ग्राहकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे. गरज पडल्यास शासनाच्या वैध मापन कार्यालयाची मदत घ्यावी, असे आवाहन सातारा जिल्हा वैध मापन उप नियंत्रक, सौ ज्योती पाटील यांनी केले. त्या सातारा जिल्हा ग्राहक उपभोक्ता समितीच्या वतीने पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेज मध्ये विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक संरक्षण कायदा व हक्क मार्गदर्शन शिबिरात बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, माणसाच्या जन्मापासून ते मरणापर्यंत तो कुठल्या ना कुठल्या रुपात ग्राहक असतोच. त्यामुळे त्याने ग्राहक हक्कांविषयीचे कायदे व ग्राहक म्हणून असलेली कर्तव्ये, जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. योग्य वेळी,योग्य ठिकाणी दाद मागितली पाहिजे. ग्राहकांच्या हितासाठी शासनाने तालुका स्तरावर वजन, मापे निरीक्षक नेमले असून, वेळ प्रसंगी त्यांचे साह्य देखील घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना, निवृत्त माहिती संचालक तथा न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी कॉलेजने विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या ग्राहक जागृती शिबिराचे कौतुक करून विद्यार्थ्यानी या वयातच सर्व कायदे, नियम समजून घेतले तर ते एक सक्षम नागरिक घडू शकतील, असे सांगितले.
यावेळी कराड विभागाचे वैध मापन निरीक्षक श्री अगरवाल, ग्राहक उपभोक्ता समितीचे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई कुंदप यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले.
यावेळी विविध स्पर्धामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या शिबिरास ग्राहक उपभोक्ता समितीचे राज्य मार्गदर्शक तथा महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे निवृत्त उप मुख्य दक्षता अधिकारी श्री अशोक कुंदप, राज्य अध्यक्ष श्री मंगेश मोहिते, सातारा जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) उत्तमराव तवटे, पाटण तालुका अध्यक्ष शैला रेवडे आदी उपस्थित होते.
शिबिराच्या आयोजनासाठी ग्राहक उपभोक्ता समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन, एन एस एस अधिकारी प्रा बळीराम लोहार यांनी केले.
या शिबिराला १५० च्या वर विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी वैध मापन कार्यालयाच्या वतीने ग्राहक जागृती विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800