रात्री पार्टीला जाण्यास आईनी परवानगी दिली नाही म्हणून ती नाराज होती. कॉफी चा smiley वाला कप घेऊन पडलेल्या चेहऱ्याने ती बाल्कनीत आली. कुंड्यांमध्ये लावलेली फुलझाडे शांत झोपली होती. हिरव्या घट्ट आवरणातील बंद कळीला मधमाशी बराच वेळ टोचत होती. पण, तिच्या भोवतीचं आवरण ताकतीनं कळीचा कच्चेपणा जपत होतं.
ती आत गेली आई तिच्या सकाळच्या डब्याची तयारी करत होती. तिच्या आवडीच्या सँडविचची पिवळ्या साडीत आई छान दिसत होती पण हिरव्या घट्ट आवरणा सारखी का भासत होती ! आणि कॉफीच्या कप वरचा smiley आता तिला गोड दिसू लागला होता.
कौमार्य अवस्था, शिस्त आणि गोंधळलेल्या काळाचं व्यवस्थापन हे आजच्या काळातील पालकांसमोरचं मोठं आव्हान आहे. मुलं एका अवास्तव काल्पनिक विश्वात रमलेली असतात. त्यांच्या या विश्वात प्रवेश घेणं आणि त्यांना कोणतीही मानसिक इजा न होता वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करणं हे कौशल्य अवगत असणं आवश्यक आहे. त्यांच्या आणि आपल्या वयाचं, विचारांचं अंतर कमी करताना दुरावे येणार नाही याचं पण भान राखावं लागतं.
हा ताळमेळ बसवताना आपण पालक बऱ्याचदा अधीर होतो आणि त्यामुळे पालक आणि पाल्य यांच्या मध्ये सुसंवाद कमी होत जातो. मग पुढे संवाद देखील कमी होत जाऊन अगदी मोजकं बोललं जातं.
या एकूण प्रक्रियेत मुलं त्यांच्या मानसिक, भावनिक गरजपूर्ती साठी बाहेर कोणाचा तरी शोध घेऊ लागतात आणि या प्रवासात त्यांना कोण कसे व्यक्ती भेटतील आणि ते त्यांचा कसा उपयोग करतील याचा अंदाज लावणं कठीण असतं.
मुलं मित्र मैत्रिणींची निवड कशी करतात, हे त्यांच्या विचारांची बैठक कशी बांधलेली आहे यावर अवलंबून असतं. पालक आणि पाल्य यांच्यात संवाद, सुसंवाद साधला जाणं गरजेचं असतं. या प्रक्रियेतून अनेक प्रश्न सहज सुटतात. मुलांना जास्तीत जास्त व्यक्त होऊ देणं महत्त्वाचं असतं आणि यासाठी कधी कधी मुलं जे काही सांगतात त्याकडे judgmental view न ठेवता त्यांच्या विचारांचा, मनाचा वेध घेत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळी नेमका आपला धीर संपतो आणि आपण अनेकदा मुलांना गप्प बसवतो.
असं वारंवार होत गेलं तर मुलांना त्यांच्या आणि पालकांच्या मध्ये मोठी दरी आहे याची जाणीव होऊ लागते आणि मग ते दुहेरी भूमिका घ्यायला शिकतात. अर्थात पालकांना काय आवडेल तेवढंच त्यांच्याशी बोलतात. अनेकदा पालकांच्या समोर आज्ञाधारक असल्याचा भास निर्माण करतात आणि खूप गोष्टी त्यांच्या मनासारख्या करण्यासाठी मित्र, मैत्रिणीचा आधार घेतात किंव्हा कधी कधी चुकीच्या व्यक्तीची साथ पण घेतात.
“आदित्य सारखं काय बोलतो रे त्या मंदारशी ? आणि क्लासला जाऊन सरळ घरी ये” अशी सूचना मिळताच आदित्यने होकारार्थी मान हलवली आणि क्लास सुटल्यावर एका तासाने घरी आला. शांत आपल्या खोलीत जाऊन अभ्यास करू लागला. काही वेळाने क्लास मधून मेसेज आला आदित्य क्लास ला गेलाच नव्हता. आईने त्याचं कारण विचारल्यावर त्याने, मित्र सायकल वरून पडला म्हणून त्याला घरी सोडायला गेल्याचं सांगितलं आणि वेळ मारून नेली.
पण आदित्य तेंव्हा मंदार सोबत फिरायला गेला होता. मित्रा सोबत फिरायला जाणं यासाठी खोटं बोलण्याची काहीच गरज नसते पण आदित्यच्या आईला मंदारशी त्याचं जास्त बोलणं आवडत नव्हतं म्हणून त्याने तिला खरं सांगणं टाळलं. पण त्याला जे आवडत होतं, त्याची जी गरज होती ती त्याने पूर्ण केली. पुढे कदाचित हे वाढत जाणार.
एखाद्या दिवशी काही घटना घडल्यास आई वडील आश्चर्य चकित होणार आणि आपला मुलगा असं करू शकत नाही या चक्रात अडकून पडणार. हे सगळं टाळता यावं यासाठी आपण आम्ही तुमचे मित्र आहोत असं फक्त बोलण्यापेक्षा तसं वागायला हवं. मुलं चुका करणारचं पण त्या आपल्याला कळायला हव्या. त्यांनी मनमोकळे त्या आपल्याला सांगायला हव्या असं वातावरण घरात निर्माण करून देणं गरजेचं असतं.
“मम्मी हे काय आहे ? ही निळी ईंक अशी गायब कशी होते ग ?” पाच वर्षाच्या चिमुकली ने प्रश्न विचारला आणि आई अस्वस्थ झाली. सॅनिटरी नेपकिनची जाहिरात म्हणजे पालकांना निरुत्तर करणारा प्रसंग. अश्यावेळी कितीही सुशिक्षित आई असू द्या ती अस्वस्थ होणार हे निश्चित आहे.
आपल्याकडे उत्तर देण्याचं कौशल्य नाहीय म्हणून तो प्रश्न आपल्याला नकोसा वाटतो, चुकीचा पण वाटतो. पण त्या लशनश्या मुलीच्या प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. मुलं सगळ्यात आधी आपलेच दार ठोठवतात. आपण उत्तर देण्यास टाळाटाळ केल्या नंतर ते इतर मार्ग बघतात. त्यांना ते जाणून घ्यायचं नाहीच आहे ज्याचा विचार आपण करतोय. त्यांना फक्त ते लिकविड सॉलिड कसं झालं हे विज्ञान जाणून घ्यायचं असतं आणि उत्तम संधी आपण गमवून बसतो.
त्या एका प्रश्नातून आपण मुलांना किती गोष्टी नीट समजावून सांगू शकतो जे इतर कोणीही सांगू शकत नाही. असे प्रश्न म्हणजे पालक पाल्य यांच्यातील दरी कमी करण्याची उत्तम संधी असते. त्याचा योग्य उपयोग करून आपण त्यांच्या डोक्यात कायम सुरू असलेला कल्लोळ निश्चितच कमी करू शकतो.
मुलांच्या नाजूक मनाला कुठलीही इजा न होऊ देता एक अदृश्य घट्ट आवरण देऊन आपण त्यांची काळजी घेऊ या.

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर, बालमानस तज्ञा
अध्यक्षा बालरक्षक प्रतिष्ठान, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
Teenage मध्ये घ्यायची मुलां_मुलीची काळजी, चितां व जबाबदारी योग्य शब्दातला लेख.
खूपच छान लेख…. सुंदर वाक्य रचना….. कमी शब्दांत खूप काही सांगून जाणारा …. शिकवणारा लेख.