आज २४ डिसेंबर, राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ग्राहकाने प्रत्येक वस्तू आणि सेवेच्या खरेदी वेळी पावतीचा आग्रह का धरला पाहिजे,याचे महत्व समजून सांगणारा हा लेख.
लेखिका सौ वर्षा क्षीरसागर -खिस्ती या समुपदेशक असून पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकारितेतील एम एम आर ही पदवी संपादन केली असून त्या ग्राहक पंचायतीत गेल्या ३० वर्षापासून सक्रिय आहेत. न्यूज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
आपल्याला,म्हणजेच ग्राहकाला अक्षरशः काही ना काही कारणांनी,काही ना काही खरेदी करावीच लागते. पण एक अतिशय महत्वाची बाब आपण विसरतो किंवा तिकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवेसाठी दिलेल्या मोबदल्याची पावती दुकानदाराने स्वतःहून न दिल्यास, ती आपणच त्याच्याकडून आग्रहपूर्वक मागून घेणे, ही होय.
एखादी वस्तु किंवा सेवा आपण पैसे देऊन खरेदी करतो आणि व्यवहार झाला असे तो ग्राहक मानतो. पण या सर्व खरेदी व्यवहारात पावती घेणे आवश्यक आहे हे तो विसरतो. वास्तविक पाहता वस्तु व सेवा खरेदी केल्याचा पावती हा एक महत्वाचा पुरावा असतो, याचे स्मरण प्रत्येक ग्राहकाचे नेहमीच ठेवले पाहिजे.
पावती का घ्यावी ?
ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या अथक प्रयत्नातून १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. सन १९९० मध्ये ग्राहक न्यायालये म्हणजेच ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाचे कामकाज सुरू झाले. या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये २०१९ मध्ये बदल करण्यात आला आणि नवीन कायदा अस्तित्वात आला.
ग्राहक न्यायालयात म्हणजेच आत्ताच्या ग्राहक आयोगात तक्रार दाखल करताना तक्रारदाराला लेखी पुरावे सादर करावे लागतात.पण बऱ्याच वेळा पावती नाही म्हणून तक्रार निकाली निघाल्याची उदाहरणे आहेत. अशावेळी खरेदीच्या वेळी घेतलेली पावती महत्वाची ठरते. पावतीचा आग्रह धरताना त्यावर विक्रेत्याचे नाव, त्याचा पत्ता या बरोबरच आवश्यक परवाने, नोंदी विषयक माहिती आपल्याला समजते. वस्तुची अधिकृत व कायदेशीररित्या विक्री केली जाते याची खात्री पटते. त्याचवरोवर वस्तुचे वर्णन, उत्पादकांचे नाव, वस्तुचा क्रमांक, पॅन नंबर, किंमत यासारखी माहितीही ग्राहकाला मिळते. वस्तूची गुणवत्ता व ती चांगली निघाली तर या माहितीची फारशी गरज पडत नाही. पण जर वस्तु खराब निघाली, त्यात काही दोष आढळून आला तर त्या विक्रेत्याशी किंवा उत्पादकाशी संपर्क साधताना या पावतीची व त्यावरील गाहितीची अत्यंत गरज भासते. अनेक वेळा उत्पादक व विक्रेता काही ठराविक काळासाठी वस्तुचा दर्जा, त्याची त्या काळात मोफत दुरूस्तीची पण खात्री देतात. अशावेळी खरदीची पावती व त्यावरील तारीख महत्वाची ठरते. जर पावती नसेल तर हमी काळासाठीचाही हमी कालावधी संपला. आता मोफत सेवा मिळणार नाही, अशी उत्तरे आपल्याला ऐकायला मिळतात.
पावती : ग्राहक आणि देश हिताची !
