गुरू ज्ञानदीप, गुरू वात्सल्यरूप
गुरू स्वयंप्रकाश, गुरू मोकळे आकाश,
गुरू विद्यादानी, गुरू त्रिकाल ज्ञानी.
गुरू आभाळमाया, गुरू देवराया
गुरू आधार, गुरू करी नौकापार
गुरू नादब्रम्ह, गुरू परब्रम्ह.
गुरू अभयदानी, गुरूमोक्षदानी.
गुरूविण दुजा नसे कोणी.
गुरूवाचून माणूस घडेलच कसा. जन्माला आल्या आल्या ओल्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम माता पिता करतात. कलेकलेने वाढणार्या चंद्राप्रमाणे आपल्या बाळाने कसे खावे, कसे बोलावे, कसे चालावे हे सर्व संस्कार आई वडील करत असतात. पुढे शाळेत गेल्यावर गुरूची भूमिका शिक्षकांची असते. ज्ञानामृताचे कण ते पाजत असतात आणि आयुष्य घडत असते. आपण सगळे कुंभाराचे घडे आहोत. प्रत्येकाचा रंग वेगळा, रूप वेगळे, स्वभाव वेगळा, आकार वेगळा…!
वळणावळणाच्या वाटेवर जीवन चालत असते. वाट कुठे जाते कुठे संपते, सर्व अज्ञात…!
वाटेत कधी फुले तर कधी काटे. कधी मार्ग सरळ तर कधी खाच खळगे…! आपण पडतो, धडपडतो, कधी रक्तबंबाळ होतो. अशावेळी भेटतो आपल्याला मदतीचा हात देणारा हमरस्त्यावर आणणारा एक वाटाड्या, मार्गदर्शक गुरू.
हा गुरू असामान्य. ह्याची साधना मोठी, योग मोठा, तप मोठे. ह्याची परमात्म्याशी भेट झालेली असते. भगवंतांनी कुरूक्षेत्रावर अर्जूनाला केलेल्या गीतोपदेशाचे ज्ञान त्यांनी प्राप्त केलेले असते, किंबहुना ते त्या भगवंताचेच अवतार असतात. ते संत महंत असतात. मग ते शिरडीचे साईबाबा असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतील किंवा ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज असतील. “जगाच्या कल्याणा संताच्या विभूती” असे हे संत सज्जन.
श्रीसमर्थ रामदासस्वामी.मानवी जीवनात खरे काय आणि खोटे काय हे समजण्यासाठी विवेकासारखे अन्य साधन नाही हे सामान्य प्रापंचिकांना स्वामी समर्थ शिकवितात. कोणतीही इतर साधना न करता केवळ विवेकाच्या बळावर माणसाला आत्मदर्शन घडू शकते असा बोध ते देतात.
“संसार त्याग न करिता | प्रपंच उपाधी न सांडिता |
जनामध्ये सार्थकता | विचारेचि होय ॥”
“काही सांडावे लागत काही|काही मांडावे लागत नाही |एक विचार शोधून पाही | म्हणजे कळे ॥ हे त्यांनी दासबोधात आपल्यासाठी लिहून ठेवले आहे.
तेव्हा ह्या सर्व संतांनी आपल्यासाठी त्यांचे मौलिक विचारांचे भांडार मुक्त हस्ते खुले केले आहे त्यांचा अभ्यास, साधना करणे म्हणजेच खर्या अर्थाने गुरूंप्रती आदर व्यक्त करणे आहे, गुरूपौर्णिमा साजरी करणे आहे.
– लेखन : अरूणा मुल्हेरकर. मिशिगन, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800