून मोगरा नटला
चाफ्याने हा फेर धरला
कढीलिंब बहारिला ||
पाना फुलांनी मांडव सजला
वसुंधरेचा हा लग्न सोहळा
नवचैत्यन सृष्टीचे या चला पाहूया
आनंदाने गुढ्या उभारुया
नर्वषाचे स्वागत करुया ||
रचना : आशा दळवी, दुधेबावी, सातारा
३. गुढी उभारू
गुढी स्वप्नांची
गुढी आकांक्षाची
गुढी ध्येयाची
गुढी क्षितिजाची ॥१॥
गुढी मांगल्याची
गुढी तेजाची
गुढी सामर्थ्याची
गुढी चैतन्याची ॥२॥
गुढी सजृनाची
गुढी नव शृंगाराची
गुढी वीरत्वाची
गुढी शौर्याची ॥३॥
गुढी प्रेरणेची
गुढी जिद्दीची
गुढी आत्मविश्वासाची
गुढी स्वाभिमानाची ॥४॥
गुढी अस्मितेची
गुढी सन्मानाची
गुढी सौभाग्याची
गुढी सौजन्याची ॥५॥
गुढी कल्पकतेची
गुढी संवेदनेची
गुढी संयमाची
गुढी सहनशिलतेची ॥६॥
गुढी ऊर्जेची
गुढी ताकतीची
गुढी सर्हदयाची
गुढी मना मनाची ॥७॥
गुढी नव दिशांची
गुढी नव विचारांची
गुढी वैराग्याची
गुढी सात्विकतेची ॥८॥
गुढी नवलाईची
गुढी क्षमाची
गुढी नम्रतेची
गुढी आत्मरक्षेची ॥९॥
गुढी धिरोदत्त योध्याची
गुढी रण रागिनीची
गुढी हिंदवी तेज स्वराजाची
गुढी हिंदु संस्कार संस्कृतीची ॥१०॥
रचना : पंकज काटकर. काटी, जि. धाराशिव
४. नवे वर्ष
उत्साहासवे हूरहूर लागे
निरोप घेई गतवर्ष
आले नवे नवे वर्ष
पुराणातील पराक्रमांची
इतिहासातील शौर्य कथांची
वर्तमानातील कर्तृत्वाची
गुढी उभारू सहर्ष
आले नवे नवे वर्ष
देवा मागणे तुजशी न अन्य
काळ्या मातीत पिकू दे धन्य
कर्ज फिटता भूमिपुत्रांचे
संपेल मग नैराश्य
आले नवे नवे वर्ष
सर्व समाजातील समतेची
निरक्षरांच्या साक्षरतेची
दुर्बलांच्या सहाय्यतेची
गुढी उभारू सहर्ष
आले नवे नवे वर्ष
पगार घेई कुणी लाखामध्ये
प्रमाणपत्र कुणी घेऊन हिंडे
दरी वाढता दोघांमधली
काय उद्याचं भविष्य
आले नवे नवे वर्ष
ज्ञानदीपच्या प्रकाशाची,
विज्ञानाच्या उत्तुंगतेची
कला क्रीडांच्या विक्रमांची
गुढी उभारू सहर्ष
आले नवे नवे वर्ष
भ्रष्टाचाराची बजबज पुरी
महान आपुला देश पोखरी
चैतन्याचा, मांगल्याचा
आता होऊ दे स्पर्श
आले नवे नवे वर्ष
फडकवू पताका कीर्तीची
वाहवा मिळवू या दुनियेची
महती सांगण्या भारतभूची
गुढी उभारू उंच
आले नवे नवे वर्ष
रचना : भारती महाजन -रायबागकर. चेन्नई
५. गुढी उभारी नव्या दमाची
ऋतुपरत्वे होती साजरे
सहा ऋतुंचे सहा सोहळे
चक्र फिरता येती क्रमाने
एक-एकाचे रुप आगळे
राहे अखंड कशी साखळी
मने गुंतली मैत्री जमली
राग-मत्सर पळ काढती
याच कारणे बहु रमली
लय-उत्पत्ती सत्य युगाचे
घेता निरोप एक-दुजांचे
ध्यानी ठसवा करा निश्चित
लक्ष्य एकच सुख सर्वांचे
सांगे वेदना जाता शिशिर
नको काळजी म्हणे वसंत
गुढी उभारी नव्या दमाची
लागे कामास नसे उसंत
फुटे पालवी झाडे सजली
फुले रंगीत गोड संगीत
पिक गायन शीत पवन
सृष्टी बदल होती लयीत
रचना : विजया केळकर. नागपूर
६. चैतन्याची गुढी
आला चैत्र महिना आला
बांधले तोरण नटले आंगण
झाले नव वर्षाचे आगमन
स्वागत करु गुढी उभारुन
नेसुनी साडी, माळून हार
कडवट गोडाने उभारु गुढी
जोपासू भारतीय संस्कृती
शिवरायांची पारंपारिक रुढी
गरज आहे सदविचारांची
प्रेमाची अन आपुलकीची
समाधाणाची गोडव्याची
माणसांतील माणुस्कीची
तोडा जातीयतेच्या बेड्या
गुढी उभारा धर्मनिरपेक्षतेची
बंधुभावाची, एकात्मतेची
सर्वधर्म अन समभावाची
गुढी उभारा चैतन्याची
समवृध्दीची, समाधानाची
देशप्रगतीची, भरभराटीची
वीरांच्या शौर्यांंच्या गाथांची
रचना : प्रा.अनिसा सिकंदर. पुणे
७. गुढीपाडवा
गुढीपाडवा घडवतो जीवनी परिवर्तन
वर्षांरंभ साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त IIधृII
चैत्रमासी सृष्टीला होते नवचैतन्य प्राप्त
सृष्टी वसंताच्या आगमनाने होते मुदित
मधुमास कुसुमाकर करतो जीवन संपन्न II1II
कांतीवृत्त विषुववृत्त एकमेकांना छेदतात
छेदबिंदूला म्हणती वसंत शारद संपात
विषुवदिनी दिनमान रात्रीमान असे समान II2II
नववर्ष नवांन्न नवरसाचे अचूक मिश्रण
चैत्र पाडव्याचे आयुर्वेदाचे नाते पुरातन
दिनचर्या ऋतुचर्या सांभाळू रहाते चैतन्य II3II
कष्टानं करूया बदल शुभ मुहूर्ता पासून
षड्रिपुंवर ठेवू काबू करू जीवन संपन्न
करूया नवीन संकल्प होईल परिपूर्ण II4II
रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड
८. गुढी ऊभारू मांगल्याची
वसंत घेऊन आला
निसर्गाचे नवरंग
रामराजासाठी सारा
निसर्ग सजला ||१||
आठवा पराक्रम त्यांचा
करा साजरा आज सण
विसरा सारी दुःख
गोरगरीबांना मनाने जिंका ||२||
बळिराजाला जगवा
स्त्रीचा करा आदर
मुलीचा वाढवा वंश
करू नववर्षाचे संकल्प ||३||
नव्या विचारांची गुढी
दारोदारी बांधा
समानता, बंधुता, मानवता
सार्वांना जगवा ||४||
पाणी, वीज बचत करू या
झाडे लावु या प्नेमाने
पावसाचे पाणी वाचवा
चला साजरा करू पाडवा ||५||
रचना : अंजली सामंत. डहाणू
९. गुढी उभारू सौख्याची …
गुढीपाडव्याचा दिस चला चला करू गोड
नवे संकल्प करू नि चला लावू त्याचे झाड
संकल्पाच्या या झाडाला प्रयत्नांचे घालू खत
झाड वाढेल जोमाने, फळांची वाढे प्रत…
वर्ष नविन येईल फुलवू या नव्या आशा
नव्या वर्षाचा वाजू द्या तडम् तडम् तो ताशा
गुढी उभारा उंच नि पहा पहा नवी स्वप्ने
हाती लागती प्रयत्ने सुंदर ती नवी रत्ने…
कष्टाचाच घ्या हो नव्या वर्षात तो वसा
इतरांना हसवा नि खळखळून तुम्ही हसा
करा नात्यांची जोडणी जपा मने इतरांची
एवढ्या तेवढ्यावरून हो नको नको इतराजी…
काळ आला हो कठीण किती गेले पहा मोती
ठेवा सांभाळून आता जे जे आहे पहा हाती
नका दुखवू कुणाला घ्यावे आता सांभाळून
नही भरवसा आता कधी तापेल हो उन…
खाऊ गोडधोड आणि चला बोलू गोडगोड
आप्त जनांचे पुरवू चला आता लाडकोड..
गुढी येईल घेऊन सुख समृद्धी बरकत
ओम शांती शांती म्हणा जोडा प्रेममय नातं…
नव्या वर्षाच्या शुभेच्छा मिळो तुम्हा आयुरारोग्य
आप्तसुहृद तुम्ही हो आहे माझे अहोभाग्य
नाते असेच सुदृढ राहो नेहमी प्रेमाचे
खूप महात्म्य आहे हो, गुढीपाडवा दिनाचे..
रचना : प्रा.सौ.सुमती पवार. नाशिक
संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
नमस्कार🙏
गुढी पाडवा — काही कविता
यात माझी कविता आहे…मनापासून धन्यवाद
एक गुढी….विविधतेने नटली….
सर्वच कविता भावपूर्ण,प्रेरक
मनास भावल्या