Thursday, July 3, 2025
Homeलेखघन ओथंबून येती….

घन ओथंबून येती….

थंडगार वारा सुटतो, जून महिन्याची चाहूल लागते. मुलांना शाळेत जाण्याची पालकांना पाठवण्याची लगबग सुरू होते. आकाशात काळे भोर ढग येऊ लागतात. थंडगार वाऱ्यामुळे अंगावर रोमांच  उभे राहतात. जुन्या आठवणी जागृत होतात.
थंडगार पावसाचे थेंब अंगावर पडू लागतात. ओथंबून आलेले  ढग वसुंधरेकडे आकर्षित होऊन टप टप पडू लागतात. सर्वांना आनंद होतो. लहान मुलं अंगणात नाचू, खेळू, बागडू लागतात. पशुपक्षी धावत सुटतात. माणसे आसरा घेतात. हवाहवासा हा पाऊस सर्वांनाच आवडतो आणि ओठावर एकच गाणं येतं ते म्हणजे..
घन ओथंबून येती
बनात राघू ओघिरती
पंखावरती सर ओघळती
झाडातून  झडझडती
घन ओथंबून झरती
नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढीत नेती…

तरुण, ज्येष्ठ आणि वयोवृद्धांना वेड लावणारा  हा ओथंबणारा घन  सर्व सृष्टीमध्ये चैतन्य भरतो. नदीसागराला भेटते. प्रेयसी प्रिया करायला भेटते. आकाश जमिनीकडे झेप घेते. रोमँटिक अशा पावसाळ्याला सुरुवात होते, अशी कुजबूज कानी पडते.   

लहान मुलांना पडणाऱ्या पावसाबद्दल उत्सुकता असते. मुलांनाच कशाला आबाल वृद्धांनी सुद्धा प्रत्येक वयाच्या टप्प्यावर या पावसाचे महत्व नेहमीच अधोरेखित केलेले आहे.

मे महिन्याची सुट्टी उपभोगत असताना बालगोपाळांबरोबर पालकांची ही सुट्टी कधी संपून जाते ते समजत नाही. जून उजाडण्या आधीच आजकाल पाऊस पडतो. अवकाळी पावसाची सुद्धा मुलं मजा घेतात.
पहिला पाऊस प्रत्येक जीवाला हवाहवासा वाटतो. चातक पक्षी वर्षभर चोच आ वासून पावसाची प्रतीक्षा करतो. तरुण-तरुणी या पावसात कॉफी की चहा ? चहा की कॉफी करत करत या पावसाचा आनंद घेतात. पावसात भिजतात, कविता करतात, गातात, आनंदाने नाचतात.

लहान मुल जेव्हा कीलकीले डोळे करून पहिला पाऊस पाहते तेव्हा त्यांच्या आई-वडिलांच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहत राहावेसे वाटते. दुडू दुडू धावणार दीड-दोन वर्षाच बालक रंगीबेरंगी छत्री घेऊन पावसाचा आनंद घेताना पाहताना मन भरून जाते. त्याचे ते निरागस हास्य पाहण्यासारखे असते. पडत्या पावसात होणारी लोकांची धावपळ, एका छत्रीत चार-पाच मित्रमंडळी असलेल्या मुलांचा समूह  आजकाल दिसत नसला तरी त्या दृश्यावर प्रसार माध्यमांवर तसे छायाचित्र पाहिला की खूप मजा येते. आपल्या लहानपणी प्रत्येकाला छत्री असलीच पाहिजे असं काही नव्हतं. कुणाच्याही छत्रीत शाळेत, बाहेर सहज वावरताना मिळालेला आनंद आजही आल्हाददायक  वाटतो.

एखाद्या तरुणीच्या छान सुंदर छत्रीचा रंग तिच्या गालावर येतो व तिचे सौंदर्य द्विगुणीत होते. आजी आजोबा या पडत्या पावसात आल्याचा चहा, तरुण-तरुणी कांदाभजीचा बेत करतात. भजी खातात व खायला घालतात. चाकरमानी दोन चाकी, चार चाकी किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करत कार्यालय गाठत असताना दिसतात. जेव्हा आपण छत्री किंवा रेनकोट नेतो तेव्हा पाऊस येत नाही. ज्या दिवशी छत्री नाही नेली तर बाहेर पाऊस कोसळतो. आणि आपली गोड फजिती होते. हव्या हव्या अशा वाटणाऱ्या या पावसाला सगळेच नाव देखील ठेवतात. दुषणं देतात. कारण तो पाऊस प्रत्येकाचा हक्काचा असतो. प्रिय असतो. पाऊस आला की अंगावर रोमांच उभे राहतात. आठवणी जागवतात. गालावर हसू फुलवतात. कुणीतरी भेटते, कुणीतरी आठवते त्यामुळे असा हा रसिक, रंग नसला तरी इंद्रधनुष्यी रंग दाखवणारा पाऊस सर्वांच्या आवडीचा असतो.

