Sunday, July 6, 2025
Homeपर्यटनचला, आसाम मेघालय ला !

चला, आसाम मेघालय ला !

भारताच्या सीमावर्ती भागाच्या दौऱ्यावर असलेल्या कवयत्री आणि आपल्या पोर्टलच्या नियमित लेखिका राधिका भांडारकर यांनी खास न्यूज स्टोरी टुडे साठी लिहिलेले हे प्रवास वर्णन आपल्यालाही सीमावर्ती भागाची घर बसल्या सफर घडवून आणेल….
– संपादक.

कोविड थोडा आटोक्यात आला. गेली दोन वर्ष मनात या विषाणूने भयाचे घर केले होते आता थोडे मुक्त झाले आणि पर्यटन खुले झाल्यामुळे प्रवास प्रेमींनी प्रवासाचे बेत आखण्यात सुरुवात केली.

देशाच्या उत्तर-पूर्व विभागातल्या आसाम मेघालय ला भेट देण्याचे आम्ही ठरवले. एका वेगळ्याच भौगोलिक आणि सांस्कृतिक राज्याची ही सफर खूपच अविस्मरणीय ठरली. या सफरीची सुरुवात आसाम मधील गुवाहाटी या व्यापारी शहराच्या, लोकप्रिय गोपीनाथ बॉर्दोलोई या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरुवात झाली. आम्ही मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावरून इंडिगो फ्लाइट 6434 ने इथे आलो. सोबत वीणा ग्रुपचे आकाश व इतेश हे अतिशय उत्साही आणि या भागातले माहितगार असे सफर मार्गदर्शक आमच्या बरोबर होते. आमचा 26 जणांचा समूह होता.

गुवाहाटी ते शिलॉंग हा आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. आमच्यासाठी विमानतळावर टॅक्सीज उभ्याच होत्या. मेघालय हे भारतातील उत्तर पूर्व राज्य असून शिलॉंग ही या राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. त्याच्या उत्तर व पूर्व भागात आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे. 1972 साली मेघालय राज्य आसाम पासून वेगळे झाले.

गुवाहाटी ते शिलाँग हा ड्राइव्ह अतिशय सुखद होता. दुतर्फा उंच उंच पहाड, बांबूची बने, उंच उंच सुपारीच्या बागा, केळीच्या बागा, सुखद गारवा आणि डोंगरावर उतरलेले ढग असा सृष्टीचा नजारा अतिशय लोभस होता. वाटेत उमीअम या मानव निर्मित विशाल तलावास भेट दिली. शिलाँग पासून हे ठिकाण साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे आणि पर्यटकांचे खास आकर्षण आहे. याचा विस्तार जवळजवळ 220 स्क्वेअर मीटर आहे चहूबाजूला डोंगर, खासी वृक्ष, आणि तलावाचे अनोखे निळे पाणी तिथे आपल्याला खिळवून ठेवतात.

आमचे तसेच झाले. पाय निघतच नव्हता पण पुढे जायचे होते ..पूर्वी या तलावावर एक हायड्रो प्रोजेक्ट होता परंतु सध्या तो बंद आहे असे समजले. या राज्यांचे मेघालय हे नाव किती सार्थ आहे हे जाणवत होतं. उंच उंच डोंगर आणि त्यावर विहरणारे काळे मेघ हेच या राज्याचे वैशिष्ट्य ! हे सारे बघत असताना मनात येत होतं की आपल्या देशात किती विविधता आहे ! सृष्टीची विविध रूपे पाहताना थक्कच व्हायला होते. अंतराअंतरावर बदलणारी मानव संस्कृती पोशाख खाद्य, जीवन पद्धती ही खरोखरच अचंबित करते.
मेघालय मध्ये फिरताना जाणवले ते सृष्टीचे अनेक चमत्कार. इथे अनेक नैसर्गिक गुहा आणि धबधबे पाहायला मिळतात. वर्षा ऋतूचे अजून आगमन झाले नव्हते तरीही उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात.

ऊएलीफंटा फॉल

एके ठिकाणी रबर प्लांटची मुळे वाढून एकमेकात अशा पद्धतीने गुंतली गेली आहेत की त्याचा एक मोठा पूल तयार झाला आहे. यास रूट ब्रिज असेच म्हणतात. एका नैसर्गिक ब्रीज वरुन चालताना सृष्टीच्या या दिव्य कामगिरीचा अचंबा वाटत होता. मात्र रुटब्रीजला प्रत्यक्ष पाहण्यासाठी काही अवघड चढउतार पार करावे लागतात.

१८९७ साली मेघालयात प्रचंड भूकंप झाला होता. डोंगर कोसळले होते. इतस्ततः दगड  पसरले होते. ज्यावेळी हि विस्कळीत स्थिती पूर्ववत करण्यात येत होती त्यावेळी तिथे एक भलामोठा दगड एका छोट्या दगडावर व्यवस्थित स्वतःला तोलून स्थिर असलेला आढळला. तो तसाच ठेवला गेला. आजही तो तसाच आहे आणि आता हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. या दगडास बॅलन्सिंग रॉक असेच म्हणतात निसर्गाचे आणखी एक नवलच म्हणावे !!

बॅलन्सिंग रॉक

या प्रवासातील अविस्मरणीय भेट म्हणजे भारत-बांगलादेश मैत्री गेट. मेघालय मध्ये भारत-बांगलादेश सीमारेषा 443 किलोमीटर (275 मैल) इतकी आहे. या मैत्री द्वाराजवळ, अलीकडे पलीकडे दोन्ही देशांचे झेंडे फडकत असतात आणि संध्याकाळी ते खाली उतरवले जातात. झेंडे उतरवणे म्हणजेच, कुठल्याही प्रकारचे वैमनस्य दोन्ही देशांमध्ये नसणे हेच अध्याहृत आहे.

भारत बांगलादेश मैत्री द्वार

मेघालया मधून बांगलादेश मध्ये दगडांची निर्यात प्रचंड प्रमाणात होते. रस्त्यावरून जात असताना हे उंच उंच डोंगर ओरबाडले दिसतच होते. हे दगडही अनेक रंगी आहेत. लाल, जांभळे, पिवळे, स्वच्छ पांढरे. इथल्या लोकांचा दगडफोडी हा मुख्य व्यवसाय आहे व हे सर्व दगड बांगलादेशात पाठवले जातात. या मैत्री बेटावर ही दगड वाहतुक आम्ही प्रत्यक्ष पाहिली. अत्यंत सुरक्षित पद्धतीने ही निर्यात, येथील सैनिकांच्या देखरेखीखाली होत असते. सीमेचे रक्षण करणारे हे नैसर्गिक पहाड आणि हे सैनिक दोन्हीही मला महान वाटले.

उमंगोट नदी

उमंगोट नदीच्या किनाऱ्यावर चे डावकी हे सीमावर्ती शहर आहे. यापूर्वी अमृतसरला वाघा बॉर्डर ला भेट दिली होती भारत-बांगलादेश मैत्री द्वाराची ही भेट तसेच संवेदनशील होती. उमंगोट नदी ही दोन्ही देशातून वाहते सहज मनात आले नदीला कुठले आहे सीमेचे बंधन !! या भिंती या मर्यादा मानवाने उभ्या केल्या. आणि त्या बदल्यात मिळवली ती कायमची अशांती !
उमंगोट नदीचं पाणी अगदी स्फटिकासारखे स्वच्छ आहे. संथ वाहणारे पाणी, चौफेर हिरवाईने नटलेले उंच पहाड, मावळतीच्या वेळी या नदीतून केलेला नौकाविहार अत्यंत सुखद होता. पाण्याचा तळ नजरेला भिडत होता. ते पाहताना वाटले की माणसाचं मन या नदी सारखच नितळ का नाही असू शकत ?

उमंगोट नदीतून नौका विहार

शाळेच्या भूगोलात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या क्षेत्र म्हणजे चेरापूंजी हे वाचलं होतं. आज प्रत्यक्ष चेरापूंजी ला भेट देण्याची उत्सूकता अर्थातच खूप मोठी होती. ड्राईव्ह अतिशय सुखद होता. आजूबाजूला उंच उंच डोंगर, डोंगरावर उतरलेले मेघ, वळणावळणाचे रस्ते,
न बोचणारे परंतु गार वारे, भुरभुर पडणारा पाऊस सारेच खूप प्रसन्न होते. वातावरण अतिशय आल्हाददायक होते. खासी व जायैती हिल्स हा भूभाग खासी जमातीच्या अधिपत्याखाली होता अठराशे तेहतीस साली हा भाग ब्रिटिशांच्या राजवटीखाली आला आणि त्यांनी मेघालया ची राजधानी चेरापूंजी न ठेवता शिलॉंग येथे हलवली. येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे शिलॉंग ची तुलना स्कॉटलंड सोबत केली जाते.

