२८/०९/२०२२
आज आमच्या ग्रँड कॅन्यन टूरचा शेवटचा टप्पा होता. आज आमाही सेडोना या जवळच्याच नगरीला भेट द्यायचे ठरवले. फ्लॅगस्टाफ ते सेडोना हा एक तासाचा ड्राईव्ह आहे. म्हणजे साधारण आमच्या हाॅटेलपासून वीस मैलाचा प्रवास.
अॅरीझोना स्टेट म्हणजे जगातले एक नंबरचे वाळवंट. रुक्ष, रेताड, रखरखीत. मात्र सेडोना हे येथील अतिशय नयनरम्य, निसर्गरम्य असे हिल स्टेशन आहे.
ड्राईव्ह अतिशय रमणीय होता. घाटातला, वळणावळणाचा रस्ता. दुतर्फा उंच सुचीपर्णी (पाईन) चे उंच वृक्ष. आणि पलीकडे अजस्त्र कॅन्यन. अॅरीझोना म्हणजे पर्वतीय, भूगर्भीय आश्चर्यच !
आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात आम्ही पर्वत राशीवर वारा, पाणी आणि खचणार्या मातीमुळे तयार झालेली ही नैसर्गिक विविध आकारांची लाल, पांढरी कधी पिवळी अशी असंख्य शिल्पे पाहिली. आणि प्रत्येक वेळी मंत्रमुग्ध झालो. आजच्या प्रवासातही आम्ही अनेक वेळा न राहवून थांबलो. फोटो काढले आणि निसर्गोत्सवाचा आनंद ऊपभोगला. इथेच आम्ही नवरात्री देवीची असंख्य रुपेच पाहिली जणू …
सेडोना येथील अमिताभा स्तुप आणि शांती वनाला आम्ही भेट दिली. जवळ जवळ १४ एकर मध्ये वसलेलं आणि उंच उंच लाल खडकांनी वेढलेलं थंडर माउन्टनच्या पायथ्याशी असलेलं. मनाला अगाध शांती देणारं हे स्थान आहे. जेट्सुमा या न्यूयाॅर्कर लामाने ही जागा स्तुपासाठी निवडली. तिबेटीयन पद्धतीचा हा स्तुप आहे.
इथे सर्वधर्मीय लोक ध्यान धारणा (meditation) आणि प्रार्थने साठी येतात. नतमस्तक होतात.
अखंड महागनी लाकडात कोरलेली बुद्धाची मूर्ती इथे एका खडकावर स्थित आहे. ही मूर्ती इंडोनेशियाहून या स्तुपास भेट म्हणून दिली गेली आहे. जवळ जवळ ३६ फूट उंच अशी ही सुंदर मूर्ती आहे.

त्या ठिकाणी पोहचल्यावर खरोखरच माणूस हळुहळु तणावमुक्त होतो. तिथल्या वातावरणात अशी काही उर्जा आहे की सार्या चिंता, विकार झाडावरच्या पानाप्रमाणे गळून पडतात. ईश्वर एक आहे, चराचरात त्याचं वास्तव्य आहे हे जाणवतं. माझ्या मनाने जो गारवा इथे अनुभवला तो शब्दातीत आहे. खरोखरच इथे मला तो भेटला. त्याच्या चरणी मी लीन झाले. एका अद्वैताचीच अनुभूती मला मिळाली.
सेडोना येथील चॅपल आॉफ होली क्राॉसला आम्ही भेट दिली. हे दुसरं भक्तीमय वातावरणाचं स्थान. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांत. हे चॅपल कोकोनिनो नॅशनल फाॅरेस्ट लँडवर, उंच अशा टेकडीवर अतिशय सुबक पद्धतीने बांधलेले आहे. हे बांधण्यास केवळ अठरा महिने लागले. १९५६ साली या चॅपलचे बांधकाम पूर्ण झाले. जवळजवळ ३००, ३०० यु एस डाॅलर्स या बांधकामासाठी लागले. उंच गाभार्यात धातुची येशुची क्रुसावरची मूर्ती आहे.
भिंतींवर, येशूला ज्या खिळ्यांनी क्रुसावर ठोकले त्यांची प्रतिकात्मक म्युरल्स आहेत. शांत मेणबत्यांच्या प्रकाशात त्या मूर्तीकडे पाहताना नकळतच आपल्या कानात शब्द ओतले जातात, “हे, प्रभु ! यांना क्षमा कर. कारण त्यांना कळत नाही ते काय करत आहेत..!”