रिमझिम बरसणारा पाऊस अनेकांच्या आठवणी जाग्या करतो. सर्व सजीवांसाठी पाऊस हा पाण्याचा प्राथमिक स्रोत आहे. हे पाण्याचे चक्र टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते आणि प्रत्येकाला ताजे पाणी पुरवते. पाऊस प्रत्येक सजीवाला शांतता आणि प्रसन्नता प्रदान करतो.
इतकी असंख्य पावसाची गाणी आहेत तरी घन ओथंबून येती हे गाणं नेहमीच मनाचा ठाव घेते.

पाऊस जास्त आला तर थंडी वाजते. थांबला तर उकड्याचा त्रास होतो. मग परत पावसाशी हितगुज, आरोप प्रत्यारोप, दुषणं देणं असे प्रकार सुरू होतात.
कारण सर्वांना वाटते हा पाऊस माझा आहे.

आजकाल वर्षभर कधीही पाऊस पडतो. अवकाळी पडणारा पाऊस माणसाची धांदल उडवून देतो. कोवळ्या पिकांचे नुकसान करतो. फळं, धान्य  खराब होते. घराची गळती होते. बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. अवकाळी पावसा मुळे शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होते.

आज पावसाचा समतोल बिघडला. अतिरिक्त वृक्षतोड यामुळे जगभर जागतिक हवामानावर परिणाम झाला. त्यामुळे पाऊस वेळेवर व पुरेसा पडत नाही. सर्वांनी मिळून प्रदूषण टाळले पाहिजे. वृक्षतोड कमी करून जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत.
लहान मुले सुद्धा पाऊस बराच वेळ नाही आला तर पावसाशी भांडतात. तक्रार करतात. असा हा खट्याळ पाऊस सर्वांना आवडणारा हवाहवासा व थेटभेट घडवणारा तर कधी घरात अडकवून ठेवणारा आहे.

घन ओथंबून येती
पिकात केसर ओले
हळूहळू पीक जोर धरू लागते. हिरवा असणारा रंग केसरी मध्ये रूपांतरीत होतो. हक्काने  सगळे च पावसाशी संवाद साधतात. लहान मुलं कधी पावसाला पैसा देऊ करतात तर कधी रुसलास का माझ्यावर ? असा लटका राग व्यक्त करतात.

जिथे जलाशय किंवा पाण्याची डबकी, मोठे साठे, तलाव, विहिरी असतील तिथे जास्त पाऊस झाल्यावर बेडूक डराव डराव करतो. बेडकालाही मुलं आपला मित्र समजतात.
हे घन, मनातला राघू, त्याच्या पंखावर पडलेले थेंब, झाडावर ओघळणारे चंदेरी थेंब  सर्व जीवांना शांत करणारे आहेत.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत  सगळेच पावसाची मजा, पावसाशी संवाद, हितगुज, तर कधी लटका राग अशी मैत्री, निरागस भाव, थोडं प्रेम करू शकतात. कागदाच्या होड्या करून वाहत्या पाण्यात सोडल्यावर डोक्यावर टपटप पडणाऱ्या पावसाचे भान या गोपाळांना नसते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे ही एक पर्वणी असते.
पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यावरणाचा समतोल साधला पाहिजे.
कागद, पाणी, सर्व साधन संपत्तीचा काटकसरीने वापर केला तर  छपरावर पुन्हा एकदा वेळेवर टप टप टप टप थेंब पडतील व सर्वांनाच आनंद होईल.

तरुण-तरुणी या पडत्या पावसाच्या थेंबाबरोबर, ओथंबणाऱ्या घनाला साक्षी ठेवून म्हणतात,

“आडोशाला जरा बाजूला
साजण छेलछबिला”
घन होऊन बिलगला
घन होऊन बिलगला
घन ओथंबून येती
बनात राघू ओघिरती
सर ओघळती
झाडातून झडझडती…

डॉ अंजूषा पाटील

— लेखन : डॉ अंजुषा पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments