Friday, November 22, 2024
Homeसेवाग्राहकांनो, उपभोगवादी बनू नका !

ग्राहकांनो, उपभोगवादी बनू नका !

ग्राहकांच्या हक्कांविषयी नेहमीच बोलले जाते. अर्थात ते योग्यही आहेच. पण ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक असतानाच आपल्या कर्तव्यांचे देखील भान ठेवले पाहिजे, असे आजच्या ग्राहक दिनानिमित्ताने सांगताहेत खुद्द ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्री गजेंद्र क्षीरसागर…
– संपादक

ग्राहक चळवळीचा विचार करताना जगामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या ग्राहक चळवळी अस्तित्वात आहेत असे दिसते. एका चळवळीत ग्राहकांच्या हक्कांबाबत फक्त विचार होतो तर दुसऱ्या प्रकारच्या चळवळीत ग्राहकांच्या कल्याणाचा विचार केला जातो. ‘कंज्युमर राइट्स मुहमेंट’ ही चळवळ पाश्‍चात्त्य विचारधारेवर आधारलेली चळवळ आहे तर ‘ग्राहक कल्याण चळवळ’ ही भारतीय तत्वज्ञान आणि विचारदर्शन यावर आधारलेली चळवळ आहे.

या दोन्ही चळवळींमध्ये मूलत: फरक आहे तो दृष्टिकोनाचा. ‘ग्राहक ‘म्हणजे काय या संज्ञेकडे पाहण्याचा विभिन्न दृष्टिकोण या दोन्ही चळवळीत आढळून येतो. पाश्चात्त्य संस्कृती वर आधारलेले, पश्चिम विचार दर्शनावर आधारलेली ग्राहक चळवळ ही ग्राहकांना तो फक्त ‘उपभोक्ता’ आहे असे समजते. त्या अनुषंगाने उपभोक्त्याचे ‘आठ अधिकार’ या भोवतीच ही पाश्चिमात्य चळवळ मर्यादित स्वरुपात फिरत आहे.

भारतीय विचार दर्शना वर आधारित ग्राहक चळवळ ही ‘उपभोगावर संयम’ शिकवते. तर ही पाश्चिमात्य विचारदर्शनावरील चळवळ ‘भोगवादा’वर आधारलेली असल्याने वस्तू संस्कृती निर्माण करून केवळ आर्थिक देवाण-घेवाणीचाच विचार करते.

उपभोग घेणारा तो उपभोक्ता असं मानणारी ही चळवळ एक प्रकारच्या चंगळवादाला जन्माला घालत आहे. उपभोक्ता नावाचा एक समाजातील वर्ग आहे, त्याचे इतर संबंध जपले गेले पाहिजे, त्याच्या अधिकाराचे रक्षण झाले पाहिजे, या अशा दृष्टिकोनातूनच पाश्चिमात्य संस्कृती वर आधारित ही ग्राहक चळवळ कार्य करते. त्यामुळे आपण फक्त ‘मी’ आणि ‘माझे’ याच वर्तुळात व्यक्ती फिरत राहते.

दुसऱ्यांचे कर्तव्य काय आहे ? याकडे या पश्चिमात्य चळवळीचे अधिक लक्ष असताना स्वतःच्या फक्त हक्क रक्षणाकडेच ते प्रामुख्याने पाहतात. त्यामुळे एक प्रकारच्या आत्मकेंद्री असलेल्या किंवा बनलेल्या व्यक्तींचाच यामध्ये समावेश होतो. अशा व्यक्तींच्या समुहामुळे ‘चंगळवादा’ला खतपाणी घातले जाते. ज्या समाजात मी राहतो त्या समाजाचे, जगाचे अथवा पृथ्वीच्या पर्यावरणाचे मला काही घेणेदेणे नाही, माझ्या सुखापुढे मला कशाचीही पर्वा नाही अशा प्रकारची मनोवृत्ती तयार होऊन तीच आपली ‘लाईफ स्टाईल’ या अशा चळवळीतून निर्माण होत आहे. त्यामुळे यातून मनुष्याच्या नीतिमूल्यांपासून फारकत घेतली जात आहे.
अशा प्रकारच्या रचनेतून केवळ त्यांचेच अस्तित्व राहून व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांच्यात सतत संघर्ष चालू राहतो.

बिंदूमाधव जोशी

या अशा संघर्षवादी रचनेला ग्राहक पंचायतीचे संस्थापक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी ‘उपभोक्ता वाद’ असे संबोधतात.
भारतीय ग्राहक चळवळीचे जनक बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली ग्राहक चळवळीचा भारतीय सिद्धांत मांडला. त्या वेळी ‘उपभोक्ता’ या शब्दाऐवजी त्यांनी ‘ग्राहक’ या शब्दाची योजना अत्यंत जाणीवपूर्वक केलेली आहे. ‘शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या आधारे जो ग्रहण करतो तो ग्राहक’ अशी सर्वस्पर्शी एकात्म भाव व्यक्त करणारी ग्राहकाची व्याख्या त्यांनी सांगितली आहे.

पाश्चात्य विचारसरणीचा कंझ्युमर म्हणजेच उपभोक्ता या शब्दांमध्ये केवळ भौतिक सुखाची , गरजांची प्राप्ती असा अर्थ अभिप्रेत आहे. या उपभोगवादी संस्कृतीमुळे कमोडिटी कल्चर म्हणजेच वस्तू संस्कृती जन्माला आली आहे. आपल्याला गरज नसलेल्या अनेक वस्तूंचा मोह आपल्याला पडतो. विविध आकर्षक जाहिरातींचा भुलभुलैया, त्यांच्या नवनवीन कल्पना, फ्री गिफ्ट योजनांचा सुळसुळाट, विक्री योजना ,लकी ड्रॉ स्कीम, सेल, इंटरनेट अशा गराड्यात आपण सापडत आहेात. सर्वसामान्य ग्राहक यामुळे भांबावून जात आहे. त्यातच विविध बँकांच्या क्रेडिट कार्ड योजना सर्वसामान्य ग्राहकांना या चक्रव्यूहात अडकविण्यासाठी आता सज्ज झाल्या आहेत. यातूनच वस्तू संस्कृतीला जोरदार समर्थन मिळते, पण त्या माध्यमातून आपण सुखाचे भागीदार न होता दुःखाला जवळ करीत आहोत. वस्तू संस्कृतीने मनुष्याला दुखी केले आहे. जुन्या वस्तू टाकून नवीन विकत घेण्याचे प्रकार वाढत जात आहेत. त्यातूनच ‘वापरा आणि फेका’ ही संस्कृती विकसित केली जात आहे.

भारतीय विचार दर्शना वरील ग्राहक चळवळीत उपभोगावर संयम शिकवला आहे. राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने पाश्चिमात्य संस्कृतीचे हे वारे कोणत्या दिशेला वाहत आहे हे समजून घेऊन आपण आपली खरेदी करावी अशी अपेक्षा आहे. वस्तू संस्कृतीच्या मायावी स्वरूपामुळे आपण फसवले जात नाही ना ? याचा विचार सर्वसामान्य ग्राहकाने करायला हवा. ऋण काढून सण साजरा करण्याची आपली संस्कृती नाही. क्रेडिट कार्डच्या रूपाने ते येऊ पाहात आहे. अशा संस्कृतीला आपण खतपाणी तर घालत नाही ना ? याचा विचार व्हायला हवा.

गजेंद्र क्षीरसागर

– लेखन : गजेंद्र क्षीरसागर
अध्यक्ष, अहमदनगर जिल्हा ग्राहक पंचायत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments