केरळ पर्यटन
वाचक हो, नमस्कार.
आपल्याला खूप दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या देवभूमी केरळ मधील पर्यटन स्थळांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अनेक वाचकांनी या विषयी विचारणा देखील केली आहे. त्यांना तर आजचा भाग वाचून नक्कीच आनंद होईल.
अवर्णनीय निसर्ग सौन्दर्य, बॅक वॉटर, चहाचे मळे, हत्तीचे कळप, पारंपारिक आयुर्वेदिक मालिश अशा अनेक वैशिष्ट्यानी देश परदेशातील पर्यटक, केरळ मध्ये आकर्षित होतात. याबरोबरच येथे जपलेला सांस्कृतिक वारसा आपणास पाहायला मिळतो. प्रसन्न वातावरणात मनःशांती अनुभवता येते.
केरळ मध्ये पर्यटनसाठी साधारण सप्टेंबर नंतर ते फेब्रुवारी जाऊ शकतो. त्रिवेंद्रम केरळची राजधानी. भारतातील सुंदर मंदिरापैकी मंदिर श्री पद्मनाभ स्वामी मंदिर इथे आहे. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी हे मंदिर. एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम घाटाचे निसर्ग सौन्दर्य.
मंदिराची करागिरीही अतुलनीय आहे.मंदिरात प्रवेश करताना स्त्री पुरुषांना विशिष्ट पोशाख घालावा लागतो. स्त्रियांना साडी आणि पुरुषांना मुंडू ( लुंगी ) असा पोशाख वापरावा लागतो.
वर्कला बीच शांत आणि आकर्षक असा समुद्र किनारा. साधारण 2000 वर्षा पूर्वीचे विष्णु मंदिर आणि शिवगिरी मठ इथून जवळच आहे. पारंपारिक आयुर्वेदिक मसाज केंद्रही आहेत.
कोची इथे कोची किल्ला पाहता येतो. इथला सुंदर समुद्र किनारा म्हणजे फोर्ट कोची बीच, विविध चर्च पाहता येतात. विरनपूळा बॅक वॉटर मध्ये हाऊस बोट मध्ये राहता येते. आजूबाजूला भाताची शेती, शांत, मोहक वातावरणामुळे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कथकली नृत्य केंद्राला आपण भेट देवू शकतो.
सनसेट क्रुज कोची सूर्यास्ताच्या वेळी छोट्या मोठ्या बोटीतून मरीन ड्राईव्हला फेरफटका मारणे एक अविस्मरणीय अनुभव असतो.
मॉलला जायचे असेल तर १७ एकर मध्ये असलेल्या लुलू मॉल पाहता येतो. सर्वाधिक पर्यटक या मॉलमध्ये जात असतात.
अलपूळा अथांग बॅक वाटर, हिरवीगार भाताची शेती, नारळाची उंच झाड, किनारीला खेडी आणि
प्रवासासाठी ये जा करणाऱ्या छोट्या मोठ्या नावा आपल्याला प्रेमातच पाडतात, आणि खास आकर्षण म्हणजे बॅक वॉटर मधील पर्यटकांना राहण्याची सोय असलेल्या हाऊस बोट. हाऊस बोट मध्ये राहणं म्हणजे वेगळाच अनुभव असतो. केरळी भोजनाची लज्जत घेता येते. मासे आवडणाऱ्या व्यक्तींना तर मेजवानीच. दर वर्षी होणाऱ्या बोटींची शर्यत पाहण्यासाठी तर पर्यटक आवर्जून हजेरी लावतात.
वेम्बनाड लेकच्या किनारी कुमारकोम पक्षी अभयारण्य आहे. इडक्की येथील, पेरियार नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिजर्व क्षेत्र आहे पण इथे हत्तीना पाण्यात खेळताना पाहण्यासाठी खूप पर्यटक येतात. विविध पक्षी, प्राणी, वनसंपदा पाहता येते. बोटींगची सुविधाही आहे.
मुन्नार दक्षिणेतील काश्मीर – बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन. केरळ मधील थंड हवेचे ठिकाण. दूरवर पसरलेले चहाचे मळे, वन्य जीव आणि निसर्गाने नटलेले मुन्नार. तीन नद्यांचा संगम होतो इथे. अवर्णनीय, अतुलनीय केरळचे स्वर्ग म्हणजे मुन्नार.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/08/IMG_20210808_155635-300x206.jpg)
इथले विशेष म्हणजे १२ वर्षांनी फुलणारे नीलकुरुंजीची फुले. संपूर्ण सृष्टी निळ्या जांभळ्या रंगाने रंगून निघते.इथल्या इर्विकुलम नॅशनल पार्क मध्ये विविध वन्य जीव, वनसंपदा पाहायला मिळते.
मातुपेट्टी धरण, इको पॉईंट, टाटा टी म्युजियम अत्तुकल वॉटर फॉल्स, अशी विविध स्थळे पाहू शकतो. पारंपरिक आयुर्वेदिक मसाजही करता येतो. खरेदीसाठी चहा, मसाले, चॉकलेटस, आयुर्वेदिक तेल मिळते. मुन्नारला जंगलातून जाताना किंवा येताना हत्तीही समोरून जाताना दिसतात. आम्हालाही एकदा परत येताना हत्ती आडवे गेले होते.
परंबिकूलम टायगर रिजर्व दाट जंगल, विविध वन्यजीव, पक्षी, वाघ, हत्ती इथे पाहता येतात. इथे गेल्यानंतर वनविभागच्या बस मधून जंगल सफारी करायला नेतात. हत्ती, पक्षी, प्राणी तर दिसतात पण नशीब चांगले असेल तर वाघ महाराजांचही दर्शन होऊ शकते.
आदिरापल्ली वॉटर फॉल्स
पश्चिमी घाटातून निघणाऱ्या चालाकुडी नदीचा हिस्सा आहे हा धबधबा. हिरव्यागार निसर्गात कोसळणारा शुभ्र जलप्रपात भव्य दिव्य सगळंच.
त्रिशूर पासून जवळच पवित्र क्षेत्र कृष्णाच मंदिर असलेले ठिकाण म्हणजे गुरुवायूर. याला दक्षिणेतील द्वारका असे म्हणले जाते.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/08/IMG_20210808_160543-300x169.jpg)
पालकाड मध्ये मलमपूळा धरण, कोटा मैदान, वॉटर पार्क मध्ये आनंद घेऊ शकता. वेळ असेल तर आजूबाजूची मंदिरेही पाहता येतात.
पुणे बंगलोर दृतगती मार्गाने आपल्या वाहनाने येऊ शकतो, नाहीतर रेल्वे, विमान प्रवास, बस अशी विविध साधनेही वापरता येतात.
केरळ फिरायचं म्हणजे निवांत वेळ काढून फिरायचं. निसर्ग सौन्दर्य, वन्य जीवसृष्टी, आहार सगळ्यांचा मनसोक्त आनंद घ्यायचा आणि समाधानाने तृप्त होऊन घरी परतायचे.
मग येतायना केरळला ?☺️
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG_20210703_154441-150x150.jpg)
– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800