नमस्कार, वाचक हो.
केरळचे विविधांगी दर्शन घेऊन आज पुन्हा एकदा आपण खाद्य प्रेमींसाठी फक्त गोड पदार्थांची माहिती घेणार आहोत तेही पारंपरिक खिरींचे काही प्रकार घेऊन 😊
खास कार्यक्रमासाठी, सणासाठी बरेच गोड पदार्थ आपण नेहमीच बनवतो. पण वेगवेगळ्या प्रकारच्या बऱ्याच खिरी आपल्याला केरळमध्ये पाहायला मिळतात.
सर्वांची आवडती खीर म्हटले तर पालडा पायसम (Palada paysam) तांदळाच्या फ्लेक्सपासून दुधात बनवलेली खीर. यामध्ये वेलची, सुकामेवा कशाचीही गरज नसते. दुध, साखर आणि राईस फ्लेक्स एवढंच फक्त पण एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा खाऊ वाटणारच अशी ही अद्वितीय खीर.

यातलाच दुसरा प्रकार येतो तो Ada pradhaman – अडा पायसम – पण यात गूळ, ओल्या खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे आणि आवडीनुसार सुकामेवा वापरला जातो.
मंदिरात प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी तांदळाची खीर (Nei paysam) असते ती, गूळ आणि तांदळापासून बनवलेली. जरा जास्त तुपात काजू, मनुके, ओल्या खोबऱ्याचे तुकडे भाजून घालतात. गुळाच्या चवीत आणि रंगात रंगलेली ही खीर म्हणजे खाद्य प्रेमींना पर्वणीच.

आपण करतो तशी गव्हाची खीरही (Gothambu pradhaman) इथे बनवली जाते पण नारळाचे दुध घालून! ओल्या खोबऱ्याचे तुकडे, काजू मनुके तुपात खरपूस भाजून अगदी साग्रसंगीत असते.
Semiya paysam म्हणजे शेवयाची खीर – पटकन होणारी. वेलचीचा सुगंध, सुक्या मेव्याची चव आणि साखरेचा गोडवा म्हणजे खाणारा क्या बात हैं ! म्हणतच खात राहतो

केरळचे राष्ट्रीय फळ फणस. वरून कठीण आणि आतून मऊ. फणसाच्या गऱ्यांचीही पारंपरिक पद्धतीने खीर केली जाते. (Chakka pradhaman) विशूसाठी (हिंदू नववर्ष) खास बनवतातच ही खीर.
गरम किंवा थंड कशीही आवडीने खावा, पोट भरते पण मन भरत नाही हेच खरं..

सहसा आपल्याकडे नसतो पण इथे केला जातो तो खिरीचा प्रकार म्हणजे डाळींची खीर. मुगाची किंवा हरभरा डाळीची खीर केली जाते. गूळ, काजू मनुके घालून नारळाच्या दुधात या खिरी केल्या जातात.
Nendran banana म्हणून एक केळाचा प्रसिद्ध प्रकार केरळमध्ये आहे. नैवेद्य किंवा प्रसादासाठी हे केळ शिजवून वापरले जाते आणि याचीच खीरही केली जाते. या केळाला सर्व गुण संपन्न समजतात. या केळाची गूळ आणि नारळाचे दुध घालून केलेली खीर अजूनच पौष्टिकता वाढवते.

संस्कृती जपण्याच्या बाबतीत मलयाळी लोकं कायम अग्रेसर असतात पण खाद्य पदार्थांच्या बाबतीतही ही गोष्ट लक्षात येते.
गुळाचा वापर साखरेपेक्षा शरीरासाठी फायदेशीर आहे आणि हेच या विविध खिरिंच्या प्रकारातून दिसून येते नाही का ?
मग.. तुम्ही इथे आल्यावर या सर्व खिरींची चव चाखणार ना ?

– लेखन : सौ. मनिषा पाटील, पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
खीर आम्हा शाकाहारी लोकांचा आवडता पटकन होणारा पदार्थ छान माहिती नक्कीच येऊ ताई