एखाद्या ग्राहकाने जर दुकानदाराला पावती मागितली तर पावती कशाला घेता ? उगाचच काही टक्के विक्रीकर तुम्हाला भरावा लागेल व किंमत जास्त द्यावी लागेल, असे विक्रेते सांगतात. हा अनुभव विशेषतः सोने खरेदीच्या वेळी बहुतांशी येतो. पण केवळ एक जागरूक ग्राहकच म्हणून नाही तर एक दक्ष नागरिक म्हणून आपण हा कर भरलाच पाहिजे. कारण ग्राहक म्हणून काही तक्रार करावयाची असल्यास पावती महत्वाची ठरतेच पण त्या द्वारे सरकार कडे जमा होणाऱ्या पैशातूनच सरकार देशाचा, राज्याचा विकास करत असते.
म्हणूनच कर चुकवेगिरी थांबविण्यासाठी प्रसंगी थोडी जादा किंमत द्यावी लागली तरीही अधिकृत पावतीची मागणी प्रत्येकाने केलीच पाहिजे. वस्तुतील दोष, दुरूस्ती करणे, ती वस्तू बदलून देणे, प्रसंगी किंमत परत मिळणे, यासाठी पावती महत्वाची ठरते. एखादी वस्तू दुरूस्तीला देताना सुध्दा पावतीचा आग्रह धरणे चुकीचे नाही. कारण घड्याळ दुरुस्तीला दिले असता दुकानात चोरी झालो, आग लागली असता या पावतीच्या आधारे ग्राहक न्यायालयाने त्या किंमतीचे दुसरे घड्याळ किंवा नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
सरळमार्गी आणि व्यवहारातील खाचाखोचा माहित नसलेला ग्राहक, अडविला, नडविला जातो. बरेच व्यवहार तोंडी केले जातात. या व्यवहारावर विश्वास ठेवला जातो. पण, जेंव्हा पावती नाही याचा गैरफायदा घेऊन खरेदी विक्रीचा व्यवहार झालाच नाही, असे उत्तर मिळते तेंव्हा फसल्याची जाणीव होते. पावती व किंमतीचे महत्व कळते.
तोंडी व्यवहाराचे तोटे
वस्तु खरेदी बरोबरच जमीन, फ्लॅट खरेदी व्यवहारातही लेखी कराराचे महत्व खूप आहे. ग्राहक आयोगाकडे येणाऱ्या बहुतांशी तक्रारीतूनच हेच स्पष्टपणे जाणवते. अनेक तक्रारीत ग्राहकांनी हा माझा मित्र आहे, आपला नातेवाईक आहे किंवा माझा साहेब आहे म्हणून ५० ते एक लाखापर्यंतच्या रकमा कोणताही लेखी व्यवहार न करता विश्वासाने दिल्या.
जमिनीच्या किंमती जशा वाढू लागल्या तशी घरांचो मागणी आणि किमतीही वाढू लागल्या . आपापसात व्यवहार करणारे मित्र, नातेवाईक, साहेब, सहकारी, परिचित असले तरी जादा फायदा मिळविण्यासाठी पूर्वी केलेले तोंडी करार रद्द ते प्रसंगी जादा किंमतीला त्याच जमिनी किंवा फ्लॅट विकू शकतात आणि असे विकल्याही गेले आहेत, पण पावती अभावी आपण हतबल होतो.
बाजारातून अनेक वस्तू विकत घेताना त्याची पावती घ्यायला शक्यतो विसरू नका. विशेषतः औषधे, खते, बि-बियाणे, अवजारे, कापड, प्रक्रिया केलेले पदार्थ आदीच्या खरेदीच्या वेळी पावतीच्या आग्रह धरलाच पाहिजे. तसेच या पावतीवर वस्तुंच्या संदर्भातील सर्व नोंदी करून घेतल्या पाहिजेत. यात संकोच बाळगायला नको. कारण या गोष्टी आपल्याच फायद्याच्या आहेत.तुम्हाला काय वाटते ?
— लेखन : सौ. वर्षा क्षीरसागर -खिस्ती. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
खूप छान माहितीपूर्ण लेख आहे.धन्यवाद 🙏🌹