चेरापुंजीत पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे येथील कोसळणारे धबधबे !
येथील एलिफंटा फॉल्स ला आम्ही भेट दिली. हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये वाहत जातो. शंभर दीडशे पायऱ्या खाली उतरून टप्प्याटप्प्यावर या धबधब्याचे दर्शन विलोभनीय आहे. जिथून धबधब्याची सुरुवात होते, तिथला भाग हा हत्तीच्या मस्त का सारखा दिसतो म्हणून त्यास एलिफंटा फॉल्स म्हणतात. मात्र आता डोंगर दगडांची पडझड झाल्यामुळे तसा आकार दिसत नाही. अतिशय नयनरम्य असा हा धबधबा ! सूरमयी संगीत ऐकताना आणि खळाळत पाणी बघताना जळू ब्रम्हानंदी टाळी लागते.

एलिफंटा फॉल्स

सेव्हन सिस्टर्स धबधबा बघताना ही मन असेच हरवून गेले. नोहकालिकिया वॉटर फॉल निर्मितीमागे एका आईची कहाणी आहे. तिचा दुसरा नवरा तिच्या मुलाचा द्वेष करत असतो. एकदिवस तो त्या मुलाची हत्या करतो आणि त्याचे मांस शिजवून तिला फसवून खायला देतो. हे जेव्हा तिला कळते तेव्हा दुःखाने ती बेभान होते व या कड्यावरून खाली उडी मारते. जणू तिच्या दुःखाने निसर्गही कोसळतो आणि निसर्गाच्या अश्रुंच्या रूपात हा भव्य धबधबा आपल्याला पहायला मिळतो नोहकालिकिया हे आईच नावच या धबधब्याला दिले आहे. या मागची कहाणी भीषण असली तरी निसर्गाचे हे रूप विलक्षण आहे डोळ्याचे पारणे फिटते.

नोहकालिकिया वॉटर फॉल

मेघालयात नैसर्गिक गुहा ही खूप आढळतात. माऊस माय केव्ह ही अशीच एक नैसर्गिक गुहा आहे. 150 मीटर आत चालत जावे लागते. वाकून, सांभाळून, उड्या मारत आत चालावे लागते. गारवा आणि पावसाचा शिडकावा मनाला आनंद देतोच. पण हे थोडं साहसी काम आहे.

गुहा

चेरापुंजी ची ओळख शाळेच्या भूगोलात झाली होती मुसळधार पावसाचे गाव ! आज आम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो मजा वाटली अतिशय रम्य ठिकाण येथील रामकृष्ण मिशनला भेट देऊन आम्ही शिलाँग ला परतलो. शिलॉंग चे मूळ वंशज गोरी आणि खासी जमातीचे आहेत. पण ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली ख्रिश्चन धर्माचा प्रसार होऊन शिलॉंग मध्ये ख्रिश्चन संस्कृती उदयास आली. शिलॉंग हे राजधानीचे शहर असूनही येथे रेल्वे व रस्त्यांचा विकास झालेला आढळला नाही.

मात्र पहाडी प्रदेशामुळे चढ-उताराचे अरुंद रस्ते, आणि पर्यटकांची गर्दी यामुळे वाहन कोंडी आढळते. परंतु वाहन चालक अतिशय काटेकोरपणे रस्त्याचे नियम पाळत असल्याने व शिस्तीने गाड्या चालवत असल्याचे ही अनुभवास आले. पादचारीही शिस्तीने फूटपाथवरुनच चालतात. शाळेतली मुले, आॉफीसात जाणारी आणि इतर सारी माणसं कुठून कुठे पायीच चालत जातात असेही आढळले.

शिलाँगमध्ये प्रामुख्याने इंग्लीश भाषाच बोलली जाते.
काहीशी त्यांची राहणी युरोपीअन पद्धतीची वाटली. मेघालयवासी खरोखरच शांत प्रवृत्तीचे वाटले. कष्टाळु आणि उत्साही वाटले.
गोल गोबरे गाल, ठेंगण्या गोल बांध्यांची ही तुरतुर चालणारी माणसे पाहताना मजा वाटली.
क्रमशः
(पुढच्या भागात आसाम, तिथली लोकसंस्कृती आणि
पर्यटनावर वाचू या.)

राधिका भांडारकर

– लेखन : राधिका भांडारकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments