नमस्कार, वाचक हो.
आज आपण केरळ मधील जगप्रसिद्ध आणि भारतातील चार नंबरवर असणाऱ्या “गुरुवायूर अप्पन” मंदिराची माहिती घेणार आहोत.
मागील एका भागात आपण याची थोडक्यात माहिती पाहिली आहे पण आज अजून थोडं सखोल जाणून घेऊ या..
त्रिशूर जिल्ह्यात गुरुवायूर येते. त्रिशूर पासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर. जर तुम्ही कोकण रेल्वेने येत असाल तर त्रिशूरला उतरून पुढे जाऊ शकता किंवा कोची विमानतळापासून साधारण ८० किलोमीटर दूर येते.
गुरुवायूर म्हणजे गुरू म्हणजे बृहस्पती – देवांचे गुरू आणि वायू – वायू देवता या दोघांनी स्वामीला म्हणजे श्रीकृष्णला इथे या भूमीत आणले, वसवले असा अर्थ होतो.
या मंदिराला दक्षिणेतील द्वारका तर म्हणतातच पण भुलोकावरचे वैकुंठही म्हणले जाते. असे मानतात की देवांचे वास्तूतज्ञ देवता विश्वकर्मा यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे.
सन १६३५ च्या आसपास या मंदिराचे पुर्ननिर्माण केले गेले. केरळी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आपणास इथे पाहायला मिळतो. बालगोपालच्या विविध लीला मंदिरात कोरल्या आहेत. आखीव रेखीव स्वरूपात अप्रतिम, भव्य दिव्य असे बांधकाम आहे.
हे मंदिर पहाटे ३ वाजेपासून ते दुपारी १ पर्यंत आणि संध्याकाळी ४ ते १० वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडे असते. मनोहर कृष्णमूर्ती पाहताना भान हरपून जाते. चतुर्भुजधारी विलोभनीय अशी इथली मूर्ती आहे. चार हातांपैकी एका हातात गदा, एका हातात शंख, एका हातात सुदर्शन चक्र आणि एका हातात कमळ फुल आहे. कमळ फुलाबरोबर इथे तुळशीच्या माळेलाही फार महत्व आहे. ती देवाला वाहिली जाते. विष्णूप्रिया, हरीप्रिया तुळशीला म्हणतात ते काही उगीच नाही..
पारंपरिक प्रथेनुसार, पद्धतीनुसार मंदिरात पूजा विधी केल्या जातात. श्रीकृष्णाष्टमीला दहा दिवस उत्सव साजरा केला जातो. तर एकादशी गुरुवायूर एकादशी म्हणून साजरी करतात.
इथे फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला जातो. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात जाताना घालायचा पोशाख. पुरुषांना मुंडू आणि शर्ट काढून तर स्त्रियांना साडी परिधान करून दर्शनासाठी जावे लागते. पण अलीकडे स्त्रियांना, मुलींना चुडीदार घालून जायची परवानगी दिलेली आहे.
भक्त भक्तिभावाने दर्शनाला येतातच पण त्याबरोबर ईश्वरचरणी काही वस्तुही अर्पण करतात तेही आपल्या वजनाइतके त्याला तुलाभारम म्हणतात.क्रमशः
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG_20210703_154441-150x150.jpg)
– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील.
पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800