आजपर्यंत स्वदेशी, स्वावलंबन, आत्मनिर्भरता या विषयांवर बरीच चर्चा झाली आहे. पण या विषयांची नुसती चर्चा काय कामाची ? त्यामुळे विकास होणार आहे का ? मुळात आत्मनिर्भर या शब्दाचा खरा अर्थ तरी समाजमनाने लक्षांत घेतला आहे कां ?
आज मात्र या विषयांचा खोलांत जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. एकीकडे परदेशी विद्यापीठे भारतात येऊ घातली आहेत तर दुसरीकडे शिक्षणासाठी परदेशी जाणा-या युवकांची संख्या वाढतच आहे. या युवकांनी आता मी भारतीय, माझा देश भारत ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. इतकेच नव्हे, तर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग आपल्या देशासाठी कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. कारण इतर प्रगत देशांमध्ये, तेथील कंपन्यांमध्ये आपले भारतीय बुध्दिमंत मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. या युवकांनी आतां स्वदेशी परतून इथे कारभार सुरू करावा व इथल्या श्रीमंतांनी त्यांना भांडवलाची मदत करावी. यातूनच आपल्याच लोकांना नोक-या मिळतील, नवीन काहीतरी शिकू शकतील. आयात होणा-या वस्तूंची इथेच निर्मिती होईल.
आपला देश हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत नानाविध अंतरंगाने, अनेक भाषा, विविध वेष, वेगवेगळे खाद्यपदार्थ, विविध प्रांत, वेगळे हवामान, विविध संस्कृती, विविध सण, उत्सव, नृत्य, गायन, विविध कलाकुसरी याने संपन्न आहे. तसेच आपण ज्यांना मागासलेले समजतो त्यांच्या कला अतिशय देखण्या असतात. बांबूंमधून नाना वस्तू, आकाशदिवे, वारली पेंटींग, टाकावूतून टिकावू वस्तूंची निर्मिती, मातीतून विविध आकारांच्या पणत्या या सर्व गोष्टींचा प्रचार योग्य रीतीने विविध कार्यक्रम, प्रदर्शन यातून सर्व देशात झाला पाहिजे.
आणि हो, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा, यंत्रसामुग्रीचा सुयोग्य वापर केला पाहिजे. म्हणजे परदेशात आपल्या विविध रंगांची उधळण होईल आणि त्यांचे पाय आपोआप भारतभेटीसाठी वळतील. म्हणजेच पर्यटन हा व्यवसाय फळफळेल आणि अनेकांना त्याचा फायदा मिळेल.
आज आपण पाहतोच आहोत की प्रगत राष्ट्रांना भारतीय संस्कृतीचे मोल कळू लागलयं. अमेरिकेमध्ये योगाभ्सास जोरात सुरू आहे. आयुर्वेदानेसुध्दा प्रभाव पाडला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी औषधी वनस्पतींचीही लागवड करावी. म्हणजे पर्यावरण व औषधनिर्मिती दोन्ही साधता येईल.
आपल्याला समृध्दी मिळवायची असेल तर सामान्य जनतेने जागृत झाले पाहिजे.आपला इतिहास, भूगोल जपण्याचा जीवापाड प्रयत्न केला पाहिजे. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा आणि स्वयंशिस्त आचरणात आणली तर परदेशी पाहुणे पर्यटनातून जास्तीत जास्त संख्येने नक्की येतील आणि येथील अनेकविध संस्कृतींची मजा चवीने चाखतील.
आणखी एका बाबतीत आपण आत्मनिर्भर व्हायलाच पाहिजे. ते म्हणजे लष्कराला लागणा-या शस्त्रांबाबत. अर्थात सरकारकडून त्याबाबतीत प्रयत्न चालूच आहेत. त्यांना यश प्राप्त होवो ही सदिच्छा देऊन इथेच थांबते.

– लेखन : स्वाती दामले
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800