नात्यांनाही लागत असतं ग्रहण
आपल्याच माणसांचं..
क्वचित आपलं स्वतःचंही..!
ग्रहण परस्परांच्या इगो, अहंकारांचं..
माघार न घेण्याच्या वृत्तीचं..
नात्यांच्याच बंधनांचं
बंधनांच्या ओझ्याचं..
अपेक्षांनी झाकोळलेल्या प्रेमाचं सुध्दा..!
लागत असावेत बहुदा वेध सुध्दा..
संभाषणातील तुटकपणाचे..
कळत नकळतच्या टोमण्यांचे..
परस्परांवरील अविश्वासाचे..
भांडणांचे, रूसव्याचे, अबोल्याचे..
क्वचित कधी तिरस्काराचे सुध्दा..!!
नाही समजत नात्यांना लागलेले वेध..
समजलेच तर नाहीच उमजत..
या वेधांना ना मुदत
ना मुदतीचं कुठलं बंधन..!
अवकाशातील ग्रहण कसं मुदतींचं,
वेळ होताच सुटणारं..
चंद्र-सूर्य-पृथ्वी साऱ्यांनी
एक-एक पाऊल उचलताच
झाकोळलेलं आभाळ
यथावकाश निरभ्र करणारं..!
पण नात्यांच्या ग्रहणाची वेळ..?
संपवावीच लागेल…, आपल्यालाच..!!
स्पष्ट पाहावं नात्यांचं प्रतिबिंब
गैरसमजांनी झाकोळलेल्या
ग्रहणाचा आरसा स्वच्छ पुसत..
ओल्या मायेच्या शिंपणाने..!
प्रेमाच्या सुगंधी फवारणीने..!!
नात्यांचं ग्रहण अस सुटावं..!
आपला आरसा आपणच पुसावा..!!
– रचना : डॅा.मीना बर्दापुरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800