आपले मन अंतर्मुख होते. समोरच्या ऊंच लाल खडकात हातात लहानग्या येशुला घेतलेली मदर मेरी दिसते. प्रार्थनेसाठी उंचावलेले भक्तीमय करांचे दर्शन होते.
सारेच अलौकिक. कल्पनेच्या पलीकडचं. सूक्ष्मतेतून विशालतेकडे नेणारं.. द्वैतातून अद्वैताकडे जाणारं…
परमात्म्याची वाट दाखवणारं.
सेडोना मधल्या लाकीपाकी या आर्ट्स आणि क्राफ्ट विलेजला आम्ही भेट दिली. हे एक कलाकार आणि त्यांची कलाकारी प्रस्तुत करणारं, ओक क्रीकच्या किनारी वसलेलं असं देखणं गाव. सुंदर पायवाटा, कारंजी, विविध रंगांची फुलझाडे, कलात्मक रितीने रंगवलेल्या भिंती पाहताना खूपच मजा वाटत होती. इथे पन्नास पेक्षा अधिक दुकाने आहेत. विविध कलात्मक वस्तुंचे सुंदर प्रदर्शनच म्हणा ना.

अनेक क्युझीनची रेस्टारंट्स इथे आहेत. आम्ही एका मेक्सीकन रेस्टाॅरंट मध्ये दुपारचे जेवण घेतले. किती पाहशील तू, किती घेशील तू ! अशीच आमची स्थिती झाली. पाय दुखत होते. मन भरत नव्हतं. खिसाही रिकामा होत होता. अखेर नाईलाजानेच बाहेर पडलो त्या सौंदर्य नगरीतून..
आमच्या या ग्रँड कॅन्यन सफरीतला अत्यंत आकर्षक आणि एक्सायटींग कार्यक्रम म्हणजे फ्लॅगस्टाफ शहरातील वेधशाळेची (observatory) भेट.
फ्लॅगस्टाफ हे खगोल शास्त्रज्ञांचे प्राचीन संशोधन पीठ आहे. १८९४ मध्ये ही लाॅवेल वेधशाळा स्थापीत झाली. १९१२ साली ब्रह्मांडात होणारे बदल आणि विस्तार यांचा विस्तृत अभ्यास, संशोधकांनी या वेधशाळेत केला. १९३० साली इथे प्लुटो या ग्रहाचा शोध लागला.
सूर्यमाला, ग्रह तारे, आकाशगंगा, आणि अंतराळ या विषयीचे संशोधन इथे सातत्याने होत असते. तीन ते चार मीटर उंच असलेले LDT आणि DCT हे जगातील अत्यंत कार्यक्षम असे टेलीस्कोप इथे आहेत.

जगातील सर्व खगोलप्रेमी लोक इथे भेट देउन ग्रहतार्यांच्या राज्यातला आनंद भोगतात. आज आम्हीही त्यापैकी एक होतो हे अहोभाग्यम्.!! लहानपणी माझे वडील आम्हाला पहाटे किंवा रात्री खुल्या मैदानावर केवळ तारे पहायला घेऊन जात. आज जगप्रसिद्ध टेलीस्कोपमधून हे ब्रह्मांड पाहताना कोण आनंद होत होता हे कसे सांगू ? रिंग असलेला तो डौलदार शनी आणि त्याचे ८२ चंद्र तसेच केवळ वायुरुपी भला मोठा गुरु हा ग्रह आणि चार चंद्र इतक्या जवळून डोळ्यात साठवताना देवाने दृष्टी दिल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

बघावं तितकं थोडं.. लिहावं तितकं थोडं. तर अशीही अमेरिकेतल्या अॅरोझोना राज्यातील आमची मनमौजी सफर साठा उत्तरी सफल संपूर्ण झाली.

– लेखन : राधिका भांडारकर. ह. मु.अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान वर्णन 👌👍