“विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास” हाच अनुपमा कुळकर्णी बाई यांचा ध्यास. कालच ९ डिसेंबर रोजी बाईंचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्ताने त्यांचा केलेला या यथोचित गुण गौरव.
विद्यार्थी प्रिय बाईंना आपल्या वेबपोर्टल तर्फे हार्दिक शुभेच्छा.
– संपादक
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर येथे आम्ही शिकत असताना आमच्यावर अनेक शिक्षकांनी संस्कार केले. बहुतेक शिक्षकांचे मत असे होते की खुप अभ्यास करा व जास्तीत जास्त गुण मिळवा.
परंतु अनुपमा कुळकर्णी या सर्वात वयाने लहान असलेल्या बाई यांचे म्हणणे वेगळे असायचे. त्या म्हणत, अभ्यासात चार गुण कमी मिळाले आणि पहिला नंबर नाही मिळाला तरी चालेल परंतु “विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास” झाला पाहिजे. त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन केले पाहिजे. लेखन करावे. विविध स्पर्धांत भाग घ्यावा. खुप खेळावे. व्यायाम करावा आणि व्यक्तिमत्वाचा विकास साधावा. त्यांना अभ्यासात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्या पेक्षा विविध स्पर्धांत भाग घेणारे विद्यार्थी जास्त आवडत.
बाईंचे शिक्षण एम.ए., एम.एड. पर्यंत झाले आहे. त्या हिंदीची प्रवीण, हस्तकलेची सी.टी.सी. व चित्रकलेची इंटरमिजियेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
बाईंनी निरनिराळ्या विषयावर वैचारिक लेख, कविता लिहिल्या असून विविध दैनिके, मासिकात प्रसिध्द झाल्या आहेत. त्यांनी इतर मैत्रिणींच्या साहाय्याने महाकवी कालिदास यांच्या काव्याचा भावानुवाद, “मेघदूत” प्रकाशित केला असून स्वतंत्रपणे “ॠतुसंहार” द्वारे महाकवी कालिदास यांच्या काव्यानुवाद केला आहे. कर्जत मधील समाजसेवक कै. रामभाऊ गडकरी यांच्या “देव तेथेचि जाणावा” या चरित्रात्मक पुस्तकाचे संपादनही केले आहे. त्यांच्या साहित्य क्षेत्राची दखल कोकण मराठी साहित्य परिषदे तर्फे घेण्यात येऊन २८ मार्च २००२ रोजी कर्जत येथे जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
बाईंना १९९३ साली कर्जत तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, कर्जत तालुका लायन्स क्लब तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, बापूसाहेब नेने फाऊंडेशन तर्फे गुणवंत कृतिशील शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नोकरी, संसार करून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले ह्यावरून अनुपमा बाईंनी व्यक्तिमत्वाचा विकास कसा करायचा व त्याचा कसा फायदा होतो हे स्वतःच्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे त्या विद्यार्थ्यात लोकप्रिय झाल्या आहेत.
बाई निवृत्त होऊन सतरा वर्ष झाली आहेत. असे असले तरी अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे अजूनही नियमितपणे मार्गदर्शनासाठी येत असतात. एखाद्या विद्यार्थ्यांस पुरस्कार मिळाला तर बाई त्याला शाब्बासकी देतात. अध्ययन, शिलता, ध्येयासक्ती, चारित्र्य निर्मिती यांची परम्परा बाईंनी जोपासली आहे. त्यांना दिर्घायुष्य, आरोग्य, धनसम्पदा लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

– लेखन : दिलीप प्रभाकर गडकरी. कर्जत जि. रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800